उत्पन्न : संपत्तीच्या उपयोगातून निर्माण होणारा वा मानवी श्रमांच्या मोबदल्यात मिळणारा, पैशाच्या वा अन्य सामग्रीच्या स्वरूपातील लाभ. शारीरिक किंवा मानसिक श्रम, व्यापार, भांडवल गुंतवणूक यांसारख्या आर्थिक कृतींतून व्यक्तीला वा कंपनीला उत्पन्न मिळते. श्रम व भांडवलावरील मालकी हे उत्पन्न मिळविण्याचे दोन मार्ग आहेत. स्थूलमानाने रोजगारीपासून मिळणारे म्हणजेच श्रमजन्य आणि मालमत्तेपासून मिळणारे, असे उत्पन्नाचे दोन प्रकार पाडता येतात. श्रमजन्य उत्पन्नात वेतनाचा समावेश होतो. मालमत्तेपासून मिळणाऱ्या उत्पन्नात खंड, व्याज व नफा यांचा अंतर्भाव होतो.

राष्ट्रीय उत्पन्नाच्या निर्मितीत भूमी, मजूर, भांडवल व प्रवर्तक हे चार घटक सहभागी असतात. या उत्पादक घटकांच्या सेवेचे मोल अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात केले जाते. निरनिराळ्या प्रकारची अशी जी उत्पन्ने प्रत्येक व्यक्तीला मिळत असतात, त्यांची बेरीज केली म्हणजे त्या व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न किती ते समजते.

उत्पन्न-प्रकारांचे काटेकोर वर्गीकरण तात्त्विक विवेचनात करता येते. परंतु विविध उत्पन्नप्रकार एकमेकांत मिसळत असल्यामुळे असे वर्गीकरण व्यवहारात करता येणे कठीण असते. उदा., प्रवर्तकाला जो नफा मिळतो, त्यात कित्येकदा व्यवस्थापनाच्या कामगिरीबाबतचे वेतन, त्याने स्वतःचे भांडवल गुंतविले असल्यास त्यावरील व्याज, जमिनीसारख्या मालमत्तेपासून प्राप्त होणारा खंड इ. गोष्टी अंतर्भूत असतात. अशा सरमिसळीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शक्य तेवढे काटेकोर वर्गीकरण करावे लागते व जरूर तो खुलासा त्या वर्गीकरणास जोडावा लागतो.

वैयक्तिक उत्पन्नाचे वास्तविक व द्रव्य उत्पन्न, समग्र व निव्वळ उत्पन्न, अर्जित व अनर्जित उत्पन्न असे पोटभेद करता येतात. वैयक्तिक उत्पन्नाखेरीज राष्ट्रीय उत्पन्न ही एक महत्त्वाची संकल्पना आहे.

द्रव्य उत्पन्न व वास्तविक उत्पन्न : व्यक्तीला द्रव्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळते व त्यामुळे तिला उत्पन्नाच्या क्रयशक्तीच्या प्रमाणात बाजारातील वस्तूंवर हक्क प्रस्थापित करता येतो. वास्तविक उत्पन्न एकूण द्रव्य उत्पन्न व वस्तूमूल्याची पातळी यांवर अवलंबून असते. वास्तविक उत्पन्नात होणारा बदल मोजताना पैशाच्या क्रयशक्तीत झालेला बदल लक्षात घेणे आवश्यक असते. 

समग्र उत्पन्न व निव्वळ उत्पन्न : प्रवर्तकाला मालाच्या विक्रीतून मिळणारे एकूण उत्पन्न, हे समग्र म्हणता येईल परंतु त्याला मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाची कल्पना येण्यासाठी समग्र उत्पन्नातून उत्पादन-परिव्यय वजा करणे आवश्यक असते. उत्पादन-परिव्ययात यंत्रसामग्रीसारख्या भांडवली वस्तूंवरील घसाऱ्याचा अंतर्भाव होतो.

अर्जित उत्पन्न व अनर्जित उत्पन्न : अर्जित उत्पन्न म्हणजे स्वकष्टाने मिळविलेले उत्पन्न. नोकरी, व्यवसाय वा व्यापार करून होणारी प्राप्ती, निवृत्तिवेतन इत्यादींचा समावेश अर्जित उत्पन्नात होतो. अर्जित उत्पन्नावर कर बसविताना काही प्रमाणात सूट दिली जाते. स्वतः कष्ट न करता एखाद्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न, हे अनर्जित उत्पन्न होय. सर्वसाधारण किंमतीची पातळी वाढत असता कंपन्यांचे भाग, कर्जरोखे, भांडवली वस्तू ह्यांपासून मिळणारे वाढते उत्पन्न, हे अनर्जित उत्पन्नाचे उदाहरण होय. कुळांकडून जमीनदारांना मिळणारा खंड, लाभांश ह्यांचाही अनर्जित उत्पन्नात समावेश होतो.

उत्पादनास साहाय्यभूत ठरणाऱ्या उत्पादक घटकांना एकूण उत्पन्नाचा भाग किती प्रमाणात मिळावा, हे ठरविणारे अनेक सिद्धांत अर्थशास्त्रज्ञांनी मांडले आहेत. वेगवेगळ्या उत्पादन घटकांनी मिळून निर्मिलेल्या उत्पन्नाची चारही घटकांत कशी वाटणी करावी, ही एक महत्त्वाची समस्या आहे. उत्पन्नाची विभागणी कोणत्या तत्त्वावर ठरवावी यावर अर्थशास्त्रज्ञांत एकमत नाही. सनातन अर्थशास्त्रज्ञांनी ही विभागणी सीमांत उत्पादकता सिद्धांताच्या आधारावर केली आहे. परंतु ज्या गृहीततत्त्वांवर हा सिद्धांत आधारलेला आहे, ही तत्त्वे सदोष असल्याचे मत अर्वाचीन अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. वस्तूंच्या किंमती काढताना मागणी-पुरवठ्याचे तत्त्व लागू करण्यात येते. तेच तत्त्व उत्पादन घटकांची किंमत निश्चित करताना, म्हणजेच त्यांचे उत्पन्न ठरविताना उपयोगात आणावे, असे अर्वाचीन अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याबाबतीत प्रवर्तकाला मिळणारा नफा हा अपवाद मानण्यात आला आहे. तिन्ही घटकांचा भाग ठरविल्यानंतरचा अवशिष्ट भाग प्रवर्तकाचे उत्पन्न मानले जाते. हा भाग क्वचित अभावात्मकही किंवा प्रतिकूलही असू शकतो म्हणजे प्रवर्तकाला क्वचित नुकसान सोसावे लागते. अन्य तिन्ही उत्पादन घटकांचे उत्पन्न अभावात्मक किंवा प्रतिकूल असू शकत नाही.

राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा चारही उत्पादक घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज करून काढता येतो. व्यक्ती व उत्पादनसंस्था ह्यांच्या उत्पन्नांची बेरीज करणे, ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धत होय. उत्पादनाच्या वस्तुरूप साधनांवरील खाजगी मालकी, विशेषतः वारसाहक्काने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी खाजगी मालकी, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभाजनात आढळणाऱ्या विषमतेस कारणीभूत ठरते. वैयक्तिक गुणवत्तेतील फरक व समान संधीचा अभाव यांमुळे आर्थिक विषमतेत भर पडते.

जगातील प्रमुख देशांतील उत्पन्नाचे विभाजन पाहू जाता, औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांत कमीअधिक विषमता असल्याचे दिसून येते. १९५० च्या आकडेवारीप्रमाणे अमेरिकेत वरच्या ५ टक्के लोकांकडे एकूण उत्पन्नाचा २०·४ टक्के वाटा होता. ग्रेट ब्रिटन (२०·९ टक्के), स्वीडन (२०·१ टक्के) व पश्चिम जर्मनी (२३·६ टक्के) या देशांत कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती. याउलट तळाच्या २० टक्के लोकांकडे अमेरिकेत ४·८ टक्के, ग्रेट ब्रिटनमध्ये ५·४ टक्के, स्वीडनमध्ये ३·२ टक्के व पश्चिम जर्मनीमध्ये ४·० टक्के एवढाच भाग होता. उद्‌गामी प्राप्तिकर हे विकसित देशांना आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रभावी साधन म्हणून वापरले जाते. त्यामुळे प्राप्तिकर भरल्यानंतरच्या उत्पन्नात एवढी तफावत आढळणार नाही.

भारतासारख्या अविकसित देशात आर्थिक विषमता अधिक प्रमाणात आहे. हे प्रमाण तपासून पाहण्यासाठी सरकारने १९६० मध्ये प्रा. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘उत्पन्नाची विभागणी आणि राहणीमान समिती’ स्थापन केली होती. समितीने तज्ञांनी तयार केलेले अहवाल व अन्य पुरावे यांची छाननी करून काही निष्कर्ष काढले आहेत. पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या अखेरीस उत्पन्नाचे केंद्रीकरण वाढले असून, विशेषतः नागरी भागात आर्थिक विषमता वाढल्याचे समितीने म्हटले आहे. वरच्या एक टक्का कुटुंबांकडे एकूण उत्पन्नाचा १० टक्के भाग असून खालच्या ५० टक्के कुटुंबांना अवघे २२ टक्के उत्पन्न मिळते. या आकडेवारीस ‘नॅशनल कौन्सिल ऑफ ॲप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च’या संस्थेने काढलेल्या निष्कर्षामुळे पुष्टी मिळते. या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील तळाच्या १५ टक्के कुटुंबांकडे फक्त ४ टक्के उत्पन्नाचा भाग जात असून याउलट वरच्या २·५ टक्के कुटुंबांचा १८ टक्के उत्पन्नावरच हक्क आहे. इटली, मेक्सिको, श्रीलंका, यांसारख्या अविकसित देशांत थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती दिसते.

पहा : आर्थिक विषमता राष्ट्रीय उत्पन्न.

संदर्भ : 1. Govt. of India, Planning Commission, Report of the Committee on Distribution of Income and Levels of Living, (part I), New Delhi, 1964.

             2. Reserve Bank of India, RBI Bulletin, Bombay, Sept. 1963.

             3. Ross, M. H. Income Analysis and Policy, New York, 1964.

भेण्डे, सुभाष