अधिदान : एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी वा आयात-निर्यातीसाठी शासनाने ठराविक प्रमाणात दिलेले आर्थिक साहाय्य. अधिदान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असते. उत्पादनाच्या नगामागे देण्यात येणारी ठराविक रक्कम हे प्रत्यक्ष अधिदानाचे आणि निर्यात-मालाची सरकारी लोहमार्गावर कमी दराने वाहतूक करण्याची सवलत, हे अप्रत्यक्ष अधिदानाचे उदाहरण होय.
सतराव्या शतकापासून अधिदान देण्याची पद्धत रूढ झाली. अधिदानांचा उपयोग अन्य देशांत वसाहतीस प्रोत्साहन, सैनिकांना प्रलोभन, लोकसंख्यावाढीस उत्तेजन, वन्य श्वापदांचा संहार इ. विविध कारणांसाठी केल्याचे आढळते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील लोहमार्गांच्या जलद विकासाचे श्रेय अधिदानास आहे. यूरोपीय देशांत साखरेच्या उत्पादनास व निर्यातीस उत्तेजन देण्यासाठी अधिदानांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यात आला. भारतात सध्या शेतमालाची किंमत स्थिर ठेवण्याचा उपाय म्हणून अधिदानाचा अधिकाधिक वापर होत आहे.
गद्रे, वि. रा.