स्त्री उद्योजक व कामगार : अगदी प्राचीन काळापासून तथाकथित उद्योगक्षेत्र हे स्त्रीच्या दृष्टीने एक उपेक्षित क्षेत्र मानले गेलेले आहे परंतु विद्यमान आधुनिक व खुल्या अर्थव्यवस्थेच्या युगात औद्योगिक क्षेत्रात अनेक स्त्रिया उद्योजक व कामगार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. एखाद्या उद्योगाची स्थापना करून त्याचे संचलन करणारी वा त्या उद्योगाला यशस्वी करण्यासाठी विविध कार्यांची जबाबदारी पार पाडणारी स्त्री म्हणजे स्त्री-उद्योजक. उद्योग-व्यवसायात नोकरी करून आपली उपजीविका करणार्‍यास्त्रियांना स्त्री-कामगार असे संबोधले जाते. एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उद्योगधंद्यांमध्ये स्त्रियांचा वाटा अत्यंत अल्प होता तथापि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांचा औद्योगिक क्षेत्रातील सहभाग अत्यंत वेगाने वाढल्याचे दिसते. सध्या सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करीत असून औद्योगिक क्षेत्रातही त्या मागे नाहीत. भारताच्या तुलनेत यूरोपीय राष्ट्रे, अमेरिका, जपान, कोरिया, कॅनडा या पुढारलेल्या व प्रगत राष्ट्रांतील महिला औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. तेथील अर्थव्यवस्था, सामाजिक परिस्थिती, पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा व वागणूक, शिक्षणाची संधी आदी अनेक घटक त्यास कारणीभूत आहेत. प्रगत राष्ट्रांच्या संदर्भातील पाहणीच्या आधारे असे निष्पन्न झाले की, धुलाई व्यवसाय ( लाँड्री ), सौंदर्यसाधना केंद्र ( ब्यूटी पार्लर ), बेकरी, गृहोद्योग, हॉटेले, शिक्षण व माहिती-तंत्रज्ञान इ. क्षेत्रांत महिला आपला सहभाग नोंदवीत आहेत. सामान्यपणे स्त्री उद्योजक विशिष्ट प्रकारच्या व मर्यादित उत्पादन करणार्‍या लघुउद्योग क्षेत्रात व्यस्त आहेत.

  विकसित व विकसनशील देशांत व समाजात स्त्रिया स्वतः पुढाकार घेऊन उद्योजकाची भूमिका पार पाडीत आहेत. मूलतः महिला उद्योजक ही संकल्पना उद्योजक या संकल्पनेहून वेगळी नाही. उद्योजकाची व्याख्या व कार्ये महिला अगर स्त्री उद्योजकांनाही लागू होतात. उद्योजकाच्या प्रमुख  कार्यांमध्ये नवनवीन कल्पनांचा शोध घेणे, त्यातून व्यावसायिक संधी  शोधणे, संधीची नफ्याच्या दृष्टीने अनुकूलता तपासणे, निवड करणे, धोका  पतकरणे, उद्योगाची स्थापना करणे, उद्योगास आवश्यक अशा सर्व घटकांची जमवाजमव करणे, उद्योगाचे व्यवस्थापन, नियंत्रण व नेतृत्व करणे या बाबींचा समावेश होतो. ज्या उद्योग-व्यवसायात ही सर्व किंवा बहुसंख्य कार्ये स्त्रीकडून किंवा स्त्रियांच्या समूहाकडून पार पाडली जातात, त्यास महिला उद्योग असे संबोधले जाते. भारत सरकारच्या नॅशनल लेव्हल स्टँडिंग कमिटी ऑन विमेन ऑन्त्रप्रनरशिप ( १९९१ ) या समितीने निर्देशित केलेल्या व्याख्येनुसार, ज्या उद्योगात ५१% भाग-भांडवल स्त्रियांकडून गुंतविण्यात आलेले आहेत, तसेच ज्या उद्योगातील निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींपैकी किमान ५०% रोजगार स्त्रियांनाच देण्यात आलेले आहेत, अशा उद्योगांना महिला उद्योग म्हटले आहे. अशा उद्योगाची मालकी व नियंत्रण एखाद्या स्त्रीकडे किंवा स्त्रियांच्या गटाकडे असणे गरजेचे आहे तथापि वरील व्याख्या स्त्रियांच्या उद्योजकतेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अडथळा ठरू शकते. ही बाब लक्षात आल्यानंतर भारत सरकारने त्यात सुधारणा केली. या सुधारित व्याख्येनुसार स्त्री उद्योग हे प्रामुख्याने लघुउद्योग, उद्योगांशी संबंधित सेवा किंवा व्यावसायिक उपक्रम, भागीदारी, सहकारी संस्था किंवा खाजगी ( मर्यादित ) प्रमंडळ ह्यांपैकी कोणत्याही संघटनेद्वारा केले जातात. स्त्री उद्योगाचा कारभार प्रत्यक्षात एका किंवा जास्त स्त्रियांकडूनच सांभाळण्यात येतो व उद्योग-व्यवसायाच्या भांडवलामध्ये स्त्रियांचे व्यक्तिगत किंवा संयुक्त भांडवल किमान ५१% असणे गरजेचे असते.

स्त्री उद्योजकता बर्‍याच अंशी पुरुषांच्या पाठिंब्यावर अवलंबून असते. अनेकदा त्यांची मालकी असलेल्या उद्योगांमध्ये स्त्रियांचे अस्तित्व नाममात्र असते. काही मोजक्या उद्योगांमध्ये स्त्री उद्योजक सक्रिय असतात. भारतात बहुसंख्य स्त्री उद्योजक ह्या मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय किंवा श्रीमंत कुटुंबांतून आलेल्या असतात. उच्च सामाजिक स्थान व आर्थिक संपन्नता ही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असते. त्यांच्यापैकी अनेक स्त्री उद्योजकांच्या बाबतींत माहेरी व सासरी अशा दोन्ही ठिकाणी व्यापार-व्यवसाय व उद्योगांची परंपरा आणि आर्थिक समृद्धी असते. पुरुष उद्योजकांच्या तुलनेत स्त्री उद्योजकांच्या प्रेरणा ( मोटिव्ह्ज ) काहीशा वेगळ्या असतात. विधायक कार्यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवणे, स्वतःची आवड जोपासणे, आर्थिक स्वातंत्र्य, सन्मान व प्रतिष्ठा मिळविणे ह्या स्त्री उद्योजकांच्या प्रमुख प्रेरणा असतात. त्यांच्या अधिप्रेरणांवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. त्यांचे व्यक्तिगत जीवन, सासरची मंडळी, वैवाहिक व कौटुंबिक जीवन ह्या सर्व बाबींचा त्यांच्या उद्योजक बनण्याच्या निर्णयावर, उद्योजक म्हणून कामकाज करण्यावर, त्यांना अनुभवाव्या लागणार्‍या अडचणींवर, तसेच त्यांच्या व्यावसायिक यश किंवा अपयशावर निश्चित असा परिणाम होतो. सध्या शासनाच्या विविध योजना व सवलतींमुळे स्त्री उद्योजकांच्या संख्येत बर्‍यापैकी वाढ होत आहे. स्त्रियांची सामाजिक पार्श्वभूमी, साक्षरता, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय व बाजारपेठांचे आकलन, शासकीय धोरण या सर्व घटकांचा त्यांच्या उद्योजकतेवर प्रभाव पडतो. आपल्या बुद्धीचा, क्षमतेचा, कौशल्याचा, वेळेचा व संबंधांचा योग्य उपयोग करून घेणे, आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे, नवनवीन आव्हाने स्वीकारणे, समाजात स्वतंत्र स्थान निर्माण करणे व आपल्या आर्थिक व सामाजिक स्थितीमध्ये सुधारणा करणे या विचारांनी प्रेरित होऊन अनेक स्त्रिया उद्योजक बनतात. त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, रोजगार उपलब्ध व्हावा, उपजीविकेसाठी पैसे मिळवावेत व कौटुंबिक जीवन सावरावे यांसाठी स्त्रिया एक तर व्यवसाय सुरू करतात किंवा व्यवसायात  नोकरी स्वीकारतात.

अलीकडे सर्वच विकसनशील देशांत स्त्री उद्योजकतेचा विकास करण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सामान्यपणे अशा प्रयत्नांच्या तीन पायर्‍या संभवतात. त्यांमध्ये ज्या स्त्रियांमध्ये उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवृत्ती, पात्रता व महत्त्वाकांक्षा आहेत, अशा स्त्रियांचा शोध घेणे मुलाखती व विविध चाचण्यांच्या माध्यमातून उद्योजकीय योग्यता असलेल्या स्त्रियांची निवड केल्यानंतर, अशा स्त्रियांना उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये रीतसर सहभागी करून घेऊन त्यांना पद्धतशीर प्रशिक्षण देणे आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण घेतलेल्या स्त्रियांना उद्योग-व्यवसायाची उभारणी करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणे, त्यांना विविध यंत्रणांकडून वित्तीय व इतर मदत मिळवून देणे. तसेच त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणे या बाबींचा समावेश होतो. प्रसंगी पुरुष उद्योजकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीवर किंवा मुलीवर उद्योगाची जबाबदारी येऊन पडते. त्यांच्याकडे आवश्यक ती व्यवस्थापकीय व संघटनात्मक कौशल्ये नसल्यास उद्योग-व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण होते. काही स्त्रिया त्यांना कोणीतरी प्रोत्साहन व मदतीचा हात दिल्यामुळे जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर उद्योजक बनण्याचा निर्णय घेतात. योगायोगाने अगर अपघाताने व्यवसायात आलेल्या स्त्रियांचे व्यावसायिक यश पुरेशी साधने, विश्वासू कर्मचारी, निर्णय घेण्याची व संवाद साधण्याची क्षमता आणि बाजारपेठेचे ज्ञान यांवर अवलंबून असते. काही प्रसंगी पुरुष उद्योजक शासकीय योजनांमध्ये लाभ मिळविण्यासाठी आपले भांडवल गुंतवून पत्नीच्या नावाने नवीन व्यवसाय सुरू करतात, तेव्हा ती स्त्री कागदोपत्री उद्योगाची मालक असते प्रत्यक्षात पुरुष उद्योजकच व्यवसायाचे संचलन व नियंत्रण करीत असतात.

सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात स्त्री उद्योजकतेला साहाय्य करणारे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गुण स्त्रियांमध्ये उपजतच असतात. नैसर्गिक क्षमता, शांत व सहनशील स्वभाव, तणाव व संकटे हाताळण्याची कसोशी, सत्तेमध्ये इतरांना सहभागी करून घेण्याची क्षमता अशा गुणवैशिष्ट्यांमुळे त्या त्यांचे कार्य कार्यक्षमतेने करू शकतात. समाजाचा स्त्रियांबाबतचा जो पारंपरिक दृष्टिकोण होता, त्यामध्ये आता झपाट्याने बदल घडून येत आहे. शिक्षणाचा प्रसार व स्त्रीशिक्षणाला दिले जाणारे प्राधान्य, उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी, नागरीकरण व स्वयंरोजगाराच्या संधीत होणारी वाढ ह्या सामाजिक घटकांत होणारे बदलही त्यासाठी पोषक ठरतात. विकसनशील देशांमधील स्त्रियांचे सामाजिक स्थान, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे हक्क व आवश्यक असलेल्या सवलती यांबाबत स्त्रियांच्या चळवळी उभ्या राहत आहेत. स्त्रियांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर होणार्‍या अधिवेशनांमध्ये त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चेद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामुळे स्त्रियांच्या उद्योजकता चळवळीला बळ मिळत आहे. स्त्रियांच्या उद्योजकतेला सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी देशाच्या व जागतिक अशा दोन्ही पातळ्यांवर स्त्री उद्योजकांच्या काही संघटना कार्यरत आहेत. भारतात स्त्री उद्योजकांची राष्ट्रीय परिषद ( इंडियन काउन्सिल ऑफ विमेन ऑन्त्रप्रनर्स ), तसेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( एफ्आय्सीसीआय् ) ह्या सर्वोच्च व्यावसायिकांच्या संघटना स्त्री उद्योजकांना साहाय्य करीत आहेत. शासनाचे स्त्रियांच्या उद्योजकतेला साहाय्यक असणारे पुरोगामी धोरण व देऊ केलेल्या सवलती हा स्त्री उद्योजकतेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. स्त्रियांना विकास कार्यक्रमामध्ये सर्व पातळ्यांवर सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने नियोजन मंडळाने विविध पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक तरतूदीसह उपयुक्त सूचना केलेल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँका, वित्तीय महामंडळ, राज्य औद्योगिक विकास महामंडळे व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत स्त्री उद्योजकांना कर्ज, अर्थसाहाय्य ( सबसिडी ), अनुदाने व तांत्रिक सल्ला उपलब्ध करून दिले जात आहेत. आय्आर्डीपी, नाबार्ड, स्टेट बँक, स्त्री–शक्ती योजना, विमेन डिव्हेलप्मेंट कॉर्पोरेशन, इंदिरा महिला केंद्र, राष्ट्रीय महिला कोश, इंदिरा प्रियदर्शनी योजना, महिला उद्यम व महिला विकास निधी, वर्किंग विमेन फोरम या शासकीय योजनांद्वारे स्त्री उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.


उद्योजक म्हणून कार्यरत असताना अगदी उद्योगाची स्थापना करण्यापासून त्याचे दैनंदिन कामकाज पार पाडताना स्त्री उद्योजकांना अनेक प्रकारच्या अडचणी व अडथळ्यांना सामोरे जावे लागते. एक तर उद्योजक म्हणून महिला उद्योजकांच्या पुढे येणार्‍या अडचणी व त्याला जोडूनच स्त्री म्हणून त्यांच्यापुढे येणार्‍या अडचणी. कित्येकदा स्त्री असणे हीच तिच्या समोरील सर्वांत मोठी अडचण ठरते. एक उद्योजक म्हणून येणार्‍या अडचणींमध्ये अव्यवहारी प्रकल्प, तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्याची कमतरता, मालकी हक्काबद्दलचे वाद, अपुरे भांडवल, कायदेशीर अडथळे, बाजारपेठांबाबतचे अज्ञान, अभिप्रेरणांचा अभाव, प्रतिकूल अशी शासकीय धोरणे, धार्मिक प्रथा व परंपरा, कच्चा माल व वीजपुरवठा टंचाई इत्यादींचा समावेश होतो. अनेकदा पायाभूत सोयी-सुविधा नसल्यामुळे एखादा प्रकल्प पुढे नेता येत नाही. राजकीय व आर्थिक अस्थैर्य, तसेच स्पर्धात्मक वातावरण या गोष्टीही उद्योजकांच्या मार्गात अडचणी ठरू शकतात. शिवाय महिला उद्योजक म्हणून त्यांच्यापुढे अनेक अडचणी व अडथळे येतात. त्यांमध्ये प्रामुख्याने पुरुषप्रधान संस्कृती, कौटुंबिक जबाबदार्‍या, शिक्षणाचा अभाव, अनुभव व माहिती नसणे, आर्थिक समस्या, जोखीम न पतकरण्याची मानसिकता, सामाजिक बंधने, रूढी व परंपरा या गोष्टींचा समावेश होतो. पुरुषप्रधान, परंपरावादी व रूढीप्रिय समाजात स्त्रीला पुरुषापेक्षा नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. घर हेच तिचे कार्यक्षेत्र समजून परावलंबित्वाची भावना तयार केली जाते तथापि ही परिस्थिती हळूहळू बदलत चाललेली असून स्त्रिया औद्योगिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू लागल्या आहेत. पाश्चिमात्य देशांत, उदा., यूरोप, अमेरिका येथे महिला उद्योजकांची संख्या जवळपास पुरुष उद्योजकांच्या बरोबरीने आहे. भारतातही दिवसेंदिवस स्त्री उद्योजकांचे प्रमाण वाढत आहे. शिक्षणाच्या प्रसारामुळे जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी व आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक असा आत्मविश्वास या गोष्टी प्रामुख्याने नवीन महिला उद्योजक निर्माण होण्यास साहाय्यक ठरत आहेत. अन्य उद्योग-व्यवसायांतून सुरुवात करून यशस्वी ठरलेल्या एवढेच नव्हे, तर देश-विदेशातही नाव कमावणार्‍या काही भारतीय महिला उद्योजक पुढील-प्रमाणे : इंद्रा न्यूया ( प्रेसिडेंट — पेप्सी कं.), नैना लाल किडवानी ( जन. मॅनेजर — एच्एस्बीसी ग्रुप इंडिया ), किरण मुझुमदार-शॉ ( जन. मॅनेजर — बायकॉन लिमिटेड ), इंदू जैन ( चेअरमन — टाइम्स ग्रुप ), चंदा कोचर ( सीईओ अँड मॅनेजिंग डायरेक्टर — आय्सीआय्सीआय् ), एकता कपूर ( सीईओ — बालाजी टेलिफिल्मस् ). जागतिक स्तरावरही ओप्राह विन्फ्रे, जे. के. रोलिंग, झांग चीन, येलेना बाटूरिना, जुली मेयेर, एल्. के. बेनेट या महिला उद्योजक आघाडीवर आहेत.

औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या स्त्रिया एक तर उद्योजक म्हणून व दुसरे म्हणजे कामगार ( कर्मचारी ) म्हणून भूमिका बजावत असतात. एक कामगार म्हणून तिच्यावर अनेक मर्यादा येतात. नोकरीच्या ठिकाणी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. स्त्रिया विशिष्ट प्रकारची कामे करू शकत नाहीत, असा सामाजिक दृष्टिकोण असल्याने त्यांच्याकडे परिचारिका ( नर्स ), शिक्षिका, डॉक्टर्स, तसेच माहिती-तंत्रज्ञान व कार्या-लयीन स्वरूपाची कामे सोपविली जातात. ज्या स्त्रिया उच्चविद्याविभूषित असतात त्यांनाही नोकरी देताना बरेचदा दुय्यम स्थान दिले जाते. अलीकडे स्त्रिया अभियंता, व्यवस्थापक, शास्त्रज्ञ यांसारख्या पदांवर काम करण्यास पात्र व सक्षम असल्या, तरी शक्यतो पुरुष कर्मचार्‍यांनाच नोकरीच्या वा बढतीच्या बाबतींत प्राधान्य दिले जाते. काही ठिकाणी तर स्त्रिया पुरुषां-प्रमाणेच किंवा त्याच दर्जाचे काम करीत असल्या, तरी त्यांना कमी वेतन दिले जाते. विशिष्ट अशा सामाजिक मानसिकतेमुळे पुरुषांप्रमाणेच कार्यरत असलेल्या स्त्रियाही इतर स्त्रियांना सहकार्य करण्यात टाळाटाळ करतात. परिणामतः अनेक स्त्रिया गुणवत्ता असूनही बढतीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. स्त्रियांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नोकरी करावी लागते. शिवाय त्यांना मिळणारे वेतन एक तर वडिलांकडे किंवा पतीकडे सुपूर्द करावे लागते. आर्थिक स्वातंत्र्य मिळावे व इतरांवर अवलंबून रहावे लागू नये, यासाठी नोकरी करण्याची जी प्रेरणा असते तिलाच त्यामुळे हरताळ फासला जातो. काही खाजगी व असंघटित क्षेत्रांत तर स्त्री कामगारांना प्रसूतीसाठीची रजाही मंजूर केली जात नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. 

  कामगार संघटना या स्त्री कामगार संघटनांच्या बाबतीत म्हणावे तेवढे लक्ष घालताना दिसत नाही. त्या दृष्टीने त्यांना नोकरीच्या ठिकाणी मिळणारी सुरक्षितता,सोयी-सुविधा व प्रोत्साहन यांबाबत सकारात्मक दृष्टीने विचार होणे महत्त्वाचे ठरते. खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, सेवा क्षेत्रात होणारी प्रचंड वाढ, तसेच स्त्रियांना नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे शासकीय धोरण यांमुळे स्त्री कामगारांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. 

 संदर्भ : 1. Gupta, B. L. Mahamaya, Anil Kumar, Entrepreneurship Development, New Delhi, 2009.

            2. देशमुख, प्रभाकर, उद्योजकता विकास संकल्पना व व्यवहार, नागपूर, 2002.              

चौधरी, जयवंत