सोडत : (लॉटरी). चिठ्ठ्या टाकून वा ओली-सुकी (टॉस करणे) किंवा अन्य पध्दतीने ज्याचे नाव येईल, त्याला बक्षिस वा रोख रक्कम देण्याचा एक जुगारी खेळ. सोडतीचे नियम व नियंत्रण राष्ट्रीय व राज्य पातळीवर शासन करते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सोडत व तत्सम जुगार प्रकार अमेरिका व बहुसंख्य यूरोपीय राष्ट्रांत अवैध म्हणून घोषित करण्यात आले. ही परिस्थिती दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या अखेरपर्यंत कायम होती. १९६० नंतर विविध करांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोडीला महसूल वाढविण्याचे आणखी एक साधन म्हणून सोडती आणि जुगारगृहे (कॅसिनोस) सुरू करण्यात आली. सोडतींचे अनेक प्रकार प्रचलित होऊन त्यांत प्रामुख्याने जिंकणाऱ्या व्यक्तीला विशिष्ट रक्कम किंवा वस्तूच्या स्वरूपात बक्षिस देण्याची पद्धत रूढ झाली. परंतु सदर पद्धतीत सोडतीची तिकिटविक्री कमी झाल्यास संबंधित यंत्रणेला तोटा होण्याची शक्यता अधिक म्हणून तिकिटविक्रीतून मिळणाऱ्या उत्त्पन्नाच्या जवळपास पन्नास टक्के रक्क्म बक्षिसनिधी (प्राइज फंड) म्हणून गृहीत धरण्यात येऊ लागला. विद्यमान बहुसंख्य सोडतींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती विशिष्ट क्रमांकाची तिकिटे खरेदी करून आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न करतात. विनासायास बक्षिस मिळण्याचा आनंद लुटता यावा व झटपट श्रीमंत होता यावे, हा त्यामागे उद्देश असतो. तिकिटे खरेदी केल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा होणारा अपेक्षित व संभाव्य लाभ जास्त असेल असा विचार यापाठीमागे असतो.

चिठ्ठ्या टाकून संपत्तीची विभागणी करण्याची पध्दत जुन्या करारात (क्र. २६:५५-५६) आढळते. हिब्रू लोक देवापुढे चिठ्ठ्या टाकून जो निर्णय येईल, तो देवाने केलेला आहे, असे मानीत. प्राचीन चीनमध्ये हॅन घराण्याच्या कारकिर्दीत (इ. स. पू. २०५-१८७) हस्तलिखितस्वरूपातील केनो चिठ्ठया (केनो स्लिप्स) सोडतीसाठी वापरल्या जात. या माध्यमातून चीनी शासनाने चीनच्या जगप्रसिध्द भिंतीच्या प्रकल्पाला अर्थपुरवठा केला. त्याचसुमारास यूरोपमध्ये रोमन राजवटीत रात्रीच्या मेजवानीच्या प्रसंगी मनोरंजनाचा एक भाग म्हणून सोडती काढल्या जात. रोमन सम्राट नेरो, ऑगस्टस सीझर यांनीे तिकिटविक्रिच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढविणे, इमारती बांधणे व त्याचबरोबर विजयी सेनापतींना बक्षिसे देणे यांकरिता सोडती सुरू केल्याचा उल्लेख आढळतो. पंधराव्या शतकात यूरोपमध्ये सोडत सुरू झाली. त्यावेळी बर्गंडी व फ्लेंडर्स येथील नगरांच्या संरक्षण भिंतीसाठी किंवा गरिबांना मदत करण्याकरिता पैसा उभारणासाठी सोडत कार्यवाहीत झाली. फ्रान्सच्या पहिल्या फ्रान्सिसने अनेक शहरांतून १५२०-१५३९ दरम्यान उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी व सार्वजनिक सोडतीची परवानगी दिली. त्यानुसार पहिली सोडत बक्षिसांसाठी फ्लॉरेन्समध्ये यशस्वीरीत्या पार पडली. ती अन्य इटलीच्या नगरांतून लोकप्रिय झाली. पुढे इटलीचे एकीकरण झाल्यानंतर पहिली राष्ट्रीय सोडत उत्पन्न वाढविण्यासाठी कृतीत आली (१८६३). तत्पूर्वी १५६६ मध्ये पहिल्या एलिझाबेथ राणीने सोडतीस औपचारिक स्वरूप दिले होते. त्यानुसार पहिली सोडत धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या देखभालीसाठी आणि बंदराच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने १५६९ मध्ये काढली. प्रत्येक तिकीट खरेदीदाराला चांदीचे तबक अगर मौल्यवान वस्तू बक्षिसांच्या स्वरूपात दिली जायची. तिकिटावर अशा बक्षिस वस्तूंची चित्रे छापली जात. सुरुवातीला तिकिटांची विक्री शासकीय पातळीवर केली जात असे. नंतर त्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती करण्यात यायची. हेच मध्यस्थ पुढे भाग-भांडवल बाजारात दलाल (ब्रोकर्स) म्हणून नावारूपाला आले. शासकीय सोडतीबरोबरच अमेरिकेतील जेम्सटाऊन येथे आर्थिक स्तर सुधारावा व प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध व्हावा या हेतूने व्हर्जिनिया कंपनी ऑफ लंडनने खाजगी सोडतीही सुरू केल्या. इंग्लिश स्टेट लॉटरी जवळपास १६९४ ते १८२६ पर्यंत कार्यरत असल्याचे दिसून येते. तसेच इंग्लिश लॉटरी सु. २५० वर्षे चालली. इंग्रजांच्या अमेरिकेतील वसाहतीमध्ये खासगी तसेच सार्वजनिक प्रकल्पांना अर्थसाहाय्य पुरवण्यास सोडतींनी हातभार लावला. १७४४ ते १७७६ च्या सुमारास जवळपास दोनशे सोडतींना मंजुरी देण्यात येऊन त्या माध्यमातून रस्ते, ग्रंथालये, चर्च, विद्यापीठे, महाविद्यालये, पाटबंधारे, पूल इ. बांधकामांसाठी अर्थपुरवठा मिळाला. १७४० मध्ये अमेरिकेतील प्रिन्सटन व कोलंबिया विद्यापीठाच्या स्थापनेसाठीचा खर्च सोडतीद्वारे करण्यात आला. तर १७५५ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या स्थापनेसाठी अकॅडेमी लॉटरी काढण्यात आली. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युध्दासाठी निधी जमा करण्यासाठी काँटिनेन्टल काँग्रेसने सोडतीच्या मार्गास मतदान केले (१७७६). अमेरिकेच्या आठ राज्यांत १८३२ च्या सुमारास ४२० सोडती झाल्याची नोंद बॉस्टन मर्कंटाइल जर्नलने केली होती. या अतिरेकाचा परिणाम पोस्टमास्तर व त्यांचे साहाय्यक यांना सोडतीची तिकिटे विकण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्याच सुमारास आर्थिक गैरप्रकारामुळे सोडतींबाबत वाद निर्माण झाले. परिणामत: एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला अनेक राज्यशासनांनी सोडतीवर प्रतिबंध लादले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांनी संसदेला (काँग्रेस) सोडतीवर निर्बंध लादण्याचे व त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचे आदेश दिले (१८९०). तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने १९०० मध्ये सोडतीवर बंदी घातली. तत्पूर्वीच फ्रान्समध्ये ही संकल्पनाच नष्ट करण्यात आली (१८३६) मात्र ऑस्ट्रलिया या बाबतीत अत्यंत आघाडीवर असलेले राष्ट्र असून तिथे १८४९ मध्ये सुरू झालेली सोडत (लॉटरी) आजमितीस चालू असून दर आठवड्याला दहा लाखाहून अधिक तिकिटे विकली जातात. त्यातून अनेक मोठ्या वास्तू बांधण्यात आल्या.

विसाव्या शतकात सोडतींच्या नियमात व स्वरूपात आमूलाग्र बदल झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चीन सोडता जगातील बहुतेक प्रमुख देशांत ही जुगार सदृश सोडत पध्दती खासगी व शासकीय पातळीवर कार्यरत होती. भारतातही काही अपवाद वगळता ती १९९५ पर्यंत कार्यरत असल्याचे दाखले मिळतात. भारतात केंद्र शासनाच्या यासंबंधीच्या नियमावलीनुसार अनेक राज्यांत सोडती काढल्या जात असत. भारतात प्रथम केरळ राज्याने सोडतीची (लॉटरीची) सुरुवात १९६७ मध्ये केली आणि त्याचवर्षी महाराष्ट्र राज्यानेही तिला प्रारंभ केला. देशात सिक्कीम राज्याची प्लेवीन इंडियन लॉटरी लॉटरीचा क्रमांक लागतो. आपल्याकडे लॉटरी हा जुगाराचा प्रकार असल्याने सर्वसाधारणपणे त्याचा द्वेष केला जातो. अनेक राज्य शासनांनी सोडतींवर कडक निर्बंध घातलेले आहेत, तर काही राज्यांनी सोडतींना परवानगी दिलेली नाही. सोडतीचे बक्षिस मिळण्याची शक्यता किंवा संभाव्यता (प्रॉबॅबिलिटी) हे तिचे स्वरूप, एकूण तिकिटे, काढले जाणारे क्रमांक, त्यांचे क्रम व काढलेले क्रमांक पुढील सोडतींत समाविष्ट केले जातात किंवा कसे या सर्व घटकांवर अवलंबून असते.

महाराष्ट्रात सोडतीच्या मार्गाने निधी उभा करावा किंवा नाही, यांवर साधक-बाधक चर्चा झाली तथापि १९६७ नंतर महाराष्ट्राबरोबरच अनेक राज्यांनी सोडत सुरू करून लोकांना नशीब अजमावण्याची संधी दिली. पुढे सोडतीच्या रकमेत एप्रिल १९८७ मध्ये बदल करण्यात आला आणि दरमहा १ कोटी, ६० लाख रुपयांची ३३ लाख ४२ हजार बक्षिसे देण्याचे ठरले. त्यानंतर महाराष्ट्रात मिनी लॉटरी प्रविष्ट झाली आणि तिला पुष्कराज लॉटरी, मासिक सोडत, सागरलक्ष्मी, अक्षय साप्तहिक सोडत, पद्मिनी साप्तहिक सोडत, विश्वमोहिनी मासिक सोडत अशा नावांखाली सोडती होत असत. तसच दिवाळी-नाताळ-पाढवा अशा सणानिमित्त सुपर बंपर ड्रॉ अशा सोडती विसाव्या शतकाअखेर प्रत्यक्ष कार्यवाहीत होत्या. या उलाढालीत सु. १५०० एजंट व उपएजंट कार्यरत होते आणि सोडतीपासून वार्षिक सु. ७ कोटींचे उत्पन्न राज्याला मिळत असे. आतापर्यंत (१९९५-९६) ८०० सोडती झाल्या असून या मार्गाने निव्वळ १२५ कोटींचा निधी शासनाला उपलब्ध झाला मात्र सोडतीला बंदी करावी, हा धोरणात्मक निर्णय जून १९९५ मध्ये जाहीर करण्यात आला आणि शासकीय पातळीवर तरी हा सोडतीचा जुगार सदृश खेळ थांबला आहे.

सोडत हा जुगाराचा एक प्रकार असल्याने त्याचे काही दुष्परिणाम संभवतात. ज्या सोडतीमध्ये प्रचंड रकमेची बक्षिसे दिली जातात, तेथे बक्षीस मिळणाज्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. तसेच त्या व्यक्तीची जीवनशैली एकाएकी बदलल्याने त्यांना अतिचार (ॲनोमी) वाटण्याची शक्यता असते. काहीही कष्ट न करता नशीब अजमावण्याची प्रवृत्ती निर्माण होते. समाजात आपली बुद्धी व क्षमतांचा वापर न करण्याची भावना वाढते. क्वचितप्रसंगी सोडत काढण्याच्या यंत्रात फेरफार करून फसवणूकही केली जाऊ शकते.

चौधरी, जयवंत