महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ : महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थापिलेले महामंडळ. महाराष्ट्रात पुरातन कला व शिल्प, निसर्गसौंदर्य धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणे, वन्य पशुपक्ष्यांची अभयारण्ये इ. पर्यटकांसाठी आकर्षक स्थळे आहेत. मुंबई शहर जगाच्या प्रमुख सामुद्री व हवाई मार्गांवर असून ते भारतातील इतर शहरांशी खुष्कीच्या व हवाई मार्गांनी जोडलेले असल्याने भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी ५४ टक्के पर्यटक मुंबईला व महाराष्ट्राला भेट देतात. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटनव्यवसायाला चालना देऊन त्याचा विकास करण्यासाठी व तत्संबंधीच्या शासकीय बाबींची योग्य व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन संचालनालय नेमलेले आहे. या संचालनालयाची प्रचालनात्मक आणि वाणिज्यिक स्वरूपाची कामे करण्यासाठी ‘ महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडाळा ‘ ची २० जानेवारी १९७५ रोजी स्थापना झाली असून संचालनालयाकडे आता फक्त नियामक व शासकीय स्वरूपाची कार्ये आहेत.

महामंडळ पुढील कार्ये करते : (१) सहली : पर्यटकांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील व गोव्यातील ठिकाणांना भेट देण्यासाठी महामंडळाने मुंबई व पुणे येथून दैनंदिन, व्दिसाप्ताहिकी किंवा मोसमी सहलींची व्यवस्था  केली आहे. याशिवाय इतर राज्यांतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यटक-समूहांसाठी त्याच्या इच्छेनुसार महामंडळ सहली आयोजित करते. सहलींसाठी महामंडळाच्या मालकीच्या आराम बसगाड्या, वातानुकूलित बसगाड्या व प्रवासी टॅक्सी-गाड्या आहेत.

(२) पर्यटक निवास, हॉटेले व उपाहारगृहे : महाराष्ट्रात पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या २५ ठिकाणी महामंडळाने एकूण ३,००० च्या वर  पर्यटकांची सोय होईल, असे पर्यटक निवास व शिर्डी येथे पहिल्या दर्जाचे हॉटेल बाधंलेले आहे. औरंगाबाद येथे आशियामधील एक आदर्श म्हणून वाखाणलेले युवक वसतिगृह आहे. याशिवाय पुणे येथे महानगरपालिकेकडून भाडेपट्ट्याने घेतलेले ‘हॉटेल सारस ’ महामंडळ चालविते. त्याचप्रमाणे काही पर्यटक निवासांतील उपाहारगृहांचे व्यवस्थापनही ते करते.

(३) स्मरणवस्तू : कागद, धातू, लाकूड, काच, कापड इत्यादींपासून स्मरणवस्तू तयार करून त्यांची विक्री करणे.

(४) प्रसिद्धी : पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणांची माहिती प्रसृत करणे व निरनिराळ्या प्रकारचे माहितीवजा साहित्य, चित्रपट, माहितीपट, श्राव्य दृश्ये तयार करणे इत्यादी. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यांपैकी काही कृतींना पारितोषिके मिळाली आहेत.

(५) विकास कार्य : निरनिराळ्या प्रकारच्या स्थानांचा पर्यटकीय दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी तेथे पर्यटक-निवास व इतर प्रकारची वसतिस्थाने बांधणे व त्या स्थानांची शोभा वाढविणे.

महामंडळाचे ३१ मार्च १९८० रोजी भरणा झालेले भाग भांडवल १·७५ कोटी रु. होते. याशिवाय ९६·४ लक्ष रु. कर्ज शासनाने पुरविले होते. याव्यतिरिक्त महामंडळास वित्तीय संस्थांकडून कर्जे उपलब्ध होतात. ३१ मार्च १९८० रोजी महामंडळाकडे भांडवल, कर्जे व दायित्वे आणि तरतुदी मिळून ४·५८ कोटी रु. वित्त होते. सुरुवातीपासून बरेचसे पर्यटक-निवास व्यवहार आतबट्ट्याचे असल्याने महामंडळ तोट्यात असून ३१ मार्च १९८० पर्यंत तोट्याची एकूण रक्कम १·६९ कोटी रुपये झाली होती. परंतु त्यानंतर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे ही परिस्थिती हळूहळू सुधारत गेली.

पेंढारकर, वि. गो.