महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ : भारतातील या क्षेत्रातील संस्थामधील एक अग्रेसर संस्था. १९६२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मालकीची  खाजगी मर्यादित कंपनी या स्वरूपात महामंडळाची स्थापना झाली. १९७१ मध्ये त्याचे सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतर झाले व त्याच्या एक कोटी रु. हून अधिक भरणा झालेल्या भांडवलापैकी ९२·७ लाख रु. महाराष्ट्र शासनाने व ७·५ लाख रु. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या शासनाने पुरविले. मार्च १९८१ अखेर महामंडळाचे भाग भांडवल ३·७७ कोटी रु., राखीव निधी ०·२८ कोटी रु. व कर्जे २·०६ कोटी रु. असे एकूण भांडवल ६·११ कोटी रु. होते. महामंडळाच्या व्यवस्थापनासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापन-संचालक व ६ सदस्यांचे शासननियुक्त संचालक मंडळ आहे. प्रारंभी हे महामंडळ लघुउद्योग घटकांना लागणारा देशी व आयात केलेला कच्चा माल मिळवून त्याचे रास्त किंमतीला वितरण करीत असे व देशी बनावटीची यंत्रसामग्री भाडे-खरेदी तत्त्वावर पुरवीत असे. ओघाओघाने महामंडळाच्या कार्याचा विस्तार होत गेला व जरी अजूनही वरील दोन कार्ये प्रमुख असली, तरी त्यांव्यतिरिक्त महामंडळ पुढील कार्येही करते : (१) लघुउद्योगांना वखारीच्या व विक्रीच्या सोयी उपलब्ध करणे, (२) त्यांचे उत्पादन सरकारी, निम-सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायांना विकण्यात साहाय्य करणे, (३) उत्पादित उपभोग्य मालाची मुंबई, नवी दिल्ली व नागपूर येथील शासनाच्या विविध वस्तूभांडारांतर्फे विक्री करणे व इतर शहरांत विकण्यासाठी सर्व प्रकारचे प्रवर्तनार्थी साहाय्य देणे, (४) उत्पादनाच्या निर्यातीसाठी साहाय्य देणे, (५) सुप्रसिध्द पैठणी साड्या, हिमरू शाली यांच्या उत्पादनासाठी व बिद्रीकामासाठी पैठण येथे केंद्रे आणि उमरेड येथे लोकरी कांबळी, कोल्हापूर येथे छत्र्यांचा व पुणे येथे मद्यार्क विकृतीकरण कारखाना चालविणे, (६) हस्तव्यवसायांचा विकास व त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यात मदत करणे, (७) बृहन्मुंबई विभागात सरकारच्या वतीने रोजगार प्रवर्तन कार्यक्रम चालविणे यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना मुंबईमध्ये कारखाना व सेवाकार्ये सुरू करण्यास १० टक्के वीज भांडवल साहाय्य देण्यात येते, (८) प्रवर्तकांना सल्ला देणे. यासाठी महामंडळाकडे माहितीपूर्ण शक्यता-अभ्यास, उपक्रम-रूपरेखा व बाजार-पेठ विश्लेषण यांचे समृद्ध ग्रंथालय आहे. (९) सिमेंटचा प्रत्यक्ष उपयोग करणाऱ्यांसाठी सिमेटची आयात महाराष्ट्र सरकारचा अभिकर्ता या नात्याने करणे.

महामंडळाने १९८०–८१ या वर्षात ४४·५ कोटी रु. मालाची उलाढाल केली व त्याचा लाभ नऊ हजार घटकांना मिळाला. यात ३०·९ कोटी रुपयांचा कच्चा माल महामंडळाने लघुउद्योगांना पुरविला. यापैकी लोखंड व पोलाद २६·४ कोटी रुपयांचे होते. लघुउद्योगाने तयार केलेला १३·१२ कोटी रुपयांचा माल विकला. यात पौष्टीक आहार (३ कोटी रु.) व आर. सी. सी. नळ ( २·४ कोटी रु.) मुख्य होते. महामंडळाच्या स्वतःच्या केंद्रांचा ४५ लाख रुपयांचा माल विकला गेला यापैकी विप्रकृत मद्यार्क ३८·९ लाख रुपयांचे होते. महामंडळाने बव्हंशी मुंबई–पुणे या औद्योगिक पट्ट्याबाहेरील १,२५४ घटकांना त्याच्या उत्पादन विक्रीत साहाय्य केले, तसेच १,०८५ व्यक्तींना ८३ लक्ष रु. बीज–भांडवल पुरविले.

पेंढारकर, वि. गो.