महात्मा फुले कृषि विद्यापीठ : महाराष्ट्रातील राहुरी (जिं. अहमदनगर) येथील कृषी विद्यापीठ. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९६७ अन्वये १९६८ मध्ये स्थापना. विद्यापीठास आद्य समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्यात आले. पंजाबराव कृषी विद्यापीठ अधिनियम १९६८ अन्वये वरील महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यात आली. कृषिशिक्षणास विशेष सवलती लाभून कृषिविज्ञानाचा विकास साधणे हा अधिनियमातील सुधारणेमागील हेतू आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर सातारा, सांगली आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र राज्यातील लागवडीखालील एकूण १९४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८० लाख हेक्टर म्हणजे ४०% क्षेत्र व पिकाखालील क्षेत्रापैकी ४१% क्षेत्र या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येते. कृषिशिक्षण, संशोधन व विस्तार या तिहींची सांगड घालून कृषिव्यवसायातील समस्यांची उकल करणे, हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.
विद्यापीठाने प्रतवारी पद्धतीचा अवलंब केला असून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा गुणांक ठरविण्यात येतो. विद्यापीठात विद्यार्थ्यांना खाजगी रीत्या परीक्षा देण्याची तरतूद नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रतिवर्षी वैद्यकीय चिकित्सा केली जाते. घटक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहातील निवासाची सोय आहे. विद्यापीठांतर्गत व सर्व महाविद्यालयीन ग्रंथालय मिळून ५६,००० ग्रंथ व १२,६७८ नियतकालिके होती (१९८३-८४). विद्यापीठात एकूण २,२०० विद्यार्थी असून याच वर्षाचे विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्न व खर्च अनुक्रमे ६.०५ कोटी व ६.१४ कोटी रु. होता.
विद्यापीठाची पाच घटक महाविद्यालये असून राहुरी येथे पदव्युत्तर शिक्षण संस्था (स्था. १९७२) आहे. पदवीपूर्व शिक्षण हे पुणे, धुळे व कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयांतून दिले जाते. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर शिक्षणपद्धती व मूल्यमापनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला. विद्यापीठामध्ये १९६८ पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणक्रमात त्रिसत व अंतर्गत मूल्यमापन पद्धती सुरू करण्यात आली. त्रिसत्र पद्धतीमध्ये प्रत्यक्ष शेतावर काम करण्याच्या कालमर्यादेत वाढ करण्यात आली तसेच कार्यानुभवाचा अभ्याक्रम समावेश करण्यात आला. पुढे १९७५-७६ सालापासून द्विसत्र पद्धत व अंतर्गत मूल्यमापन पद्धती पदवीपूर्व तसेच पदव्युत्तर महाविद्यालयांस लागू करण्यात आली. शिक्षणक्रमातील १०+२+३ या नव्या आकृतिबंधामुळे कृषिशिक्षणाची १९७७−७८ साली पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार १२ वी नंतर पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा कालवधी तीन वर्षे करण्यात आला. विद्यापीठाने १९८३-८४ पासून १०+२+३ हा आकृतिबंध बदलून त्याच्याऐवजी ४ वर्षांची पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठात ग्रामसेवक व सहायक ग्रामसेवक यांचा अनुक्रमे एक वर्ष व सहा महिन्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय कुशल कारागिरांना तंत्रज्ञानाची माहिती देणारा एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम मांजरी (पुणे) येथे सुरू करण्यात आला आहे. सकस आहार योजने मार्फत विद्यापीठीय क्षेत्रातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्याचे प्रशिक्षणवर्गही आयोजित केले जातात. कृषिविस्तार शिक्षण हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. प्रात्यक्षिके, सहली, मेळावे आदीद्वारे आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा प्रसार केला जातो.
कृषि खात्यामार्फत करण्यात येत असणारे संशोधनकार्य १ जुले १९६९ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे सोपविण्यात आले. विद्यापीठामार्फत करण्यात येणारे संशोधन प्रामुख्याने राहुरी, सोलापूर, पाडेगाव, निफाड व जळगाव येथील प्रमुख आणि अन्य १९ उपसंशोधन केंद्रामार्फत करण्यात येते. सोलापूर येथे कोरडवाहू शेतीसंबंधी तर पाडेगाव येथे ऊसपिकावर संशोधनकार्य करण्यात येते. जळगाव निफाड या संशोधन केंद्रांवर अनुक्रमे गळीतधान्ये व गहू या पिकांवर संशोधन केले जाते. सोलापूर येथील कोरडवाहू संशोधन केंद्रावर गेल्या १०० वर्षांतील पर्जन्यवृष्टीचे विश्लेषण करून अवर्षणप्रवण क्षेत्रात अनियमित व अनिश्चित होणाऱ्या पर्जन्यवृष्टीनुसार पीकलागवडीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विभागात खरीप व रब्बी हंगामांत या पिकाखाली अनुक्रमे ४,८६,६०० हेक्टर व २१,७०,१०० हेक्टर एवढे क्षेत्र आहे. खरीप ज्वारीवरील संशोधनकार्य या विद्यापीठातील राहुरी, धुळे, जळगाव, कराड, डिग्रज (जि. सांगली) या केंद्रांवर तसेच रब्बी ज्वारीवरील संशोधनकार्य राहुरी, मोहोळ, चास, जेऊर आणि सोलापूर येथे केले जाते. वडगाव, मावळ, इगतपुरी (नासिक) आणि राधानगरी या संशोधन केंद्रमार्फत भातावरील संशोधनकार्य करण्यात येते. कोल्हापूर येथील संशोधन केंद्रामार्फत मांजरी व ह्यूनिस हे मक्याचे संमिश्र वाण शोधून काढण्यात आले आहे. करडईची १४३−२० (‘तारा’), कांद्याची एन्−५३, डाळिंबाची ‘गणेश’, एरंडाची ‘गिरीजा’कापसाची ‘सावित्री’ ह्या जाती तसेच भुईमुगाची ‘फुलेप्रगती’ रब्बी ज्वारीची ‘एस्.पी.व्ही. ५०४’, हळदीची ‘कृष्णा’ वांग्याची ‘वैशाली’, हरभऱ्याची ‘विकास’, भेंडींची ‘सिलेक्शन-२-२’ या उन्नत जाती विद्यापीठाने शोधून काढल्या असून त्यांचा प्रसार सुरू आहे. ऊससंशोधनाचे कार्य पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे १८९२ साली सुरू केले पण १९३२ पासून त्याचे कार्यालय पाडेगाव येथे नेण्यात आले. उसाच्या मळीपासून अल्कोहॉल तयार केल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्पेंट वॉशचा खत म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने संशोधनकार्य हाती घेतले आहे.
बीजोत्पादन हे या विद्यापीठाचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. दरवर्षी विद्यापीठकक्षेतील विविध कृषी महाविद्यालये, कृषिसंशोधन केंद्रे व शेतकी शाळा यांच्या विविध प्रक्षेत्रांवर बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतला जातो. १९७७-७८ पासून हे विद्यापीठ राष्ट्रीय बीजोत्पादन कार्यक्रमाचा घटक म्हणून गणले गेले असून या योजनेनुसार मूलभूत व पायाभूत बियाणे उत्पादन करण्यासाठी व बीजप्रक्रियेसाठी ह्या विद्यापीठास आर्थिक अनुदान मिळू लागले आहे. लवकरच बीजोत्पादनाच्या कार्यक्रमाच्या बाबतीत हे विद्यापीठ स्वयंपूर्ण होईल.
मिसार, म. व्यं.
“