सामान्य शिक्षण : जे शिक्षण माणसाची विचारधारा निर्माण करते ते सामान्य शिक्षण होय. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक शक्तींचा उगम, विकास, परिपोष आणि त्याचा बुद्घिपुरस्सर अवलंब होय.

सामान्य शिक्षणात प्रत्येक व्यक्तीस आपल्या जीवनाचा हेतू आणि जीवनाचे सत्त्व कळण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे शिक्षण, जे व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचे साधन कोणते ते त्या व्यक्तीस ओळखण्यास मदत करते, ते सामान्य शिक्षण होय. व्यक्तीने समाजात कसे वागावे, परस्परसंबंध पूरक आणि प्रेरक व्हावे यासाठी कोणते नीतिनियम आचरावे, व्यक्तिगत जीवन आनंदी करीत असता इतरांना आनंद देता येण्याची क्षमता अंगी कशी बाणविता येते, हे संस्कार व्यक्तिव्यक्तींमध्ये निर्माण करणारे शिक्षण म्हणजे सामान्य शिक्षण. मनुष्याचा आत्मिक आणि कायिक विकास समाजाच्या उपयोगासाठी असायला हवा, हे सामान्य शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे.

सामान्य शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे : (१) सारासार विचार करून योग्य व सहित गोष्टींचा स्वीकार. (२) अयोग्य, समाजविघातक विचारसरणीचा निषेध व त्याग. (३) संस्कार आणि संस्कृतीची ओळख. (४) शारीरिक आणि मानसिक विकास.(५) श्रमांचे महत्त्व ओळखण्याची क्षमता. (६) स्वकष्टाने अर्थार्जन करण्याची क्षमता विकसित करण्याचे कौशल्य आणि दुसृयांवर विसंबून न राहण्याच्या वृत्तीचा विकास.(७) आत्मविश्वास वाढविण्याचे साधन.(८) विनाश्रम, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन अथवा वाममार्गाने कामे करण्याच्या वृत्तीचे निर्दालन करण्याची क्षमता. (९) आपले उद्दिष्ट, ध्येय-धोरण व मार्ग ठरविण्याचे सामर्थ्य. (१०) अदम्य आशावाद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांनी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे दायित्व.(११) इतरांचा योग्य मान राखण्याचे शिक्षण. (१२) न आवडणाऱ्या अवैध गोष्टींना ठाम नकार देण्याचे धैर्य.(१३) दिलेले काम वेळेवर आणि वेळेत संपविण्याचे कौशल्य व त्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी. (१४) व्यक्तिगत हितासाठी अधिकाराचा गैरवापर न करण्याची वृत्ती आणि आवश्यक असलेला विवेक व संयम. (१५) अयोग्य गोष्ट हातून घडल्यास चूक कबूल करण्याचे व शासन घेण्याचे धैर्य.(१६) ‘सत्यमेव जयते’ या वचनावर दृढ विश्वास सत्याची कास आणि सत्यासाठी लढण्याची तयारी. (१७) गुलामी व दबाव झुगारण्याची स्वयंसिद्घ क्षमता. (१८) सर्वांगीण आत्मिक आणि कायिक विकासाबरोबरच आपल्या शिक्षणाधारे योग्य व्यवसाय निवडण्याचे व परिश्रमाधिष्ठित अर्थार्जन करण्याचे कौशल्य. (१९) राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती जागविणारे शिक्षण. (२०) ‘हे तो विश्वचि माझे घर’ ही जगावर प्रेम करणारी वृत्ती व तिच्यातील औदार्य विकसित करण्याची शक्ती आणि आनंददायी जीवनाकडे वाटचाल.

सामान्य शिक्षण इतके बहुआयामी असल्याने आणि व्यक्ती ते समष्टी असा प्रवास करणारे असल्याने, पुस्तकी शिक्षणापेक्षा त्याचे महत्त्व मनुष्यमात्रास अधिक आहे.

सामान्य शिक्षणातून पंचकोशात्मक व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे गरजेचे आहे. शिक्षणाचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होय. अन्नमय शरीर, प्राणमय ओज (इंद्रियबल), विशुद्घ मन, प्रखर बुद्घी व ईश्वरी चेतनेचा अनुभव हे पाच पैलू किंवा कोश विकसित झाल्याने व्यक्तिमत्त्व विकसित होते. शिक्षणप्रक्रियेमधून या पाचही कोशांचा अधिकाधिक विकास साधण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये पंचकोशात्मक व्यक्तिमत्त्व घडविताना शालेय व्यवहारात, वेळापत्रकात, उपकमात त्यांचा अंतर्भाव जाणीवपूर्वक झाला पाहिजे आणि त्यासाठी कल्पक नियोजनाची आवश्यकता आहे. या पाचही कोशांची ओळख व त्यास पूरक उपकम यांचा अंतर्भाव शालेय दैनंदिनीत होणे अत्यावश्यक आहे.

मनाची विचारधारा या पंचकोश विकासातून सुदृढ बनते आणि म्हणूनच कुठल्याही पाठ्यपुस्तकीय शिक्षणापेक्षा हे शिक्षण प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी व सामाजिक जीवनात वावरतानाही व्यक्ती हे शिक्षण घेत राहते. पंचकोशात्मक शिक्षण जाणीवपूर्वक मिळावे म्हणून शिबिरांचेही आयोजन केले जाते. ‘गुरुकुल’ पद्घतीच्या शिक्षणात सामान्य शिक्षणावर भर दिला असल्याने तेथील विद्यार्थ्यांचा विकास सर्वांगीण होतो असा निष्कर्ष आहे. पुस्तकी शिक्षणापेक्षा सामान्य शिक्षण जगण्यास ‘सिद्घ’ करते म्हणून त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. आनंददायी व उत्तम नागरिक घडविणे, हे सामान्य शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट होय.

सामान्य शिक्षण ही संकल्पना तिच्यात उचित असा बदल करून उदार शिक्षण (लिबरल एज्युकेशन) व मानवतावादी शिक्षण (ह्यूमॅनिस्टिक एज्युकेशन) या नावांनीही अमेरिकेत आणि इतर प्रगत पाश्चात्त्य देशांत अलीकडे स्वीकारण्यात आली आहे. ⇨जॉन ड्यूईंच्या मते,‘मानवी मनाची सर्व तऱ्हेच्या संकुचितपणापासून मुक्तता करणारे शिक्षण म्हणजे उदार शिक्षण होय’, तर इ, एस्. वुडवर्ड म्हणतात, ‘व्यक्तीला संस्कृतीचा परिचय करून देणे आणि तिचे संवर्धन करण्याची प्रवृत्ती व शक्ती तिच्या ठायी निर्माण करणे, हे उदार शिक्षणाचे उद्दिष्ट असते’. उदार शिक्षणाचा हेतू सर्वंकष मानसिक विकास हा असून या विकासकार्यात ज्ञानसंपादनाच्या ज्या विविध शाखा साहाय्यभूत ठरतात, त्यांना उदारकला (लिबरल आर्ट्स) म्हणतात. यात मानव्यविद्या, गणितशास्त्र, जीवविज्ञान, भौतिकी व समाजशास्त्र या विद्याशाखांचा अंतर्भाव होतो.

मानवतावादी शिक्षण या संकल्पनेत सामान्य शिक्षणात अभिप्रेत असलेल्या काही बाबींचा अंतर्भाव होतो. मानवाचा स्वभाव आणि संस्कृती यांचा अभ्यास करून मानसशास्त्रज्ञांनी काही उपपत्ती विकसित केल्या आहेत. त्याद्वारे या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत एक विशाल मानवतावादी दृष्टिकोन येईल व तो बहुश्रुत होईल, अशी त्यांची धारणा आहे. या उपपत्तीनुसार मानवाच्या अध्ययनाचे बरेचसे निर्णय त्याच्या सर्जनशीलतेच्या प्रकटीकरणाच्या गरजेतून उत्पन्न होत असतात. कोणतीही क्रि याशीलता वा कृती, अगदी ॲथलेटिक्स, व्यापारविषयक व्यवहार किंवा घरगुती कामसुद्घा सर्जनशील निर्गम मार्ग (सेन्सिटिव्ह आउट्लेट) म्हणून दर्शविता येणे शक्य आहे. या प्रकारच्या शिक्षणक्षेत्रातील मानसशास्त्रज्ञ अशी भूमिका घेतात की, प्रत्येक व्यक्तीने आव्हानात्मक कृतींमध्ये स्वतःला गुंतवून घ्यावे आणि त्यांना त्या कृती स्वतःला समाधान लाभेल, या उद्देशाने मनापासून समजूतदारपणे कराव्यात. अशा कृतींमधून नियंत्रणाची क्षमता, त्या कृतीची व्याप्ती व वाढ आणि सम्यक ज्ञान यांचा लाभ त्या व्यक्तीस होतो. स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होण्यासाठी अध्ययनात विद्यार्थ्यांस स्वातंत्र्य असले पाहिजे, एवढेच नव्हे तर आपण त्या लायकीचे आहोत वा पात्र आहोत, ही भावना त्या विद्यार्थ्यांत निर्माण झाली पाहिजे आणि ते शिक्षण सापेक्षतः चिंतामुक्त करणारे असले पाहिजे. शिवाय त्यात विद्यार्थ्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही किंवा त्याचा अनादर होणार नाही, हेही पाहिले गेले पाहिजे. अशा प्राप्त परिस्थितीत त्याचा अंतरात्मा ज्ञानार्जनाकडे आपोआप जाईल. या बाबतीत काही एक समूह चिकित्सा साहाय्यक पर्यावरणाची भूमिका बजावेल आणि हे पर्यावरण विद्यार्थ्यांची वैचारिक जागृती करून त्यास सभोवतालच्या जगाविषयीची जाणीव करून देईल.

पहा : अध्यापन व अध्यापनपद्घति उदार शिक्षण प्राणायाम शारीरिक शिक्षण.

संदर्भ : १. काटदरे, लता, शिक्षणयात्रा, मुंबई, २००७.

२. पानसे, रमेश,शिक्षण : विचारमंथन, पुणे, २००८.

३. वाड, विजया, उत्तम शिक्षक होण्यासाठी, पुणे, २००८.

वाड, विजया