रवींद्र भारती विद्यापीठ : पश्चिम बंगाल राज्यातील एक विद्यापीठ. कलकत्ता येथे ८ मे १९६२ रोजी स्थापना. प. बंगाल राज्यशासनाने रवींद्रनाथ टागोर यांच्या वास्तूत नृत्य, नाटक व संगीत अकादमीची स्थापना केली (१९५६). पुढे टागोरांच्या १०१ व्या जयंतीच्या मुहूर्तावर राज्यशासनाने रवींद्र भारती विद्यापीठ स्थापन केले व त्यात वरील अकादमी समाविष्ट करण्यात आली. १९७५ साली राज्यशासनाने केलेल्या सुधारित अधिनियमानुसार विद्यापीठाचा कारभार चालतो.

पश्चिम बंगालमधील ललित कलांचे शिक्षण देणाऱ्या सर्व संस्था विद्यापीठाच्या कक्षेत येतात. जून-मे असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष आहे. विद्यापीठाशी ५८ संस्था संलग्न आहेत. विद्यापीठात एकूण ३,००० विद्यार्थी व ३०० प्राध्यापक होते (१९८५-८६). विद्यापीठात मानव्यविद्या, दृश्यकला, सर्व ललितकला (नाट्य, वाद्यसंगीत, कंठसंगीत) इ. विद्याशाखा आहेत. मानव्यविद्या कक्षांतर्गत इंग्रजी, बंगाली, संस्कृत, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, बंगाली लोककला व लोककथा, वेद वाङ्मय तसेच भारतीय तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय विद्यासंस्था व संस्कृत साहित्य यांचे सखोल अध्ययन केले जाते. या सर्व विद्याशाखांत रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनकार्याच्या अभ्यासाला अत्यंत महत्त्व दिले जाते. अध्यापनाचे माध्यम बंगाली व इंग्रजी आहे.

विद्यापीठाचे रवींद्र भारती संग्रहालय टागोर यांच्या वास्तूतच आहे. विद्यापीठात मानव्यविद्येतील पदव्युत्तर आणि टागोर वाङ्‌मयातील पदविका अभ्यासक्रमासाठी सायंकालीन वर्ग घेतले जातात. नृत्य, नाट्य व चित्रकला यांतील विशेष अभ्यासाची सोय विद्यापीठात आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या कला वाङ्मयाचा सखोल अभ्यास या विद्यापीठात होतो. बौद्ध धर्म आणि तौलनिक धर्म यांच्या अभ्यासाची सोय करण्याची विद्यापीठाची योजना आहे.

उन्हाळ्याच्या सुटीत बहिःशाल व्याख्याने, चर्चा व परिसंवाद विद्यापीठाच्या शिक्षकांद्वारे आयोजित करण्यात येतात. डिसेंबर १९६५ मध्ये स्थापन झालेली पश्चिम बंगाल नाट्य संगीत आणि ललित कला अकादमी ही विद्यापीठाची एक उपघटक संस्था म्हणून या कलांतील अभ्यास व संशोधनाचे कार्य करते.

विद्यापीठ अनुदानाच्या पाठिंब्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय प्रौढ शिक्षणाची सु. ६६ केंद्रे स्थापन करण्यात आली. त्यांतून सामाजिक विज्ञाने, नाटक आणि कंठसंगीत यातील अभ्यासक्रम निरंतर शिक्षण योजनेखाली राबविण्याचा विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. संदेशवहन तंत्रातील विशेषतः चित्रपट निर्मिती, आकाशवाणी व दूरचित्रवाणी यांवरील कार्यक्रमांची निर्मिती यांसंबंधीचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करण्याची योजना विद्यापीठाच्या विचाराधीन आहे.

मिसार, म. व्यं.