प्रगमनशील शिक्षण : एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी यूरोप-अमेरिकेत शिक्षणाचा प्रसार जसजसा वाढत चालला, तसतशा त्यातील मर्यादाही स्पष्ट होऊ लागल्या. या शिक्षणपद्धतीत मुके, बहिरे, अंध यांच्याप्रमाणे बुद्धिमंद आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी यांच्या शिक्षणाची पुरेशी सोय नव्हती. ब्रेल लिपीच्या शोधामुळे हा प्रश्न काहीसा सुटलेला होता. विद्यार्थ्यांना अध्ययनाचे स्वातंत्र्य दिले, शिक्षकांचे मार्गदर्शन पुरविले आणि पुरेसे अध्ययनसाहित्य उपलब्ध केले, तर चांगल्या शैक्षणिक वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्यास आवश्यक ते शिक्षण मिळू शकेल, हा विचार विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मांडण्यात येऊ लागला. हा विचार प्रगमनशील शिक्षणाचा पाया होय.

फ्रॅन्सिस पार्कर, जॉन ड्यूई व चार्ल्‌स एलियट हे अमेरिकन शिक्षणतज्ञ प्रगमनशील शिक्षणाचे जनक होत. १९२०-५० ह्या तीस वर्षांत या विचाराचे शिक्षणक्षेत्रात प्रभुत्त्व होते.

प्रगमनशील शिक्षणाची आधारभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील : (१) प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययन प्रक्रियेत स्वातंत्र्य असावे व भोवतालच्या परिस्थितीचा त्याला अधिकाधिक उपयोग व्हावा. (२) विद्यार्थ्याची अभिरुची हा शिक्षणातील परवलीचा शब्द असावा. (३) अध्यापक हा काम करून घेणारा मुकादम नसून त्याची भूमिका मार्गदर्शकाची असावी. (४) अध्यापक प्रागतिक विचाराचे असावेत. (५) माहिती मिळविणे आणि योग्य निष्कर्ष करणे या बाबतीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. (६) बालविकासाचा शास्त्रीय अभ्यास, बालकांची तंदुरुस्ती, शाळा व कुटुंब यांतील अधिक सहकार्य या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या पाहिजेत. (७) केवळ पारंपरिक गोष्टींवर अवलंबून न राहता, शाळा हे शिक्षणाचे नवे नवे प्रयोग करण्याचे केंद्र झाले पाहिजे. रुसो, ⇨ पेस्टालोत्सी आणि ⇨ फ्रबेल यांनी वरील विचारांचा पुरस्कार कमीअधिक स्वरूपात पूर्वीच केला होता.

पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेत प्रगमनशील शिक्षणाच्या अनेक शाळा स्थापन झाल्यामुळे व्यक्तिगत अध्ययनास महत्त्व प्राप्त झाले व शिक्षणामध्ये व्यक्तिभेदाचा विचार करण्यात येऊ लागला विद्यार्थ्यांची अभिरुची आणि कल यांकडे लक्ष दिले पाहिजे, असा एक विचार पुढे आला शाळेच्या व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे तसेच शिक्षणप्रक्रियेत कुटुंब व शाळा यांचे सहकार्य वाढविणे यांसारखे नवे विचार पुढे आले.

प्रगमनशील शिक्षणाच्या प्रभावामुळे शालेय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र सुधारणा झाली व हेलेन पार्कहर्स्ट यांची ⇨ डॉल्टन योजना व कार्लटन वॉशबर्न यांची विनेटका योजना पुढे आल्या, तसेच शिक्षणाच्या मानसशास्त्रीय, सामाजिक आणि अध्यापनात्मक घटकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले.

प्रगमनशील शिक्षणाच्या चळवळीच्या सुरुवातीस उत्साही कार्यकर्ते आणि हुशार विद्यार्थी यांच्यामुळे ही चळवळ चांगलीच फोफावली परंतु ती सार्वत्रिक झाल्यावर मात्र या पद्धतीमधील उणिवा लक्षात येऊ लागल्या. या पद्धतीत विद्यार्थ्यांना नको तेवढे स्वातंत्र्य दिले जाते त्यांच्या आवडीनिवडींकडे जास्त लक्ष दिल्याने जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते मुले स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाविरुद्ध अशी मने पोसतात इ. आक्षेप या पद्धतीवर घेण्यात आले. १९५० नंतरच्या काळात अमेरिकेतील सिनेटर मॅकॉर्थीची कम्युनिस्टविरोधी जहाल भूमिका व १९५७ मध्ये रशियाने अंतराळात सोडलेला स्पुटनिक-१ यांमुळे प्रगमनशील शिक्षणपद्धतीने शिक्षणात गोंधळ व बेशिस्त निर्माण होऊन देशाची परागती झाली, अशी जोरदार टीका करण्यात आली. असे असले, तरी या चळवळीचा जागतिक शिक्षण पद्धतीवर परिणाम झालेला दिसतो. त्यातूनच शाळेच्या इमारती सुंदर असाव्यात तेथील वातावरण चांगले व निकोप असावे हा विचार पुढे आला अध्यापनाच्या अनेक नव्या पद्धती उदयास आल्या आणि शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे बरेच नवे प्रश्न निर्माण होऊन त्याचा विकास होण्यास मदत झाली.

संदर्भ : 1. Brubacher, J. S. A History of the Problems of Education, New York, 1947.

2. Good, H. G. A History of American Education, New York, 1962.

गोगटे, श्री. ब.