सालामांका विद्यापीठ : स्पेनमधील एक जुने व प्रसिद्घ विद्यापीठ. त्याचे मूळ नाव युनिव्हर्सिदाद दे सालामांका असून स्पेनच्या सालामांका या राजधानीत त्याची प्रमुख व मध्यवर्ती जुनी वास्तू नवीन कॅथीड्रलच्या समोर अवशिष्ट आहे. तिचा पश्चिमाभिमुख दर्शनी भाग रुप्याच्या पत्र्याने मढविलेला आहे. या विद्यापीठाची स्थापना नववा आफांसो या राजाने इ. स. १२१९ मध्ये केली तथापि प्रत्यक्ष विद्यार्जनाला दहावा आफांसो राजाच्या कारकीर्दीत इ. स. १२५४ मध्ये प्रारंभ झाला.त्यावेळी ख्रिस्ती धर्माविषयीच्या कायद्याचे [⟶ कॅनन लॉ] तीन अध्यापन विभाग व्याकरण, कला आणि भौतिकशास्त्र या विषयांची प्रत्येकी एक शाखा सुरू करण्यात आली. त्या वेळेपासून सोळाव्या शतकाअखेर सालामांका विद्यापीठ यूरोप खंडातील एक मान्यवर विद्यार्जन करणारी संस्था होती आणि तिची तुलना पॅरिस, बोलोन्या आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठांबरोबर केली जाई. फ्रांथीस्को दे व्हीतोरिआ हा एक तेथील इ. स. १५२६–४६ दरम्यानचा प्राध्यापक. त्याने आपल्या भाषणांद्वारे आंतरराष्ट्रीय विधींच्या मूलभूत तत्त्वांचे संहितीकरण केले तर प्रसिद्घ स्पॅनिश कवी आणि तत्कालीन विद्वान ⇨ लूईस दे लेऑन याने इ. स. १५६१ पासून अखेरपर्यंत (१५९१) तेथे अध्यापन केले मात्र १५७२– ७६ दरम्यान धर्माविरुद्घ वर्तन केले म्हणून तो तुरुंगात होता. अद्यापि त्याची खोली विद्यापीठात संरक्षित ठेवली आहे. या विद्यापीठात १५८४ मध्ये सु. ७,००० विद्यार्थी होते. मात्र त्यानंतर विद्यापीठाची अधोगती झाली आणि १८७५ मध्ये विद्यापीठात फक्त ३९१ विद्यार्थी होते कारण तत्पूर्वी नेपोलियनच्या स्वाऱ्यांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी फ्रेंचांनी विद्यापीठ उद्ध्वस्त केले होते तथापि १८३५ नंतर या विद्यापीठाचे धार्मिक स्वरूप संपुष्टात येऊन ते पूर्णतः धर्मातीत झाले. विसाव्या शतकात विद्यापीठात तत्त्वज्ञान, वैद्यक, विधी, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, वाणिज्य वगैरे अनेक विद्याशाखा सुरू करण्यात आल्या. त्यांची स्वतंत्र ग्रंथालये असून त्यांत सु. ३,६५,२६९ ग्रंथ आहेत. शिवाय विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय समृद्घ व संपन्न असून त्यात १,४०,३०० ग्रंथ आहेत. विद्यापीठातर्फे Hoias universitarias नावाचे नियतकालिक निघते. याशिवाय विद्याशाखांची स्वतंत्र प्रकाशने आहेत. सांप्रत विद्यापीठात १,८३० अध्यापक असून २८,३७५ विद्यार्थी शिकत होते (१९९५).

देशपांडे, सु. र.