महांति, चिंतामणि : (१८६७−१९५२). ओडिया कवी व लेखक. जन्म बलसोर जिल्ह्यातील भद्रक ह्या गावी. शालेय शिक्षक घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी सु. २० वर्षे नोकरी केली. अंगच्या कवी व लेखक म्हणून असलेल्या गुणवत्तेमुळे त्यांना त्यावेळच्या विविध संस्थानिकांचा आश्रय लाभला. गंजाम जिल्ह्यातील सुरंगी संस्थानच्या दरबारात राजकवी म्हणून त्यांचे बरेच आयुष्य व्यतीत झाले. कविता रचण्यासाठी व लेखनाची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. प्रख्यात ओडिया कवी राधानाथ राय यांनीही चिंतामणींच्या कवितांचे कौतुक करून त्यांना उत्तेजन दिले. चिंतामणींनी सातत्याने विपुल काव्यलेखन व विविध प्रकारांतील गद्यलेखन करून लौकिक मिळविला. ओडियात एक बहुप्रसव कवी व लेखक म्हणून ते ओळखले जातात. सुमारे ४८ काव्ये, अनेक कथा-कादंबऱ्या, प्रवासवर्णने, विविध विषयांवरील अनेक निबंध इ. प्रकारचे लेखन त्यांच्या नावावर असून ते चिंतामणि ग्रंथाबलि (१९३८−४२) नावाने सहा बृहद खंडांत संगृहीत आहे. पहिल्या दोन खंडांत त्यांची काव्ये, तर उर्वरित चार खंडात त्यांच्या कादंबऱ्या निबंधादी लेखन संगृहीत आहे. संस्थानिकांच्या आर्थिक मदतीने निघाणाऱ्या विविध नियतकालिकांचेही ते संपादक होते.

चिंतामणींच्या काव्यात उच्च प्रतीच्या प्रतिमेचा आढळ होत नाही त्यांची रचना सर्वसाधारण प्रतीचीच आहे तथापि कोणीही स्पर्श न केलेल्या व्यक्ती व विषय यांच्यावर काव्यरचना करण्यात त्यांचे वैशिष्ट्य दिसून येते. उदा., उपेंद्र भंजांचे जन्मग्राम कमुषर, आपल्या आश्रयदात्याचे सुरंगी हे गाव, महेंद्रगिरी, सिंहराज, उदयनखंड इत्यादींवरील काव्यरचना. निसर्गप्रेम, सुंदर वर्णनशैली व भावनेची खोली यांचा प्रत्यय त्यांच्या महेंद्रगिरीवरील दीर्घकाव्यातून येतो. पेशाने ते शिक्षक असल्यामुळे नव्या पिढीसमोर उच्च आदर्श ठेवण्याच्या हेतूने त्यांनी सप्तरथी (१९११), सप्तसति (१९१३), आर्यबाला (१९१४) इ. काव्ये रचली. विश्वचित्र (१९२०) मध्ये संगृहीत असलेल्या काही कथाकाव्यांतून त्यांनी जीवनाचे असारत्व प्रभावीपणे सांगितले आहे. त्यांची विक्रमादित्य (१९१६) आणि ओरिसाचा शेवटचा हिंदू राजा मुकुंददेव याच्यावरील श्रीमुकुंददेव (१९२९) काव्ये विशेष सरस आहेत. ही काव्ये त्यांनी मुक्तच्छंदात व महाकाव्याच्या धर्तीवर लिहिली आहेत.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)