मलायो-पॉलिनीशियन भाषाकुटुंब : मलायो-पॉलिनीशियन भाषाकुटुंबातील भाषा मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएटनाम, कंबोडिया, तैवान, हिंदी महासागरातील मादागास्कर, पॅसिफिक समुद्रातील बेटे इ. ठिकाणी बोलल्या जातात. आधुनिक भाषाविज्ञानात या भाषाकुटुंबाचे ‘ऑस्ट्रोनेशियन’ असे नाव रूढ झाले आहे. या भाषाकुटुंबाच्या प्रमुख दोन उपशाखा आहेत. पहिली उपशाखा पश्चिम ऑस्ट्रोनेशियन किंवा इंडोनेशियन भाषांची. या भाषा संख्येने सु. दोनशे असून त्यांत मेलायू, इंडोनेशियन, जावानीज, पिलिपिनो अशा प्रमुख भाषा मोडतात. पॅसिफिक समुद्रातील बेटांवर बोलल्या जाणाऱ्या भाषांची दुसरी उपशाखा ही पूर्व ऑस्ट्रोनेशियन किंवा ओशिॲनिक (सागरी) भाषांची उपशाखा. यात सु. तीनशे भाषा असून त्यांत पॉलिनीशियन, फिजीयन अशा प्रमुख भाषा येतात. ऑस्ट्रेलियातील आदिवासींच्या भाषा मात्र या कुटुंबात धरीत नाहीत.

 

ऑस्ट्रोनेशियन भाषाकुटुंब हे त्यातील भाषांच्या संख्येच्या दृष्टीने आणि भौगोलिक व्यापकतेच्या दृष्टीने सर्वात मोठे भाषाकुटुंब आहे. तथापि भाषिकांच्या संख्येच्या दृष्टीने हे भाषाकुटुंब मोठे नाही. पश्चिम ऑस्ट्रोनेशियन भाषा सु पंधरा कोटी लोक बोलतात, तर पूर्व ऑस्ट्रोनेशियन भाषा बोलणारे लोक सु. दहा लाख आहेत. एकोणिसाव्या शतकामध्ये या भाषांच्या चार उपशाखा मानल्या जात : इंडोनेशियन भाषांची उपशाखा, मेलानीशियन भाषांची उपशाखा, मायक्रोनीशिअन भाषांची उपशाखा आणि पॉलिनीशियन भाषांची उपशाखा. या उपशाखा भौगोलिक आणि मानववंशीय कारणांसाठी मानल्या गेल्या होत्या त्यामागे भाषावैज्ञानिक कारणांचा विचार नव्हता. आधुनिक भाषाविज्ञानात मात्र या भाषाकुटुंबांच्या वर उल्लेखिलेल्या दोनच उपशाखा मानण्यात येतात. काही भाषावैज्ञानिक फॉर्मोसा (तैवान) बेटावरील भाषांची तिसरी उपशाखा मानतात. पूर्व ऑस्ट्रोनेशियन भाषांची एक उपशाखा मानली असली, तरी त्यांतील भाषांमध्ये आपसांत फारच थोडी समान लक्षणे आहेत. 

ऐतिहासिक भाषाविज्ञानात भाषाभगिनींचे मूळ स्वरूप शोधण्याच्या पद्धती आहेत. या पद्धतीनुसार वर्णन केलेल्या मूळ भाषेला ‘पूर्वजभाषा’ (प्रोटो-लँग्वेज) असे म्हणतात. अर्थात हा एक अंदाज असतो. ऑस्ट्रोनेशियन भाषाकुटुंबाच्या पूर्वज-ऑस्ट्रोनेशियन भाषेचे १९२० ते १९३८ च्या दरम्यान ओटो डेम्पवुल्फ या जर्मन भाषावैज्ञानिकाचे वर्णन केले. पूर्वज-ऑस्ट्रोनेशियन भाषा इ.स.पू.सु.१००० मध्ये टाँगा, फिजी या बेटांवर बोलली जात असावी. या बेटांवर ती कोठून आली असावी, हा पुढचा प्रश्न. त्याबाबत मतभेद आहेत. काहींच्या मते तिचे मूळ स्थान भारत असावे काहींच्या मते दक्षिण चीन काहींच्या मते इंडोनेशिया तर काहींच्या मते अमेरिका. पुरातत्त्वविद्या आणि भूविज्ञान यांतील संशोधन हे पूर्वज-ऑस्ट्रोनेशियनचे मूळ स्थान इंडोनेशिया होते, या मतास पुष्टी देणारे आहे. पूर्वज-ऑस्ट्रोनेशियनमध्ये इ, ए, अ हे उन्नत स्वर, तर आ हा निम्न स्वर होता. संस्कृतमधील ऋ सारखा स्वरदेखील या भाषेत होता. या भाषेचे शब्द बहुधा दोन अवयवांनी बनलेले होते. त्यांची विकारांगे प्रामुख्याने व्यंजन-स्वर-व्यंजन-स्वर-व्यंजन किंवा व्यंजन-स्वर-व्यंजन-व्यंजन-स्वर-व्यंजन अशी होती. व्यंजन-संयोग हा विकारांगाच्या आरंभी किंवा मध्यभागी संभवत असे. स्वरादी किंवा स्वरांन्त शब्द जास्त होते. बहुतेक ‘रूपिमे’ (मॉर्फिम्स) ही क्रियापदे किंवा नामे असत. इझिडोर डायन या अमेरिकन भाषावैज्ञानिकाने संख्याशास्त्रीय पद्धतीच्या आधारे पूर्वज-ऑस्ट्रोनेशियन भाषेच्या रूपनिधीचा अभ्यास केला आहे. 

पश्चिम ऑस्ट्रोनेशियन किंवा इंडोनेशियन ही ऑस्ट्रोनेशियन भाषाकुटुंबाची एक प्रमुख उपशाखा आहे. या उपशाखेतील काही भाषा पश्चिम न्यू गिनी, पश्चिम इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, मादागास्कर या भागांत बोलल्या जातात. कंबोडिया आणि व्हिएटनाम येथे बोलल्या जाणाऱ्या भाषांना हेस्परोनेशियन भाषांची उपशाखा असेही काही भाषावैज्ञानिक म्हणतात. 

मलाया द्वीपकल्प आणि जावा, सुमात्रा, बाली, लाँबॉक या बेटांवर बोलल्या जाणाऱ्या पश्चिम ऑस्ट्रोनेशियन भाषांची एक उपशाखा आहे. हिंदू संस्कृतीच्या प्रभावामुळे या भाषांत अनेक संस्कृत शब्द उचलले गेले (उदा., ‘मंत्री−तो इंग्रजी ‘मँडरिन’ या रूपात दिसतो). सातव्या शतकात इस्लामचा प्रभाव वाढताच या भाषांनी (विशेषतः मेलायू भाषेने) अरब शब्दही सामावून घेतले. सोळाव्या शतकानंतरच या भाषांचा यूरोपियन भाषांशी संबंध आला. सुमात्रात केरिन्तजी, रंजाङ्‌, गाजो, ताबो-बाताक अशा एकूण बारा ते पंधरा पश्चिम ऑस्ट्रोनेशियन उपशाखेतील भाषा बोलल्या जातात. यांचे भाषिक संख्येने सु. नव्वद लाख आहेत. जावा बेटात फक्त तीन पश्चिम ऑस्ट्रोनेशियन भाषा असल्या, तरी त्यांचे भाषिक सु. साडेचार कोटी आहेत. या भाषांवरही संस्कृतचा प्रभाव खूप आहे. नवव्या शतकातील या भाषांतील शिलालेख उपलब्ध आहेत. पश्चिम जावात सुंदानी भाषा तर मादुरा बेटावर मादुरीज बोलली जाते. बालिनीज ही भाषा बाली बेटावरची, तर ससाक भाषा लाँबॉक बेटावरची होय. मेलायू (किंवा इंग्रजीत जिला ‘मले’ म्हणतात ती) भाषा ही मलाया द्वीपकल्पात बोलली जाते. ती मलेशियन या नावाने मलेशियाची राष्ट्रभाषा म्हणून आणि इंडोनेशियन (किंवा बहासा इंडोनेशिया) या नावाने इंडोनेशियाची राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते. मादागास्करमध्ये मालागासी भाषेच्या अनेक बोली बोलल्या जातात. यांतील मेरिना ही बोली मादागास्कर अधिकृत भाषा मानली जाते. 

 

फॉर्मोसा आणि फिलिपीन्स बेटांवर एकूण सत्तर पश्चिम ऑस्ट्रोनेशियन भाषा बोलल्या जातात. त्यांतील तागालोग (तागाल) भाषा ही मुख्य आहे. १९४६ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर तागालोग ही फिलिपीन्सची राष्ट्रभाषा बनली. आता तिला ‘पिलिपिनो’ या नावाने संबोधतात. सु. चार कोटी लोक ही भाषा बोलतात. इलोकानो ही दक्षिण भागातील प्रमुख भाषा. याखेरीज बीलान, तगबिली, तिसराय या, इतर भाषांची फारसे साम्य नसलेल्या भाषाही या भागात बोलल्या जातात. 

पश्चिम ऑस्ट्रोनेशियन भाषांची उपशाखा ही खूप वैधर्म्ये असलेल्या भाषांचा समूह आहे. यातील फिलिपीन्समधील भाषा आणि मेलायू या भाषांचाच प्रामुख्याने अभ्यास झालेला आहे. फिलिपीन्स भाषागटात प, ट, क, ब, ढ, ग या स्पर्शव्यंजनाखेरीज कंठद्वारीय स्पर्शव्यंजनही आढळते. या भाषांतील प्रयोग आणि कारक यांच्या व्यवस्था गुंतागुंतीच्या आहेत. उदा., या भाषांत तीन वेगळे प्रयोग आहेत. कर्तरी प्रयोगात कर्ता हा उद्देश्य असतो कर्मणी प्रयोगात कर्म हे उद्देश असते अधिकरण प्रयोगात संप्रदाय उद्देश असते. पश्चिम ऑस्ट्रोनेशियन भाषांतील जावानीज भाषेवर संस्कृतचा परिणाम स्पष्ट दिसतो. जावानीजमध्ये दंतमूलीय (त, द यांसारखे) स्पर्श-ध्वनी आणि प्रतिवेष्टित (ट, ड यांसारखे) स्पर्श-ध्वनी असे दोन्हीही आढळतात. उलट मेलायूसारख्या भाषेचा परिणाम इंग्रजीवर झालेला आढळतो. ‘डॅगर’, ‘पॅडी’, ‘ओरांग−उटांग’, ‘गोडाउन’ (मराठी गुदाम) यांसारखे शब्द इंग्रजीमध्ये मेलायू भाषेतून उचलले आहेत तर ‘वाटिक’, ‘जंक’ यांसारखे शब्द जावानीजमधून घेतले आहेत. 


दक्षिण व मध्य पॅसिफिक बेटांवर बोलल्या जाणाऱ्या ऑस्ट्रोनेशियन भाषांची उपशाखा म्हणजे पूर्व ऑस्ट्रोनेशियन किंवा ओशिॲनिक (सागरी) भाषांची उपशाखा. न्यू गिनी, मेलानीशियाची बेटे, पॉलिनीशियाची बेटे यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा या संख्येने सु. तीनशे आहेत. यांची एक उपशाखा मानावी की नाही, त्या उपशाखेत गट कोणते यांबाबत भाषावैज्ञानिकांत तीव्र मतभेद आहेत. या सर्व भाषांत जी काही थोडी साधर्म्ये आहेत, ती अशी : सर्व भाषांतील अंत्य व्यंजने नाहीशी झाली आहेत. आ, इ, ऊ, ए, ओ, हे पाच स्वर सर्व भाषांत आहेत. मात्र या भाषांत समान शब्द अत्यल्प आहेत. सर्व भाषांवर या उपशाखेबाहेरील पापुअन भाषासमूहातील भाषांचा परिणाम झाला आहे. 

पूर्वज-सागरी भाषा ही पूर्व ऑस्ट्रोनेशियनची एक शाखा होय.पूर्वज-सागरी भाषेमध्ये नाम आणि क्रियापद यांना लागणारे उत्तरयोगी प्रत्यय राहिले नाहीत. काल, अभिवृत्ती, क्रियाव्याप्ती दाखविण्यासाठी अव्ययांचा वापर सुरू झाला. हे काम पश्चिम ऑस्ट्रोनेशियन भाषांमध्ये प्रत्ययांनी होते. सामान्यनाम, सर्वनाम, स्थलवाचक नाम आणि कालवाचक नाम अशी नामांची विभागणी पूर्वज-सागरी भाषेत असून ही नामे दाखविण्यासाठी इंग्रजी भाषेतल्याप्रमाणे ‘आर्टिकल्स’ (व्याप्तिदर्शक) म्हणजे निर्गुण विशेषणेही होती. या भाषेत एकवचन, द्विवचन आणि बहुवचन होते. 

सागरी भाषांचे परस्परांशी फारसे साधर्म्य आणि संबंध नसलेले अनेक गट आहेत. परत प्रत्येक गटातील भाषांतही फारसे संबंध नाहीत. आग्नेय सॉलोमन बेटांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा, न्यू हेब्रिडीझमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा, फिजी बेटांवर बोलल्या जाणाऱ्या भाषा असे त्यांचे विविध गट मानले जातात. पैकी पॉलिनीशियन आणि फिजीयन भाषांचे दोन गट मिळून एक वेगळा गट मानला जातो. याचे कारण असे की, पूर्वज-सागरी भाषेच्या दोन उपशाखा आहेत. एक पूर्वज-पूर्व-सागरी भाषेची, यात पॉलिनीशियन, फिजीयन या भाषा येतात. दुसरी उपशाखा म्हणजे उरलेल्या इतर सागरी  भाषांची.  

पॉलिनीशियन भाषांचा समूह हा सु. सोळा भाषांचा समूह आहे. हवाई बेटावरील आदिवासी, न्यूझालंडमधील माओरी आदिवासी यांच्यात त्या बोलल्या जातात. फिजीयन भाषांचा समूह आणि पॉलिनीशियन भाषांचा समूह हे मुळात एकाच पूर्वज-भाषेतून जन्मले असावेत. पॉलिनीशियन भाषासमूहात हाँगन, ताहितीयन, हवाईयन माओरी इ. भाषा येतात. या सर्व भाषांचे मौखिक वाङ्‌मय खूप संपन्न आहे. मायक्रोनीशियामध्ये आणखी तेरा भाषा बोलल्या जातात. सागरी भाषांचा आणखी एक समूह मेलानीशियामध्ये आहे. यात एकूण दोनशे पन्नास भाषा असल्या, तरी प्रत्येक भाषेचे भाषिक सु. शंभर ते हजाराच्या आसपास आहेत. 

पहा : इडोनेशियन भाषासमूह.  

संदर्भ : 1. Sebcok. T. A. Ed. Current Trends in Linguistics : Linguistics in Oceania, Vol. 8. Mouton, 1971.

            2. Voegelin, C. F. Voegelin, F. M. Languages of the World: indo-pacific Fasciclrs, two, Anil. 6/7, Bloomington, 1974.

 

धोंगडे, रमेश वा.