मराठा रेजिमेंट : (मराठा लाइट इन्फंट्री). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानातील आपल्या वखारींच्या संरक्षणार्थ सुरुवातीस मद्रास, कलकत्ता व मुंबई अशा तीन इलाख्यांत (प्रेसिडेन्सी) फौजा ठेवल्या होत्या. त्यापैकी मुंबई इलाख्यातील फौजेच्या तीन रेजिमेंटपैकी दुसऱ्या रेजिमेंटमधून मराठा इन्फंट्रीचा जन्म झाला. बाँबे नेटिव्ह इन्फंट्री, बाँबे रेजिमेंट १०८, ११४ व १०३ वगैरे नामांतरे होत होत व क्रमांक बदलत बदलत ह्या रेजिमेंटच्या वेगवेगळ्या पलटणी उभ्या राहिल्या हिंदुस्थानात तसेच बाहेरही वेगवेगळ्या लढायांत त्यांनी पराक्रम गाजविला.
अठराव्या शतकात प्लासीची लढाई (१७५७) व बक्सारची लढाई (१७६४) ह्या बंगालमधील लढायांत रॉबर्ट क्लाइव्हच्या सैन्यात बाँबे रेजिमेंटच्या पलटणी लढल्या. दक्षिणेकडील इंग्रज-म्हैसूरकर युद्धांत (सतरावे-अठरावे शतक) हे सैन्य हैदर अली व टिपू सुलतानच्या विरुद्ध लढले. ह्यातूनच १७६८ साली १०३ मराठा, जी सध्या १ मराठा (जंगी पलटण) पलटण म्हणून संबोधिली जाते, ती उभी राहिली. राघोबा पेशव्याच्या काळात आरास (गुजरात) येथे १०३ मराठा पलटण पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध लढली. इ. स. १७६९ मध्ये तिसरी बाँबे रेजिमेंट उभी राहिली व तिचे रूपांतर काळी पाचवी रेजिमेंटमध्ये (हल्लीची २ मराठा) झाले. या पलटणीला सदासीर, श्रीरंगपटण, म्हैसूर हे युद्धसन्मान देण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा पलटणींनी मॅग्दाला, मुलतान, रंगून, पीकिंग अशा विविध ठिकाणी पराक्रम गाजविला व लाइट इन्फंट्री ही खास उपाधी मिळविली. काहून आणि ॲबिसिनिया (इथिओपिया) येथील प्रराक्रमाने त्यांच्या कीर्तीत भर पडली.
पहिल्या महायुद्धात १०३ मराठा, ११० मराठा व ११७ मराठा या पलटणींनी शीबा, कूत इलमाराचा वेढा, बसऱ्याची लढाई व टायग्रिस नदीवर टेसिफॉन येथे पराक्रम गाजविला. या लढायांत अर्धेअधिक सैन्य कामास आले, पण मराठ्यांचे पाऊल मागे हटले नाही. ११७ मराठा पलटणीला अतुल पराक्रमाप्रीत्यर्थ रॉयल हा किताब मिळाला व उजव्या खांद्यावर दुहेरी वेणीची निळी लाइनयार्ड दोरी, रॉयल ब्ल्यू मोजे वगैरे विशेष गणवेशाची मानचिन्हे रॉयल मराठा रेजिमेंट मिरवू लागली.
शरकातच्या लढाईत (१९१८) ११४ मराठा पलटणीने पराक्रम गाजविला. तसेच जनरल ॲल्नेबीच्या आक्रमणात १०५ मराठा फौज पॅलेस्टाइनमध्ये लढली. तिने शॅरन येथे पराक्रम दाखविला. अशी ही विजयमालिका गुंफली गेली व अनेक वीरांना डिएस्ओ (मिलिटरी क्रॉस), ओबीआय (ऑर्डर ऑफ ब्रिटिश इंडिया), आयडीएस्एम् (इंडियन डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस मेड्ल) इ. मानाचे किताब मिळाले. [⟶ मानचिन्हे, सैनिकी].
पुढे १९२२ साली सहा पलटणींचे नामकरण ५ मराठा लाइट इन्फंट्री ह्या रेजिमेंटमध्ये झाले. पैकी ११४ मराठा पलटणीचे सेंटरमध्ये व ११७ मराठा पलटणींचे ५/५ रॉयल मराठा बटालियनमध्ये रूपांतर झाले. तेव्हापासून रेजिमेंटचे स्थायी प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथेच आहे. १०३ मराठा म्हणजे सध्याची १ मराठा जंगी पलटण व ११० मराठा म्हणजे २ मराठा (काळी पाचवी) होय. सध्याच्या महार रेजिमेंटचा जन्म वरील प्रशिक्षण केंद्रात १९४१ मध्ये झाला. [⟶ महार रेजिमेंट].
दुसऱ्या महायुद्धात पलटणींच्या संख्येत वाढ झाली व लिबिया, ॲबिसिनिया, इराण, इराक, ब्रह्यदेश, मलाया, सिंगापूर, टोकिओ, जावा, सुमात्रा तसेच इटली येथील रणभूमीवर मराठे लढले. शंशक, रुयवा, कारेन, टोब्रुक, हॅलफाया खिंड, कासीनॉ, सेन्यॉ नदीकाठ येथे अतुल पराक्रम गाजवून हजारो वीर धारातीर्थी पडले. इटलीमधील युद्धातील पराक्रमाबद्दल नाईक यशंवत घाडगे व शिपाई नामदेव जाधव यांना व्हिक्टोरिया क्रॉस हे उच्च पदक (मरणोत्तर) देण्यात आले. तसेच डीएस्ओएम्सी (मिलिटरी क्रॉस), आयडीएस्एम्, आयओएम् (इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट) यांसारखी पदके अनेक मराठा सैनिकांना बहाल करण्यात आली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोल्हापूर, बडोदे, हैदराबाद या संस्थानांच्या पलटणी मराठा रेजिमेंटमध्ये सामील करण्यात आल्या. त्याचप्रमाणे मराठा लाइट इन्फंट्रीचा ५ हा आकडा गेला व द मराठा लाइट इन्फंट्री हे सध्याचे नाव राहिले. स्वातंत्र्योत्तर काळातील ⇨ भारत पाकिस्तान संघर्ष, ⇨ भारत-चीन संघर्ष यांतून उद्भवलेल्या सैनिकी कारवायांत या रेजिमेंटने भाग घेतला. त्यातील पराक्रमाबद्दल या रेजिमेंटला ४ मावीरचक्रे, ३० वीरचक्रे, १ अशोकचक्र, १ कीर्तिचक्र, ५ शौर्यचक्रे, १४ सेनापदके व इतर सन्मान लाभले. तसेच नौशहर, जांगारे, हुसेनीवाला पूल व ब्युरकी हे युद्धसन्मानही रेजिमेंटला मिळाले. पुढे ३ मराठा पलटणीचे छत्रीधारी (पॅराशूट) रेजिमेंटमध्ये विलीनीकरण झाले. या काळात १९६८ साली राष्ट्रपतींनी रेजिमेंटला ध्वज दिला.
पित्रे, का. ग.