मर : अनेक कारणांमुळे वनस्पतींच्या फांद्या व पाने कोमेजतात व पुढे त्या वनस्पती वाळून मरतात. जमिनीत पाणी कमी झाल्यास किंवा मुळांशी पाणी फार साचल्यानेही झाडे मरतात. रोग आणि किडीच्या उपद्रवांमुळेही  झाडे मरतात. झाडाच्या वाहक उतकांत (अन्नरसाची ने-आण करणार्‍या समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या – समूहांत) रोगकारकाचा प्रवेश झाल्याने झाडे वाळून मरतात, त्याला ‘मर रोग’ अशी संज्ञा आहे. या रोगाला उभळ अथवा उबळ प्रचलित नावे असून याला ‘वाहक ऊतकीय रोग’ असेही म्हणता येईल. कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व सूक्ष्मजंतू यांमुळे मर रोग उद् भवतात.

कवकजन्य : अपूर्ण कवक (फंजाय इंपरफेक्टाय) वर्गातील फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम जातीच्या प्रकारामुळे भारतात कापूस, तूर, हरभरा, जवस, लाख, केळी, टोमॅटो, वाटाणा, ताग या पिकांना होणार्‍या मर रोगामुळे पुष्कळ नुकसान होते. त्याचप्रमाणे त्याच वर्गातील सिफँलोस्पोरियम सॅकॅराय या कवकामुळे उसाचा मर रोग उत्तर प्रदेश,बिहार व तमिळनाडूत आढळून येतो. व्हर्टिसिलियम डाहली कवकामुळे वांग्याचा मर रोग होतो. वरील प्रकारच्या मर रोगांत कवकाचा झाडात प्रवेश रोपांच्या मुळांतून होतो. झाडांच्या जमिनीवरील भागांत रोगाची लक्षणे हळूहळू दिसू लागतात. प्रथम रसाळ फांद्या व पाने प्रखर उन्हात मरगळल्याप्रमाणे दिसतात. मरगळलेले झाडाचे शेंडे खाली वाकतात व वाळतात आणि शेवटी रोगामुळे संपूर्ण झाड अथवा त्याच्या काही फांद्या मरतात. काही वेळा झाडांची वाढ खुरटते व पाने पिवळी पडतात. प्रकाष्ठ (जलीय विद्राव वाहून नेणे व व वनस्पतीला आधार देणे ही कार्ये करणार्‍या  ऊतकांतील) वाहिन्यांत रोगकारक कवके आढळून येतात आणि वाहिन्यांचा रंग काळपट होतो. खोडाच्या उभ्या छेदामुळे काळपट रंगाच्या रेघा ठळकपणे दिसून येतात. रोगामुळे मुळांमार्फत पाणी व पोषक द्रव्ये झाडांच्या वरील भागांपर्यत पोहचू शकत नाहीत. हे कार्य निश्चित कशा तर्‍हेने होते, यासंबंधी पुष्कळ संशोधन झाले असून त्याविषयी निरनिराळे सिद्धांत मांडले गेले आहेत. वाहिन्यांत रोगकारक कवकांची वाढ झाल्यामुळे पाणी आणि पोषक द्रव्यांच्या खालून वर होणार्‍या प्रवाहात अडथळाउत्पन्न होतो, असे सर्वसामान्यपणे मानले जाते. त्याचबरोबर कवकातून बाहेर पडणारी पेक्टिक एंझाइमे [ जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारी प्रथिने,एंझाइमे] आणि त्यांच्या पोषकावरील (रोगग्रस्त वनस्पतीवरील) क्रियेमुळे तयार होणारे चिकट पदार्थ व इतर विषारी पदार्थ हेही पाणी व पोषक द्रव्यांच्या प्रवाहात अडथळा आणीत असावेत, असा निष्कर्ष प्रयोगांवरून काढण्यात आला आहे.

सूक्ष्मजंतुजन्य : सूक्ष्मजंतूंमुळे होणार्‍या वाहक ऊतकीय रोगांत कोबीचा घाण्या रोग हा महत्वाचा आहे. या रोगात प्रकाष्ठ वाहिन्यांत सूक्ष्मजंतू आढळून येतात आणि वाहिन्या काळ्या रंगाच्या होतात. कोबीच्या घाण्या रोगात सूक्ष्मजंतू (झँथोमोनस कँपेस्ट्रिस) मुळातून प्रवेश न करता पानाच्या कडांवरील सूक्ष्म छिद्रांतून प्रवेश करतात. या रोगामुळे पानाच्या मध्यशिरा काळ्या पडतात व वळतात. पाने पिवळी पडतातव अकाली गळून पडतात, रोग खोडात पसरतो आणि त्यातील वाहिन्या काळ्या पडतात. या जातीच्या सूक्ष्मजंतूंमुळे फुलकोबी (फुलवर), सलगम व मुळा या पिकांवरही अशाच प्रकारचा रोग पडतो. स्यूडोमोनस सोलॅनेसिअँरम या जातीच्या सूक्ष्मजंतूंमुळे टोमॅटो, बटाटा व वांगी या पिकांवरही मर रोग पडतो. या सूक्ष्मजंतूंचा पोषकात प्रवेश मुख्यत: जखमांतून होतो.

महत्व व उपाय : वनस्पतींच्या फार नुकसानकारक रोगांत मर रोगाची गणना होते. रोगट झाडे मोठ्याप्रमाणावर मरतात, त्यामुळे पिकांचे फार नुकसान होते. कवकजन्य रोगांत रोगकारक कवके जमिनीत वास्तव्य करणारी असून शवोपजीवी (मृत शरीरातील कुजणार्‍या जैव द्रव्यावर जगणार्‍या) अवस्थेत ती तेथे दीर्घकालापर्यंत जिंवत अवस्थेत गहू शकतात. त्यामुळे पोषकाचे रोगप्रतिकारक प्रकार निर्माण करण्याखेरीज या रोगावर दुसरा प्रभावी उपाय नाही. पोषकाचे रोगप्रतिकारक प्रकार निर्माण करण्याचे काम मंदगतीने होमारे असते व त्यात नेहमीच यश मिळते असे नाही. यातील काही कवकांत क्रियावैज्ञानिक (सजीवांच्या कोशिका व ऊतके यांत चालणार्‍या मूलभूत क्रियांचे)विशिष्टीकरण आढळून आल्यामुळे रोगप्रतिकारक प्रकार निर्माण करण्याचे काम जास्त अवघड झाले आहे.

कापसावरील मर रोग साधारण १९३० सालापुर्वी गुजरात, मराठवाडा, विदर्भ आणि हल्लीचा उत्तर कर्नाटक या भागांत फार नुकसानकारक होता. कापसाचे मर रोगप्रतिकारक प्रकार (उदा., जयधर, विरनार, विजय, दिग्विजय, दौलत) निर्माण करण्यात यश मिळाल्यानेव त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील लागवडीमुळे हा रोग आता विशेष नुकसानकारक असा मानला जात नाही. हिरवळीच्या खतासाठी वापरल्या जाणार्‍या तागावरील मर रोगाला प्रतिकारक प्रकार डी -९ उपलब्ध झाला आहे. इंदोर टी-१२ हा लाख या कडधान्याच्या पिकाचा प्रकार आणि पी. १७४, १८६ व १८९ हे जवसाचे प्रकार मर रोग प्रतिकारक आहेत. केळ्याच्या मर (पनामा) रोगामुळे पुण्याच्या आसपास सोन या प्रसिद्ध केळीच्या बागा नष्ट झाल्या बसगई हा प्रकार मर रोगप्रतिकारक असल्याचे आढळून आल्यामुळे सोन ची जागा आता बसराईने घेतली आहे. मर रोगाला असंत :प्रतिकारक असे तुरीचे प्रकार उपलब्ध आहेत.

कोबीच्या घाण्या रोगासाठी बियांना पेरणीपूर्वी सूक्ष्मजंतूनाशक द्रव्य चोळण्याने रोगाला आळा बसतो. बटाट्यावरील बांगडी रोगासाठी हिमाचल प्रदेशात तयार झालेले रोगमुक्त बेणे वापरणे आणि पिकाची फेरपालट करणे, हे अनुभवसिद्ध उपाय आहेत. बटाट्याचे मर रोगप्रतिकारक प्रकार उपलब्ध नाहीत.

संदर्भ: 1. Kamat, M. N Introductory Plant Pathotogy, Poona. 1967.

          2. Mundker, B. B. Fungi and Plant Disease, London, 1961.

          3. Walker. J. C. Plant Pathotogy, New York, 1969.

गोखले,वा. पु.