मन्‍रो, सर टॉमस : (२७ मे १७६१-६ जुलै १८२७).हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील एक सनदी नोकर व मद्रास इलाख्याचा गव्हर्नर (कार. १८२०-२७). त्याचा जन्म ‘ग्लोसगो’ (स्कॉटलंड) येथे व्पारी सधन घराण्यात झाला. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ग्लासगोला झाले. १७८९ मध्ये तो मद्रासच्या घोडदळात सनदी नोकर म्हणून आला. कर्नाटकात हैदर अलीबरोबरच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लढाईत त्याने शौर्य दाखविले. पुढे १७९०-९२ मध्ये टिपूबरोबरच्या लढाईतही तो सेनानी म्हणून होता. या लढाईत टिपूकडून घेतलेल्या बारमहाल या परगण्याचा राज्यकारभार पाहण्याचे काम कंपनीने त्याच्याकडे सोपाविले आणि जिल्हाधिकारी व दडांधिकारी म्हणून त्यास पदोन्नती मिळाली. सुमारे सात वर्षे त्याने या भागाचा कारभार चोख केला आणि शेतसारा व मोजणी या मूलभूत तत्वांचा अभ्यास करून ती योजना सर्व मद्रास इलाख्यात अंमलात आणावी, अशी शिफारस त्याने कंपनीला केली. टिपूचा संपुर्ण पाडाव झाल्यावर तो कर्नाटकातील कानडा जिल्ह्यामध्ये काही दिवस स्थिरस्थावर करण्यासाठी राहिला. ब्रिटिश ईस्ट कंपनीने १८००-१८०७ मध्ये हैदराबादच्या निजामाकडून बेरारचा (वर्‍हाडचा) काही प्रदेश घेतला. त्याची व्यवस्थाही मन्‍रोकडे जिल्हाधिकारी या नात्याने देण्यात आली. तेथे त्याने जमिन सार्‍याची रयतबारी पद्धत चालू केली. मध्यंतरी इंग्‍लंडमध्ये तो रजेवर गेला असताना त्याने कंपनीच्या परवान्याचे नूतनीकरण प्रकरणात ईस्ट इंडिया कंपनीस मदत केली. परत आल्यानंतर १८१४ मध्ये त्यास न्यायदान व पोलीस खात्यात सुधारणा करण्यासाठी मद्रासला पाठविले. त्याने १८१७ मध्ये पेंढारी युद्धात भाग घेऊन पुन्हा एकदा पराक्रम दाखविला. याच सुमारास पेशव्यांचा दक्षिणेकडील मुलूख ताब्यात घेण्यासाठी त्याला पुन्हा मद्रासला पाठविले. या वेळच्या त्याच्या कामगिरीबद्दल हाउस ऑफ कॉमन्समध्ये लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंगने प्रशंसोद् गार काढले. या चढाईच्या निमित्ताने त्याने नऊ किल्ले घेऊन ईस्ट इंडिया कंपनीला दक्षिणेत स्थैर्य मिळवून दिले. या त्याच्या कार्याबद्दल कंपनीने १८२० साली त्यास मद्रासचा गव्हर्नर नेमले. त्याने मद्रास इलाख्यात सारा पद्धत व रयतवारी सुरू करून राज्यव्यवस्थेत अनेक मौलिक सुधारणा केल्या. लॉर्ड वेलस्लीच्या प्रदेशविस्तार व चढाईच्या धोरणास त्याने पाठिंबा दिला. कुर्नूल जिल्ह्यातील पट्टिकोंडा येथे तो पटकीने मरण पावला.

मन्‍रो ईस्ट इंडियाकंपनीत एका साध्या पदावर नोकरीस लागला आणि आपल्या कर्तबगारीने हळूहळू चढत जाऊन मद्रासचा गव्हर्नर झाला. मद्रास इलाख्यात त्याने कार्यक्षम प्रशासनाबरोबर महसूलाबाबत मौलिक सुधारणा करून रयतवारी पद्धत अंमलात आणली. त्याचे या पद्धतीसंबंधीचे तपशीलवार अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. एक कार्क्षण प्रशासक व कंपनीचा हिततत्पर नोकर म्हणून त्याचे नाव प्रसिद्ध आहे.

संदर्भ: Dodwell, H. H. Ed. The Cambridge History of India, Vol. V. Delhi, 1958.

देवधर, य. ना.