मोरवी संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील सौराष्ट्रातील एक संस्थान. क्षेत्रफळ २,१०४·३२ चौ.किमी. लोकसंख्या सु.१,४१,८१७ वार्षिक उत्पन्न सु. ५६ लाख. या संस्थानात १५४ खेडी होती. कच्छच्या महाराजांपैकी कायराजीने १७२० मध्ये मच्छू नदीच्या किनाऱ्याजवळ हे वेगळे संस्थान स्थापिले. प्रदेश सलग नसून कच्छमध्ये संस्थानचे जंगी हे बंदर आणि अधोनी हा तालुका होता.त्यावरून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत कच्छशी दावा चालला होता. कायराजीच्या मृत्यूनंतर (१७३४) त्याचा मुलगा तेजमलजी अल्पकाळ गादीवर होता. त्याने ववानिया हे उत्तम बंदर वसविले. १८०७ मध्ये संस्थान ब्रिटिश मांडलिकीत आले. तेजमलजीच्या वारसाने–पृथ्वीराजजी–याने (१८२९–४६) कर्ज फेडले, तर रावजीने (१८४६–७०) आधुनिक शासनाचा पाया घातला. ठाकूर दुसरे वाघजीला (१८८९–१९२२) अधिकार मिळेपर्यंत ब्रिटिश शासन होते. त्याच काळात सौराष्ट्रातील संस्थानांत यास प्रथम श्रेणी मिळाली (१८८७). विसाव्या शतकात रेल्वे, पक्क्या सडका, ट्राम, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, सरकीच्या गिरण्या, महाराष्ट्रीय व्यापारी गणपुले यांचे परशुराम पॉटरी वर्क्स इ. अनेक क्षेत्रांत प्रगती झाली, तरी दुसऱ्या वाघजीचा कारभार जुलमी होता अशी वृत्तपत्रीय टीका येई. श्रीलुखंधीरजी बहादूर १९२२ मध्ये गादीवर आले. संस्थानातील नवलाखी हे बंदर परदेशीय व्यापारासाठी वापरात असे. मोरवी येथे व्यवसाय शिक्षण देणारे विद्यालय असून संस्थानात प्राथमिक व दुय्यम शिक्षण मोफत होते. संस्थानात २५० पोलीस होते, पण सैन्य नव्हते. इंग्रजांना रु. ९,२६३ व बडोदे संस्थानला रु. ४९,२०८ खंडणी संस्थानला द्यावी लागे. १९४८ मध्ये हे संस्थान सौराष्ट्र संघात विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.