मधुरचेन्न : (३१ जुलै १९०३-१५ ऑगस्ट १९५३). अध्यात्मज्ञानाचे उपासक, कन्नड लेखक व कवी. विजापूर जिल्ह्यातील हलसंगी नावाच्या खेड्यात जन्म. मधुरचेन्नांचे मूळ घराणे बेळगाव जिल्ह्यातील गलगली. अभ्यासू वृत्तीमुळे १९२१ मध्ये सातवीच्या परीक्षेत चन्नमल्लप्पा चार जिल्ह्यातून पहिले आले. शालेय वयातच शिवलीलामृतातील कथा ते उत्तम रीतीने सांगत असत. १९२२ मध्ये त्यांनी सिरीयाळ सत्त्व परीक्षे नावाचे नाटक व १९२४ मध्ये विनोद कसुमाषळी नावाचा कवितासंग्रह रचला. हे त्यांचे दोन्हीही ग्रंथ अजूनही हस्तलिखित स्वरूपातच आहेत. मधू हे चन्नमल्लपांचे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र. त्याचे प्रतीक म्हणून चन्नमल्लप्पांनी आपले ‘मधुरचेन्न’ असे काव्यनाम धारण केले.

त्यांचे बालमन सदैव ईश्वरचिंतन करीत असे. त्यामुळे विवेकानंद, रामकृष्ण परमहंस इत्यादींचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यांनी बायबलचाही सखोल अभ्यास केलेला होता. नंतर श्रीअरविंद व माताजी यांच्याही वाङ्‍मयाकडे त्यांचे लक्ष गेले. १९३८ साली त्यांना श्रीअरवींद आणि माताजी यांचे दर्शन घडले. सातवीनंतर त्यांचे शिक्षण थांबले. त्यांनी हणमंतराव कोणूर नावाच्या एका प्रख्यात शिक्षकाच्या साहाय्याने घरीच इंग्रजीचा अभ्यास केला. पंधरा वर्षात प्रयत्‍नानेही आकलन न झालेले श्रीअरविंदांचे इंग्रजी वाङ्‍मय अरविंदांच्या दर्शनानंतर १५ दिवसांतच मधुरचेन्न यांना कळू लागले, असे स्वत: त्यांनीच एके ठिकाणी लिहिले आहे. विद्यारण्यांचे जीवनमुक्तीविशेष हे पुस्तक, ‘ए. ई.’ (जॉर्ज विल्यम रसेल) चा कँडल ऑफ द व्हिजन हा ग्रंथ, श्रीअरविंदांचे भगवद्‍गीतेवरील लिखाण इ. वाङ्‍मयाचा प्रभाव मधुरचेन्नावर प्रकर्षाने पडला. हलसंगीसारख्या लहान गावी त्यांनी ‘श्रीअरविंद मंडळ’स्थापन केले व श्रीअरविंद वाङ्‍मयाचा प्रचार केला.

पूर्वरंग (आध्यात्मिक आत्मकथन-१९३२), नन्न नल्ल (कविता संग्रह-१९३३), काळरात्री (आत्मकथन-१९३३), आत्मसंशोधन (१९३५, मधुरगीत, कन्नडिगर कुलगुरू श्रीविद्यारण्य (१९३६), बेळगु (आत्मकथन-१९३७), पूर्वयोग पथदल्ली (श्रीअरविंद तत्त्वविचार-१९६०) इ. त्यांची ग्रंथसंपदा प्रकशित झाली आहे.

वा. म. जोशीकृत राक्षसी महत्त्वकांक्षा ह्या मराठी नाटकाचा कन्नडमध्ये त्यांनी अनुवाद केला. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांचे विसर्जन हे नाटकही कन्नडमध्ये अनुवादीत केले (१९२९). टॉलस्टॉय यांचे आत्मचरित्र व श्री अरविंद व माताजींचे पुष्कळसे लिखाण यांचा त्यांनी कन्नडमध्ये अनुवाद केलेला आहे.

बादरायण व्यासांचे ब्रह्मसूत्र, कपिलमुनिरचित सांख्य दर्शन, भाषाशास्र इ. बोजड विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी लिहिलेले अनेक लेख अजून ग्रंथरूपाने प्रसिध्द व्हवयाचे आहेत.

सोलापूर येथे १९५० मध्ये भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाच्या कवितासंमेलनाचे अध्यक्षपद मधुरचेन्नांनी भूषविले होते. मधुरचेन्नांचा नन्न नल्ल हा काव्यसंग्रह आध्यात्मिक भावगीतांनी नटला असून त्यांच्या मधुरगीत ह्या काव्यसंग्रहात कौटुंबिक भावगीते आहेत.मधुरचेन्न व महाकवी द. रा. बेंद्रे हे अगदी निकटचे मित्र होते. मधुरचेन्नांच्या काळरात्री, नन्न नल्ल इ. पुस्तकांना द. रा. बेंद्रे यांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत.

मधुरचेन्नांचा पिंडच आध्यात्मिक होता. म्हणून त्यांचा सर्व लिखाणातून अध्यात्मविचार आढळतो. ‘अध्यात्मविरहित काव्य मधुरचेन्नाच्या बाबतीत संभवतच नाही’, असा मार्मिक अभिप्राय रं. श्री. मुगळींनी व्यक्त केलेला आहे. प्राध्यापक स. स. माळवाड व सिंपी लिंगण्णा यांनी मधुरचेन्नांविषयी लिहिलेली परिचयात्मक पुस्तके अलीकडेच प्रसिध्द झालेली आहेत.

बेंद्रे, वा. द