कार्नाड, गिरीश : (१९ मे १९३८–  ). आजच्या पिढीतील अग्रगण्य कन्नड नाटककार. जन्म महाराष्ट्रात माथेरान येथे व बालपण अल्पकाळ मुंबई आणि पुणे येथे. पुढे वडिलांची बदली झाल्याने प्राथमिक शिक्षण उत्तर कॅनरा जिल्ह्यातील शिरसी येथे. धारवाड येथून ते बी.ए.झाले. नंतर मुंबई विद्यापीठात एम्‌.ए.करीत असतानाच त्यांना ऑक्सफर्डची ‘ऱ्होड्‌स शिष्यवृत्ती’ मिळाली आणि ते ऑक्सफर्डला गेले (१९६०). १९६१–६२ ह्या काळात ऑक्सफर्ड युनियनचे ते अध्यक्ष होते. १९६३ मध्ये ते ऑक्सफर्डमधून बी.ए.झाले. १९६३ ते १९७० पर्यंत ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या मद्रास येथील कार्यालयात प्रथम सहाय्यक व्यवस्थापक व नंतर व्यवस्थापक होते. १९७० मध्य मौलिक निर्मितीसाठी दिली जाणारी ‘होमी भाभा शिष्यवृत्ती’ त्यांना मिळाल्यामुळे (१९७०–७२) युनिव्हर्सिटी प्रेसमधील नोकरी सोडून त्यांनी आपले लक्ष नाटक व चित्रपट यांवर केंद्रित केले. पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट’ चे ते १९४७ पासून संचालक आहेत.

आतापर्यंत त्यांची ययाति (१९६१), तुबलक (१९६४) आणि हयवदन (१९७१) ही कन्नड नाटके प्रकाशित झाली असून ती अत्यंत गाजली. त्यांच्या ह्या तिन्ही नाटकांचे मराठीत अनुवाद व यशस्वी प्रयोगही झाले आहेत. तुघलकचा त्यांनी स्वतःच इंग्रजी अनुवाद केला असून तो १९७२ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केला. त्यांनी हयवदनचाही इंग्रजी अनुवाद केला असून तो एनॅक्ट  ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसही तो स्वतंत्र पुस्तकरुपाने प्रसिद्ध करीत आहे. त्यांच्या नाटकांचे हिंदी, बंगाली इ. भारतीय भाषांतून अनुवाद आणि प्रयोग झाले. त्यांच्या ययातिस १९६१ मध्ये म्हैसूर राज्य सरकारचे पारितोषिक आणि हयवदनला भारतीय नाट्य संघाकडून १९७०–७१ मधील भारतीय भाषांतील सर्वोत्कृष्ट नाटकाचे ‘कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक’ मिळाले. भारत सरकारच्या ‘संगीत नाटक अकादमी’ ने १९७२–७३ मधील सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

नाट्यक्षेत्राप्रमाणेच चित्रपटक्षेत्रातही त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांची पटकथा व नायकाची भूमिका असलेल्या संस्कार (यू.आर्‌. अनंतमूर्ती यांच्या संस्कार  ह्या कन्नड कादंबरीवर आधारित) या कन्नड चित्रपटास १९७० चे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले असून वंशवृक्ष  या त्यांनी बी. व्ही. कारंत यांच्यासोबत सह-दिग्दर्शित केलेल्या कन्नड चित्रपटासाठी, १९७१ चे उत्कृष्ट दिग्दर्शनाचे राष्ट्रपती पारितोषिकही त्यांना मिळाले आहे. प्रख्यात कन्नड कवी द.रा.बेंद्रे ह्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या अनुबोधपटाचे १९७२ मध्ये त्यांनी दिग्दर्शन केले. श्रीकृष्ण अलनहळ्ळीलिखित काडू (जंगल) कादंबरीवर आधारित कथा चित्रपटाचे (१९७३) दिग्दर्शन त्यांनी स्वतंत्रपणे केले आहे. प्रस्तुत कथा चित्रपटास ग्रामीण जीवनाचे उत्कृष्ट चित्रण केल्याबद्दल ‘युनिक्रिट’ या चित्रपटसमीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने पारितोषिक दिले आहे (१९७५).

पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरील त्यांच्या नाटकांतून आधुनिक दृष्टिकोनाचा आणि स्वतंत्र प्रज्ञेचा कलात्मक अविष्कार आढळतो. हयवदनमध्ये त्यांनी पारंपरिक यक्षगान लोकनाट्याच्या तंत्राचा कौशल्याने उपयोग करून त्याचे पुनरुज्जीवन केले आहे. प्रायोगिक रंगभूमीचे ते एक आधारस्तंभ मानले जातात.

वर्टी, आनंद