मधुबनी चित्रशैली : बिहारमधील एक लोककला. बिहारमध्ये दरभंगा जिल्ह्यातील मधुबनी या खेड्यात झोपड्यामध्ये भिंती, जमीन व देवतेचे पूजास्थान सुशोभित करण्यासाठी, ग्रामीण आदिवासी स्त्रिया रंगीत चित्रे काढीत. त्यांत रामायण, महाभारत, अन्य पुराणकथा यांतील प्रसंग तसेच देवदेवता आणि शुभसूचक चिन्हांचे (उदा., झोपडीच्या दाराशी काढलेली, घराच्या आत वळलेली धनदेवता लक्ष्मीची पावले) चित्रण असे. ही कला तिथे वंशपरंपरेने आजही टिकून आहे. ही लोककला झेपड्यांमधील भिंतींवरून हळूहळू कापडावर व नंतर कागदावर उतरली. कागदावरही तिची भित्तिचित्रणातील भव्यता झगमगाटासह कायम राहिली. मात्र या झगमगाटात भडकपणाचा अंशही दिसून येत नाही. रूढ अर्थाने यथादर्शनाचा अभाव, वेलबुट्टीमध्ये पानाफुलांचे शैलीकरण आणि परंपरेतून आलेली आकृतिबंधाची उपजत जाणीव ही या चित्रांची वैशिष्ट्ये होत. टोकदार नाक, अरुंद कपाळ, मत्स्याकृती डोळे, धडापासून वेगळे वाटणारे सैलसर व लांब हातपाय, ही या शैलीतील व्यक्तिचित्रणाची वैशिष्ट्ये आहेत. ग्रीसमधील प्राचीन क्रीट संस्कृतीतील चित्रांतील व्यक्तींशी हे व्यक्तिचित्रण आश्चर्यकारक साम्य दर्शवते.
या चित्रांसाठी वापरण्यात येणारे रंग हे स्थानिक वनस्पती व नैसर्गिक साधनांपासून तयार केलेले असतात. त्यांत नैसर्गिक चमक व टवटवीतपणा दिसतो. उदा., कुसुंबा या फुलापासून झगमगता शेंदरी (कुसुंबी) रंग; केळीच्या पानांचा रस, दूध व पातळ चुना यांच्या मिश्रणातून फिका सोनेरी हळदीचा गडद पिवळा; कोळशाच्या धुराच्या काजळीचा गडद काळा; पळसाच्या फुलांपासून पिवळा; वेलींच्या पानांपासून हिरवा असे नैसर्गिक रंग चित्रांमध्ये चैतन्य आणतात. चित्र रंगवताना बाभळीच्या झाडाच्या डिंकात शेळीचे दूध मिसळून ते मिश्रण बंधकद्रव्य म्हणून वापरतात. बांबूची काडी टोकाला घासून व कुंचल्यासारखी करून सूक्ष्म तपशिलांचे व बाह्यरेषांचे रंगांकन करण्यासाठी वापरतात. काडीच्या टोकाला छोटीशी चिंधी बांधून ती रंगांचे मोठे हात देण्यासाठी वापरली जाते. दूर अंतरावरून चित्र पाहिले असता या सर्व चमकदार रंगांची संगती बेमालूम साधलेली दिसते.
मधुबनी या खेड्यात सध्या अनेक स्त्रिया ही चित्रनिर्मिती मोठ्या प्रमाणावर करतात. ‘ऑल इंडिया हँडिक्रॅप्ट्स बोर्ड’ या संस्थेने येथे या चित्रांच्या खरेदीविक्रीची व्यवस्था केली आहे. ही चित्रशैली जगद्विख्यात झाली, यांचे श्रेय झॉर्झ ल्यूनो या फ्रेंच प्रवाशाकडे जाते. त्याने बिहारमध्ये राहून मधुबनी चित्रशैलीवर एक माहितीपट तयार केला. तो पाश्चिमात्य देशांत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात आला. आता ही चित्रे कॅनडा, पोलंड इ.पाश्चिमात्य देशांत मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. (चित्रपत्र ५२).
जगताप, नंदा