आयिक, यान व्हान : (सु. १३९० – ९ जुलै १४४१). यान व्हान व ह्यूबर्ट व्हान (सु. १३६६-१८ सप्टेंबर १४२६) हे फ्लेमिश चित्रकार बंधू प्रख्यात आहेत. या भावांचा जन्म मासाइक येथे झाला असावा. ह्यूबर्टने चरित्राविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. गेंट येथील सेंट बेव्हनाच्या कॅथीड्रलमधईल भव्य वेदिचित्रावर (द ॲडोरेशन ऑफ द सेक्रेड लँब, १४२५-३२) कोरलेल्या लेखात या बहुपुटचित्राचा प्रारंभ ह्यूबर्टने केल्याचा व यानने ते पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. या वेदिचित्रातील दोघा भावांच्या चित्रकार्याचे नेमके विश्लेषण करण्यात टीकाकार सतत अपयशी ठरले आहेत. गेंटचे हे चित्र सोडल्यास इतरत्र ह्‌यूबर्टचा नामोल्लेख फारसा आढळत नाही. मात्र यानची स्वाक्षरी व चित्रांचे कालनिर्देश असलेली चित्रे विपुल आहेत. नेदलेंड्सच्या चित्रकलाक्षेत्रातील तो सुरुवातीचा एक थोर चित्रकार मानला जातो. १४२२-२४ या काळात काऊंट ऑफ हॉलंड याच्याकडे तो नोकरीस होता. काऊंटच्या निधनानंतर ड्यूक फिलिपच्या दरवारी त्याने दूत म्हणून काम पाहिले व स्पेनचा (१४२६) आणि पोर्तुगालचा (१४२८) प्रवास केला. १४३० पासून त्याचे वास्तव्य ब्रूझ येथे होते. कालांतराने दरबारी चित्रकार, राजकारणी व नगराधीकारी या नात्यांनी त्याचा लौकिक वाढत गेल्याचे उल्लेख सापडतात.

फ्लेमिश चित्रकलेच्या विकासात आयिक बंधूंनी अत्यंत मोलाची भर घातली. द ॲडोरेशन ऑफ द सेक्रेड लँब हे वेदिचित्र ही त्यांची सर्वांत भव्य कलाकृती होय. या बहुपुटचित्रामध्ये काष्ठफलिकांवर रंगविलेली एकूण वीस चित्रे आहेत. यानच्या नावावर असलेली अगदी प्रारंभीची लघुचित्रे तुरीन मिलान बुक ऑफ अवर्स या नावाने १९०२ मध्ये प्रसिद्ध झाली. यानच्या चित्रातील आध्यात्मिक संवेदन, वास्तवता व नितळ सफाई हे गुण उल्लेखनीय आहेत. चित्राच्या तपशीलात कित्येकदा अनावश्यक वाटणारे वस्तुनिष्ठ बारकावे दर्शवून वास्तवाभास साधण्याची त्याची पद्धती पुढे फ्लेमिश कलेचा एक गुणधर्म ठरली. या दोघा भावांपैकी एकाने तैलचित्रणाचा शोध लावला हे मत स्वीकार्य नसले, तरी त्यावरील त्यांचे असाधारण प्रभुत्व व त्यांनी केलेल्या तांत्रिक सुधारणा यांमुळे तैलचित्रणतंत्राचे स्वरूप आमुलाग्र पालटले. याननिर्मित प्रतिमाचित्रांत मॅन इन रेड टर्बन (१४३३), कार्डिनल आल्बेरगाती (१४३१-३२) तसेच मार्गारेट (१४३९) हे त्याच्या पत्नीचे चित्र इ. उल्लेखनीय आहेत. आनोंल्फिनी मॅरेज ग्रूप (१९३४) ही, त्याची श्रेष्ठ चित्राकृती मानली जाते. ब्रुझ येथे त्याचे निधन झाले व सेंट डोनॅशियनच्या चर्च-आवारात दफन करण्यात आले. (चित्रपत्र ७०).

संदर्भ : Denis, Valentin Trans. Colacicchi, Paul, All the Paintings of Jan Van Eyck, London, 1961.

इनामदार, श्री. दे.

 

'आर्नोल्फिनी मॅरेज ग्रूप' (१४३४) --यान व्हान आयिक. 'मॅन इन रेड टर्बन' (१४३३) --यान व्हान आयिक.