भित्तिलेपचित्रण : (फ्रेस्को पेंटिंग). भिंतीच्या गिलाव्यावर चित्र रंगविण्याची एक तांत्रिक प्रक्रिया. दगडाच्या किंवा विटांच्या भिंतीवर चुन्याचा गिलावा करून त्यावर केवळ पाण्यात मिसळलेल्या रंगांनी रंगवावयाच्या चित्रणपद्धतीस ‘फ्रेस्को’ अशी संज्ञा आहे. ‘फ्रेस्को’ हा मूळ इटालियन शब्द असून त्याचा अर्थ ‘ताजा’ (फ्रेश) असा होतो. चित्र रंगविण्याच्या मुख्य पद्धती दोन होत : (१) भिंत ओली असतानाच व ओली असेपर्यंतच चित्र रंगविणे, (२) भिंत पूर्ण सुकल्यानंतर चित्र रंगविणे. पहिल्या पद्धतीस खरे (ट्रू) किंवा ‘बॉन’ (Buon) फ्रेस्को असे म्हणतात आणि दुसऱ्या पद्धतीस ‘सेक्को’ (Secco) फ्रेस्को असे म्हणतात. दोन्हीही पद्धतींत रंगामध्ये कोणत्याही प्रकारचे चिकट द्रव्य म्हणजे गोंद, खळ इ. मिसळले जात नाही. शिवाय रंग विशेषतः खनिज (अर्थ किंवा मिनरल) प्रकारचे असून, रासायनिक (केमिकल) प्रकारच्या रंगांचा उपयोग जराही केला जात नाही. सेक्को भित्तिलेपपद्धतीने रंगविलेल्या चित्राच्या पृष्ठावर चित्र टिकाऊ करण्याच्या हेतूने मेणाचा पातळ थरही दिला जातो.

भित्तिलेपचित्रणपद्धती फार पुरातन आहे. चुन्याच्या गिलाव्याची पद्धती (स्टको) प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात असून ईजिप्शियन संस्कृतीत त्याचा अनेक प्रकारे वापर केल्याचे दिसून येते. ग्रीक कलावंतांनाही भित्तिलेपतंत्र चांगलेच अवगत होते. इ. स. पू. १५०० वर्षांपूर्वी रंगविलेली क्रीटमधील ⇨ नॉससच्या राजप्रासादाच्या भिंतींवरील चित्रे ही भित्तिलेपतंत्रातील असावीत, असे काही तज्ञांचे मत आहे. रोम आणि पाँपेई येथील भित्तिलेपचित्रे सेक्को पद्धतीची असून, त्यावर मेणाचा पातळ थर दिलेला आहे. त्यामुळेच ती चित्रे आजमितीस शाबूत आहेत. ग्रीक कलातंत्रज्ञ ⇨व्हिट्रूव्हिअस (इ.स.पू. पहिले शतक) व थोरला प्लिनी (इ. स. २४-७९) यांनी चुन्याच्या व जिप्समच्या गिलाव्याविषयी तपशीलवार माहिती नमूद करून ठेवली आहे. गिलाव्याविषयीची ही माहिती परिपूर्ण आणि महत्त्वपूर्ण समजली जाते. मध्ययुगात यूरोपमध्ये परिष्कृत चुना (फाइन लाइम) व दमट चुना (हायड्रॉलिक लाइम) बनवण्याचे कौशल्य लोप पावले. तथापि प्रबोधनकाळात भित्तिलेपपद्धतीचे पुनरुज्‍जीवन झाले. लिओनार्दो दा व्हींची, जॉत्तो, मायकेलअँजेलो, रॅफेएल यांनी उत्तमोत्तम भित्तिलेपचित्रे निर्माण केली. मध्य आशिया, चीन, भारत येथील इ. स. पू. १०० वर्षांपासून ते चवथ्या-पाचव्या शतकापर्यंत रंगविण्यात आलेली भित्तिलेपचित्रे सेक्को तंत्रातील आहेत. तथापि त्या ठिकाणी प्रमुख आधार-भिंत (सपोर्टिंग वॉल) मातीची असून त्यात भाताचे गवत, शेण इत्यादींचा वापर केलेला आढळतो.

गिलावा करण्याची पद्धत : भिंतीवर गिलावा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. गिलाव्याकरिता लागणारे प्रमुख घटक म्हणजे चुना व वाळू. तथापि ग्रीक पद्धतीत चुन्याबरोबर विटा व कौलाची भुकटी, संगमरवरी दगडाची भुकटी, वाळू, ‘पोझोलाना’ खनिज इत्यादींचा वापर करून गिलाव्याचे सहा थर देण्याची प्रथा होती. ⇨अजिंठ्यामध्ये माती, भाताचे गवत, शेण, गूळ यांचे परिपक्व मिश्रण करून दगडावर त्याचा थर दिला जाई व त्यावर चुना व वाळू यांचा अतिशय गुळगुळीत थर दिला जाई. ईजिप्तमध्येही गवताचा व इतर तंतुमय वनस्पतींचा चुन्यात मिसळण्यासाठी उपयोग केला जाई. भाताच्या गवताच्या तुसांमुळे भिंतींना तडे जात नाहीत, असा अनुभव आहे.

चुना : भित्तिलेपनाकरता वापरावयाच्या चुन्याचे तीन प्रकार आहेत. (१) कळीचा चुना किंवा तिखट चुना (फॅट लाइम), (२) विरळ चुना (थिन लाइम) व (३) दमट चुना. शुद्ध ‘ऑक्साइड ऑफ कॅल्शियम’ असलेला कळीचा चुना भट्टीत चांगला भाजल्यानंतर हलका व पाण्यात चटकन विरघळणारा असा होतो. विशेषकरून हाच चुना सर्वत्र वापरतात. भट्टीतून काढल्यानंतर लवकरच तो पाण्यामध्ये निवळून परिपक्व करावा लागतो. विरळ चुन्यात मॅग्‍नेशियमचे प्रमाण भरपूर असते. हा चुना पाण्यात फार फुगत नाही व त्याचा गिलावा फार जलद वाळत नाही. गिलाव्यानंतर जवळजवळ ५६ तासांपर्यंत चित्रकाराला त्यावर काम करता येते. ऑस्ट्रियातील प्राचीन भित्तिलेपचित्रे ह्याच चुन्याच्या गिलाव्यावरील आहेत. तथापि या चुन्यावर दूषित हवेतील कोळशाच्या धुराचा व सल्फ्युरिक ॲसिडचा परिणाम फार लवकर होतो. दमट चुना हा फार लवकर घट्ट होतो व काही रंग त्याच्याशी एकजीव होत नाहीत. त्यामुळे भत्तिचित्रे टिकाऊ होत नाहीत. [⟶ चुना ].

चुना निवळणे : चुना निवळून परिपक्व करणे हे एक तंत्र आहे. गिलावा दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीने त्यास फारच महत्त्व आहे. प्राचीन काळी हा चुना कैक वर्षे जमिनीत गाडून ठेवीत असत. रोमन लोक निवळण्याची क्रिया जलद होण्याकरिता त्यात अम्‍ल मिसळत, तर भारतात त्यात ताक मिसळण्याची पद्धत होती. इटालियन कलातज्ञ ⇨आल्बेर्ती याच्या मतानुसार चुना हळूहळू निवळावा लागतो. चुन्यात थोडे थोडे पाणी घालून तो दमट व अंधाऱ्या जागी ठेवावा. बरेच दिवस झाकून ठेवल्यानंतर तो परिपक्व होतो.

वाळू : नदीकाठची वाळू ही सर्वांत उत्तम वाळू असते. वाळू पुनःपुन्हा धुऊन घ्यावी लागते. त्यात क्षार किंवा माती यांचे प्रमाण जराही असता कामा नये. क्षार किंवा माती असल्यास भिंतीस तडे जातात.


गिलावा : (प्लास्टर). गिलावा विशेषतः विटांच्या भिंतीवर केला जातो. तथापि भारतात अजिंठा, बाघ, बादामी इ. ठिकाणी पाषाणात खोदलेल्या गुहांत सरळ पत्थराच्या भिंतीवरच गिलावा देण्यात आला असून तो शेण, माती, गवत इत्यादींच्या मिश्रणाचा आहे. विटा पाणी शोषून घेतात, म्हणून गिलावा देण्यापूर्वी त्या भरपूर भिजवाव्या लागतात. साधारणपणे गिलाव्याचे तीन थर दिले जातात. त्या थरांची तांत्रिक नावे अशी : (१) जाडाभरडा थर (स्क्रॅच किंवा रफ कोट किंवा Arriciato) (२) करडा थर (ब्राउन कोट) व (३) चित्राचा थर (Intonaco). या थरांची जाडी आणि चुना व वाळू यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे : (१) जाडाभरडा थर : जाडी साधारणतः / इंच (१२.७ मिमी.) किंवा / इंच (१९.०५ मिमी.) चुना व वाळू यांचे प्रमाण १ : २ (२) करडा थर : जाडी / इंच (१९.०५ मिमी.) किंवा / इंच (६.३५ मिमी.) चुना-वाळू-प्रमाण १ : १. (३) चित्राचा गिलावा : जाडी जास्तीत जास्त / इंच (६.३५ मिमी.) चुना-वाळू-प्रमाण २ : १. हा थर हवा तेवढा घोटून गुळगुळीत बनवता येतो. गवंड्याची थापी किंवा अकीक (ॲगेट) दगड घासून हा थर गुळगुळीत करतात. काचेची बाटली घासूनही हा थर गुळगुळीत बनवता येतो. ग्रीक तंत्रानुसार पहिल्या थरात चुन्याबरोबर विटा किंवा कौलाची भुकटी, गवताची तुसे, कापूस, धागे इ. गोष्टी मिसळलेल्या असतात. दुसऱ्या थरात चुना व वाळू याचा वापर केलेला असतो आणि तिसऱ्या थरात चुना व संगमरवराची भुकटी मिसळलेली असते. व्हिट्रूव्हिअसने गिलाव्याच्या सहा थरांची शास्त्रशुद्ध पद्धत आपल्या ग्रंथात नमूद केली आहे. भारतात राजस्थानमध्ये गिलाव्याच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती आजही प्रचलित आहेत. [⟶ गेसोकाम].

चित्रणतंत्र : भित्तिलेपचित्रणास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यापूर्वी चित्रकार त्याचे कच्चे रेखाटन करतो. त्यास ‘कार्टून’ अशी संज्ञा आहे. ते मूळ चित्राच्याच तंतोतंत आकारात असते व ते भिंतीवर ठेवून त्यानुसार बाह्य रेषांकन केले जाते. भित्तिलेपचित्रणाच्या पहिल्या पद्धतीत (बॉन फ्रेस्को) गिलावा ओला असताना व ओला असेपर्यंतच चित्र रंगवले जाते. कारण चुन्याच्या वाळण्याच्या रासायनिक क्रियेबरोबरच रंग गिलाव्याशी एकजीव होतात. त्यामुळे फार मोठे भित्तिचित्र रंगवताना एका दिवसात चित्राचा जेवढा भाग पुरा करता येईल, तेवढ्याच भिंतीवर गिलावा द्यावा लागतो. सेक्को भित्तिलेपपद्धतीत मात्र गिलावा वाळल्यानंतरच सावकाशपणे चित्र रंगवता येते. दोन्ही पद्धतींत रंग केवळ पाण्यातच मिसळले जातात व नंतर गरजेनुसार त्यात अगदी थोड्या प्रमाणात चुन्याची स्वच्छ निवळी मिसळली जाते.

रंग : भित्तिलेपचित्रणाकरिता वापरावयाचे रंग पूर्णपणे खनिज असावे लागतात. रासायनिक रंग एकजीव होत नाहीत व कालांतराने ते नाहीसे होऊन जातात. 

संदर्भ : 1. Bazzi, Maria, The Artist’s Methods and Materials, London, 1960.

            2. Gettens, R. J. Stout, G. L. Painting Materials : A Short Encyclopaedia, New York, 1966.

            3. Hiler, Hilaire, Notes on the Techniques of Painting, London. 1948.

            4. Massey, Robert, Formulas for Artists, London, 1968

            5. Meiss, Millard, The Great Age of Fresco, 1968.

सडवेलकर, बाबुराव

उदयपूरच्या ‘सिंटी पॅलेस ’मधील भित्तिलेपचित्र,१७ वे शतक.

नख्तच्या थडग्यातील ईजिप्शियन भित्तिलेपचित्राची प्रतिकृती,थीब्झ,१८ वा राजवंश, इ.स.पू.सु.१५७० ते १०७५.

रोमनेस्क भित्तिलेपचित्र : नोआच्या कथेतील अंशदृश्य,सें सावहे,सु.११००.

‘ सिस्टाइन चॅपेल ’ च्या(व्हॅटिकन,रोम) छतावरील भित्तिलेपचित्र : ‘द प्रॉफेट जेरीमाइआ ’ (१५०८-१२)—मायकेल अँजेलो. ‘ स्कूल ऑफ अथेन्स ’(अंशदृश्य १५०९-१०)—रॅफएल व्हॅटिकन स्तांझा,रोम.
 ‘सेंट पीटर डिस्ट्रिब्यूटिंग द गुड्‌स ऑफ द कम्युनिटी टू द फेथफूल अँड डेथ ऑफ ॲननाइअस ’(१४२७-२८)—माझात्‌चो ब्रँकाची चॅपेल,फ्लॉरेन्स. ‘ मॅसॅकर ऑफ द इनोसंट्‌स ’(अंशदृश्य १३०६-१२)—जॉतो आरेना चॅपेल, पॅडचआ.