मायकेल अँजेलो :(६ मार्च १४७५–१८ फेब्रुवारी १५६४). प्रबोधनकाळातील एक श्रेष्ठ इटालियन चित्रकार, मूर्तिकार व वास्तुकार. पूर्ण नाव मायकेल अँजेलो ब्वॉनारॉती. काप्रेसे येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्म. वयाच्या तेराव्या वर्षी फ्लॉरेन्समध्ये गिर्लांदायो या चित्रकाराच्या हाताखाली उमेदवारी केली. सुमारे एक वर्षांनंतर ही उमेदवारी संपुष्टात आली व तदनंतर फ्लॉरेन्सचा राज्यकर्ता लोरेन्झो दे मेदीचीच्या संग्रहातील प्राचीन रोमन शिल्पाकृती अभ्यासण्याची संधी त्याला मिळाली. वयाच्या सु. सतराव्या वर्षी त्याने पहिले शिल्प संगमवरातील उत्थित शिल्प मॅडोना ऑफ द स्टेअर्स घडवले. त्याच सुमारास त्यानेबॅटल ऑफ लॅपिप्सअँड सेंटॉर्स (१४९१–९२) हेही संगमरवरी उत्थित शिल्पघडवले. त्याने प्रामुख्याने फ्लॉरेन्स व रोम या दोन शहरांतआपली कलानिर्मितीकेली. रोम येथील बॅकस (१४९६–९७)ह्या मद्यदेवतेचा संगमवरी पुतळा हीत्याची सुरुवातीच्याकाळातील भव्यप्रमाणातील शिल्पनिर्मिती होय. मायकेल अँजेलोला काव्याची व तत्त्वज्ञानाची विलक्षण आवड होती. तो स्वतः त्याच्या काळातील एक उत्कृष्ट भावकवी म्हणून नावाजलेला होता. कंप्लीट पोएम्स ॲड सिलेक्टेड लेटर्स ऑफ मायकेल अँजेलो हा रॉबर्ट एन्. लिन्‌स्कॉटने संपादित केलेला व क्रेटन गिल्बर्टने अनुवादित केलेला संग्रह (१९६३) प्रसिद्ध आहे. कलाप्रतिभा, बुद्धिमत्ता आणि चिंतनशीलता यांचा क्वचितच होणारा संगम मायकेल ॲजेलोच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकर्षाने आढळतो. त्याच्याइतके विविध कलाशाखांमध्ये प्रचंड प्रमाणात काम क्वचितच कुणी केले असेल. आपल्या नव्वद वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात तो सतत कार्यरत राहिला. रोम येथे त्याचे निधन झाले. 

मायकेल ॲजेलोचा ब्राँझचा अर्धपुतळा शिल्पकार - जोव्हान्नी दा बोलोन्या.

प्रबोधनकाळ हा यूरोपमधील नवजागृतीचा व नवनिर्मितीचा काळ होता. ज्ञानाची वाढ व मानवी प्रगती यांसाठी धर्मावर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वाने ज्ञान संपादन करून त्याच्या आधारे संस्कृतीची प्रगती करावी लागेल, याची जाणीव मूळ धरू लागली होती. ग्रीक संस्कृती व तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासाचा ख्रिश्चन धार्मिक प्रवृत्तीशी मेळ घालण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. ⇨प्रबोधनकालाच्या या पार्श्वभूमीवर मायकेल अँजेलोची कारकीर्द सुरू झाली. ग्रीक बुद्धिवादाने प्रेरित होऊन त्याने बुद्धिवाद स्वीकारला खरा पण त्याच्या जीवनश्रद्धा मात्र मध्ययुगीन ख्रिस्ती धर्मतत्त्वज्ञानाला इतक्या गच्च पकडून होत्या, की त्या त्याला सोडून देता येत नव्हत्या. अशा गुंतागुंतीत तो सापडला होता. ही गुंतागुंत सगळ्या प्रबोधनकाळालाच व्यापून उरली होती. प्रबोधनकालीन कलेत एकूणच आशय ख्रिश्चन धर्मप्रणीत व कलानिकष मात्र ग्रीक असल्याचे दिसून येते. या अंतर्विरोधाचे नाट्यमय दर्शन मायकेल अँजेलोत प्रकर्षाने घडते.

 ग्रीक संस्कृतीत मानवी कर्तृत्व मानवी प्रतिष्ठा यांना जे उदंड महत्त्व होते, त्याची पुनःस्थापना प्रबोधनकाळात झाली. मानवी शरीराचा सांगोपांग अभ्यास होऊ लागला. मानवी देहाच्या अचूक प्रमाणबद्धतेतच सौंदर्याचे निकष पाहिले जाऊ लागले. याचा प्रभाव मायकेलअँजेलोच्या कलेवरही पडला. याचे उत्तम उदाहरण म्हणून डेव्हिड (१५०१–१५०४) हे शिल्प दाखवता येईल. मायकेलअँजेलोच्या सगळ्याच मानवाकृती एका विशिष्ट भावनात्मक मुशीतून काढल्यासारखा वाटतात. तटतटलेल्या स्नायूंनी व आक्रसलेल्या हालचालींनी त्यांची अस्वस्थता व पिळवटलेपणा यांतून जणू त्याची स्वतःचीच आंतरिक तडफड प्रतिबिंबित होते. या तडफडलेपणाचा अतिरेक झाल्यामुळे त्याच्या स्त्रीचित्रणातून येणाऱ्या राकट पुरूषीपणामुळे त्याला स्त्रीबद्दल तिरस्कार, घृणाच होती, असे भाष्य मर्व्हिन लेव्ही या आंग्ल समीक्षकाने आपल्या मून्स ऑफ पॅरडाइज (१९६२) या ग्रंथात केले आहे. प्येता (१४९८) या शिल्पातील माता मेरी वगळता त्याच्या अन्य चित्रांत किंवा शिल्पांत कुठेही स्त्रीची शालीनता वा मार्दब दिसत नाही.


‘द ड्रंकन बॅकस’, संगमरवरी शिल्प, १४९६-९७.

प्रबोधनकाळात फलकचित्र नुकतेच प्रगत होऊ लागले होते. प्रबोधन काळात सापडलेले हे एक नवीन आश्चर्यच होते. परंतु मायकेलअँजेलोलो  ही  मर्यादित  चित्रचौकट मानवलीच  नाही.  त्याने  ती  बाजूला  सारून  अमर्याद  अवकाशालाच  हात  घातला.  आदिमानवाने जशी  आपल्या  गुहेत  भिंतीवर  व  छतावर  स्वैरपणे  चित्रे  रंगवली, तशी मायकेलअँजेलोने चर्चवास्तूंच्या भिंतीवर, छतांवर भित्तिलेपचित्रणतंत्राचा वापर करून मनमुराद चित्रे रंगवली. येथे आदिमानवी  निर्भर  प्रवृत्तीशी  मायकेलअँजेलोचे  नाते  जुळते.  रोममधील ‘सिस्टाइन  चॅपेल’  या  चर्चच्या  छतावर  त्याने  अशीच भारून टाकणारी  चित्रे  रंगवली  आहेत.  बायबलमधील  अनेक प्रसंग या चित्रांचे विषय आहेत. छताच्या तीन भागांत त्रिकोन-चौकोनांची सुंदर रचना करून त्यात त्याने ही चित्रे काढली आहेत. यातील त्याचे क्रिएशन ऑफ आदम (१५१२ पहा : मराठी विश्वकोश : खंड २ चित्रपत्र ४०) हे चित्र कलादृष्ट्या अमर ठरले आहे. परमेश्वराने मानवाच्या नासिकेतून प्राण फुंकले व मानवप्राणी पृथ्वीतलावर अवतरला, ही बायबलमधील आख्यायिका त्याने चित्रकाराच्या नजरेने पाहिली. स्वर्गलोकातून झेपावत येणारा परमेश्वर  आपली तर्जनीपुढे  करून  आदमच्या जड‘मॅडोना ॲड चाइल्ड’, संगमरवरी शिल्प -अंशदृश्य, नोत्रदाम चर्च, ब्रूझ, १५०१-०४देहात चेतना भरतो, आदमचा अचेतन देह पाठीचा कणा उंचावून व हात पुढे करून तर्जनीतून ती स्वीकारतो, दोघांच्या तर्जनीचे अग्रबिंदू परस्परांना स्पर्श करतात, हा दृश्य अनुभव घेताना त्या बिंदूपाशी चेतनेचे स्पंदन रसिकांना जाणवते. धार्मिक आख्यायिकेचे केवळ विशदीकरण न करता, आकारांच्या दृश्य गुणधर्माचा उपयोग त्याने इथे अत्यंत कौशल्याने करून घेतला, ह्यातच त्याची लोकोत्तर प्रतिभा दिसून येते. ह्याच चर्चच्या वेदीच्या मागच्या भिंतीवर त्याने काढलेले लास्ट जज्मेंट (१५३७–४१) हे चित्र मन भारून टाकणारे आहे. मायकेलअँजेलोच्या चित्रांवर माझात्‌चो व जॉत्तो या दोन चित्रकारांच्या चित्रशैलींचा तर शिल्पांवर दोनातेलो या शिल्पकाराच्या शैलीचा प्रभाव पडलेला दिसतो.

मायकेलअँजेलो चित्रकलेनंतर शिल्पकलेकडे वळला. त्याच्या कणखर वृत्तीला शिल्प हे माध्यम म्हणजे आव्हानच वाटले. संगमरवरी दगडातच त्याने शिल्पे घडवली. १४९८ मध्ये त्याने घडवलेले प्येता (पहा : मराठी विश्वकोश: खंड चित्रपत्र ४२)हे एक त्यातील अप्रतिम शिल्प होय. येशू ख्रिस्ताचा निष्प्राण देह माता मेरीने आपल्या मांडीवर घेतला आहे, येशू चिरनिद्रेत विसावल्यासारखा शांत दाखवला आहे, तर माता मेरीच्या सुकुमार शिल्पनातून ख्रिस्ती धर्मप्रणीत ‘कुमारी माते’ चीच अभिव्यक्ती केली आहे. तिच्या चेहेऱ्यावर कमालीची सोशीकता आणि नितांत शांतभाव आहे. हे शिल्प त्यानेच संकल्पिलेल्या ‘सेंट पीटर्स’ या चर्चमध्ये ठेवण्यात आले आहे याखेरीज १५१३–१६ या कालावधीत घडवलेले डाइंग स्लेव्ह (पहा : मराठी विश्वकोश : खंड २ चित्रपत्र ४२) हे त्याचे शिल्प ग्रीक काळातील लोकून या प्रसिद्ध शिल्पाची (पहा : मराठी विश्वकोश : खंड ५ चित्रपत्र २७) आठवण करून देते. मोझेसच्या शिल्पात त्याच्या डोक्यावर शिंगे दाखवून त्याने फार मोठी चूक करून ठेवली. ‘हॉर्न’ या लॅटिन शब्दाचा ‘किरण’ हा अर्थ न समजल्यामुळे हा घोटाळा झाला असावा.


आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात मायकेलअँजेलो वास्तुकलेकडे वळला, वास्तुकलेचा पद्धतशीर अभ्यास करून त्याने मोठमोठ्या चर्चवास्तू, राजवाडे, प्रवेशद्वारे उभारली. ‘वास्तू’ हेही एक शिल्पचअसते, अशी त्याची धारणा असल्याने त्याने या वास्तू पारंपरिक गणिती पद्धतीने न बांधता त्यांची रचना कल्पकतापूर्ण रीतीने केली. रोममधील ‘सेंट पीटर्स’ या त्याने बांधलेल्या भव्य चर्चची रचना म्हणजे एक आश्चर्यच आहे. चर्चच्या पारंपरिक बॅसिलिकेच्या आयताकृती आकारत्याने चौरसात बसवला व त्यावर अर्धगोल घुमट नकरता त्रिज्येचे विभाग अशी रीतीने जोडले, की वरच्याशिरोबिंदूला टोक आले त्यामुळे संपूर्ण वास्तूच आकाशाकडे झेपावते आहे, असा भास होतो (पहा : मराठी  विश्वकोश खंड २ चित्रपत्र ४३). कोणत्याहीबाजूने पाहिले, तरी एक सौंदर्यपूर्ण रचना दिसावी, याहेतूने त्याने ह्या चर्चची आखणी केली, या चर्चचीत्याने एक लाकडी नमुनाकृती (मॉडेल) केली होती.त्यावरून प्रत्यक्षातले चर्च बांधले गेले. दुर्दैवाने मायकेलअँजेलोच्या हयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही. या चर्चच्याघुमटासाठी व खांबासाठी त्याने अनेक तपशीलवाररेखाटने केली, ती कलादृष्ट्या उत्कृष्ट तर आहेतच पण पुढे प्रत्यक्ष बांधकामातही ती उपयोगी पडली. अशाया प्रतिभावंताने सौंदर्य व कलानिर्मिती यांवर फारसुंदर भाष्य करून ठेवले आहे. दैवी चैतन्य ‘एरॉस’ या संयोग तत्त्वामुळे जडाच्या प्रेमात पडते. तोचएरॉस कलावंतामधून कार्यरत झाल्यामुळे कलावंतआपल्या जड माध्यमातून हे सौंदर्य चिरस्थायी करतो,असे तो म्हणतो. 

पहा : इटलीतील कला प्रबोधनकालीन कला.

संदर्भ : 1. Coughlan, Robert, The World Michelangelo, New York, 1966.

              2. Ettinger, L. D. Camesasca, Ettore. The Complete Painting of Michelangelo, London, 1966.

              3. Hartt, Frederick. Michelangelo, New York, 1964.

              4. Salvini, Roberto, The Hidden Michelangelo.

              5. Schott, Rolf, Michelangelo, London, 1963.

 

 

कदम, ज्योत्स्ना

'डेल्फिक सिबिल' (अंशदृश्य) - रोम येथील सिस्टाइन चॅपेलच्या छतावरील भित्तिलेपचित्र, १५०९.'द दोनी मॅडोना' ('द होली फॅमिली', अंगदृश्य १५०४-०६).'द लिबियन सिबील'--सिस्टाइन चॅपेलमधील भित्तिलेपचित्र, १५११.'द फॉल ऑफ मॅन अँड द एक्स्पल्शन फ्रॉम द गार्डन ऑफ ईडन' (१५०८-१२)--सिस्टाइन चॅपेल येथील भित्तिलेपचित्र.