बुंदी चित्रशैली :एक भारतीय लघुचित्रण-संप्रदाय. राजस्थानातील बुंदी आणि कोटा या संस्थानांमध्ये ही शैली सतराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत विकसित झाली. राजस्थानी चित्रशैलीच्या प्रदेशपरत्वे ज्या भिन्न भिन्न शाखा निर्माण झाल्या, त्यांपैकी बुंदी व कोटा या प्रदेशांतील ही शाखा होय. साहजिकच प्रारंभीच्या (सतराव्या शतकाचा पूर्वार्ध) चित्रांमध्ये राजस्थानी शैलीचे घटक, विशेषतः स्त्रीपुरुषांच्या चित्रणामध्ये दिसून येतात.

नायिकेचे सौदर्यप्रसाधन, सु. १७६०- ७०

आद्य राजस्थानी मेवाड चित्रसंप्रदायातून हा संप्रदाय उगम पावला असला, तरी त्यावर मोगल चित्रसंप्रदायाचाही दाट प्रभाव जाणवतो. बनारस येथील ’भारत कला भवना’मध्ये असलेले राग दीपक व अलाहाबादच्या ’म्युनिसिपल म्यूझीयम’मधील रागिणी भैरवी (सु. १६२५) ही रागमाला चित्रे या शैलीचे आद्य नमुने होत. मेवाड चित्रसंप्रदायातील धीट व आदिम वळणाचे चित्रण आणि मोगल शैलीतील निसर्गवादी व काटेकोर परिष्करण यांचा संकर या सुरुवातीच्या चित्रांमध्ये दिसून येतो. झाडे, पक्षी, जनावरे यांच्या चित्रणात विशेषत्वाने लक्ष पुरविल्याचे दिसून येते, तसेच अन्य राजस्थानी चित्रशैलींमध्ये प्रारंभीच्या अवस्थेत अभावानेच दिसून येणारे परिश्रमपूर्वक परिष्करणही आढळते. रंगसंगती साधी असली, तरी तीतून झगझगीत व समृद्ध परिणाम साधला जातो. ही रंगांची समृद्धी व चमक दख्खनी शैलीचा प्रभाव दर्शविते. कारण बुंदी व कोटा राज्यकर्त्यांचा दख्खन प्रदेशाशी सतत संपर्क असे. मत्स्याकृती डोळे, टोकदार नासिका, दुहेरी हनुवटी ही या शैलीतील व्यक्तिचित्रणाची वैशिष्ट्ये होत. या शैलीतील चेहरे लहान व गोलाकार असून डोळ्यांच्या बाजूकडे छायांकन (शेडिंग) केलेले आढळतात. यातील चेहरे वैशिष्ट्यपूर्ण लालसर तपकिरी रंगाने रंगविलेले आढळतात.

या चित्रांतून निसर्गदृश्येही काळजीपूर्वक चितारल्याचे जाणवते. समृद्ध वृक्षवेली, रात्रीचे आकाश, लहरी वा भोवरे दाखवून केलेले पाण्याचे चित्रण इ. त्याची वैशिष्ट्ये होत. वेशभूषेबाबतही असाच वेगळेपणा दिसून येतो. स्त्रियांचे रेखाटन चुणीदार घागरा, पारदर्शक ओढणी, भरपूर दागदागिन्यांनीयुक्त असे केले जाते तर पुरुषांचे रेखाटन आटपाटी पगडी, चाकदार (चतुष्कोणी) जामा, लांब व अरुंद पटका या वस्त्रप्रावरणांचा वापर करून केले जाते. भारताच्या राष्ट्रीय संग्रहालयातील रागमालेवरील बुंदी शैलीतील रेखाचित्रेही उल्लेखनीय आहेत. (सु. १६४०).

कलकत्ता येथील गोपीकृष्ण कनोरिया यांच्या संग्रही असलेली रागमालेची ३६ चित्रे ही अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या बुंदी चित्रशैलीचे वैशिष्ट्य दर्शवितात. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातच या शैलीचा परमोत्कर्ष पाहावयास मिळतो. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात या शैलीला जे वेगळे वळण लागले त्यातील वैशिष्ट्ये, विशेषतः व्यक्तिचित्रणाची, पुढीलप्रमाणे होतः प्रथम या चित्रांत तपकिरी रंगाचे चेहरे आढळत, नंतर त्यांचा रंग उजळ गुलाबी झालेला आढळतो. चेहऱ्याला केलेले गुळगुळीत छायांकन जाऊन त्यात सहजतेने केलेले चित्रण आढळते. सपाट आणि एकरंगी पार्श्वभूमीऐवजी ती अनेक रंघच्छटांची दिसून येते. स्त्रियांचे पोशाख, तसेच घरगुती वापरातील वस्तू, फर्निचर वगैरे सोनेरी रंगात आढळून येते. झाडांच्या पानांचे काळजीपूर्वक छायांकन केलेले दिसून येते. तसेच पाण्यासाठी रुपेरी रंगाचा वापर केलेला आढळतो. एकोणिसाव्या शतकातही या संप्रदायाची भरभराट चालूच राहिली आणि कोटा येथे दुसरा रामसिंग (१८२८-६६) याच्या कारकीर्दीत त्याचे आणखी एक झगमगते पर्व निर्माण झाले. डोंगरभागातील घनदाट जंगलातील शाही शिकारीची रोमहर्षक दृश्ये, तसेच राजाच्या जीवनातील विविध प्रसंग यांचे चित्रण या पर्वात आढळून येते.

बुंदी संप्रदायातील काही चित्रांचा स्थूल परिचय पुढे करून दिला आहे :  (१) चंद्रकोर बघणारे प्रेमी युगुल : (सु. १६८९ प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझीयम’, मुंबई). या चित्रात पानाफुलांनी डवरलेले वृक्ष-वेली यांचे गडद, चमकदार रंग शांत हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतात. त्यात मध्यभागी एका चौरंगावर प्रणयी युगुल उभे असलेले दर्शविले आहे. चंद्राची नाजुक कोर आकाशाच्या एका कोपऱ्यात दाखविली असून ते त्या कोरीकडे बोट दाखवीत आहेत, असा प्रसंग चित्रित केला आहे. विशेषतः उद्यानातील वातावरण निर्माण करण्यात चित्रकाराचे कौशल्य दिसून येते. वेशभूषेतही असाच वेगळेपणा दिसून येतो. प्रियकराचा फेटा, पायजमा, पारदर्शी घेरदार जामा तद्वतच प्रेयसीचा घागरा, चोळी, ओढणी इ. वस्त्रप्रावरणांच्या चित्रणामध्ये व रंगसंगतीमध्ये बुंदी शैलीची खास वैशिष्ट्ये दिसून येतात. एकूणच रंगसंगती व रचना बहारदार असल्याने हे चित्र रसिकांना मोहून टाकते. ते मोहन नामक चित्रकाराने काढले असावे, असे चित्राच्या मागील बाजूस असलेल्या अवतरणावरून दिसते. (२) राधाकृष्ण-भेट : (अठराव्या शतकाचा पूर्वार्ध माधुरी देसाई चित्रसंग्रह, मुंबई). चित्राच्या शिरोभागी केशवदासाच्या रसिकप्रिया ह्या ब्रज भाषेतील काव्याच्या ओळी उद्‍धृत केल्या असून, त्यातील आशयच खाली चित्रांकित केला आहे. राधेला पाहून मुग्ध झालेल्या कृष्णाची विभ्रमावस्था त्यात वर्णिली आहे. घननीळ कृष्ण चुणीदार पारदर्शी जामा व मुकुट घालून सेवकांसह उभा आहे. तो समोर दासींसमवेत उभ्या असलेल्या राधेच्या दर्शनाने मोहित होऊन पान तोंडात घालण्याऐवजी कमळाच्या पाकळ्या तोंडात घालत आहे. आणि राधाही त्याला पाहून लज्जित होऊन ओढणी सावरत आहे. अतिशय काव्यात्म रीत्या हा आशय साकार झाला आहे. कमळाचे तळे व त्यात विहरणारे जलचर पक्षी, मासे यांचे चित्रण सांकेतिक पद्धतीचे आहे. जललहरी व भोवरे दर्शवून पाण्याचे चित्रण केले आहे. पर्णपुष्पांनी व वृक्षवेलींनी सजलेले जंगल व विहरणारे पक्षी यांनी चैतन्यमय केलेल्या वातावरणाचे चित्रण, समृद्ध रंगसंगती व कुंचल्याचे अप्रतिम कौशल्य यांमुळे हे बुंदी संप्रदायातील एक उत्कृष्ट चित्र ठरले आहे. 

पहा : रागमाला चित्रे लघुचित्रण.

संदर्भ :  1. Khandalvala, Karl Moti Chandra Pramod Chandra, Miniature Painting, Delhi, 1960.

             2. Pramod Chandra, Bundi Painting, Delhi, 1959.

धुरंधर, नयनतारा