लिओनार्दो दा व्हींची : (१५ एप्रिल १४५२ —२ मे १५१९). इटालियन प्रबोधनकाळातील श्रेष्ठ कलावंत, वैज्ञानिक व तत्त्वचिंतक, चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, अभियंता, संगीतकार, शारीरविज्ञ, गणिती, निसर्ग-वैज्ञानिक, संशोधक, तत्त्वज्ञ अशा अनेकविध गुणांनी त्याचे कलाजीवन संपन्न झाले होते. त्याचा जन्म फ्लॉरेन्सनजीक व्हींची खेड्यात झाला. त्याचा पिता सेर प्येअरो हा फ्लॉरेन्समधील प्रतिष्ठित लेखप्र

‘सेल्फ-पोर्ट्रेट’ (सु. १५१२)

माणक व जमीनदार आणि आई शेतकरी कुटुंबातील होती. लिओनार्दो त्यांची अवैध संतती होय पण पुढे पित्याने त्याचा प्रतिपाळ केला. लहानपणी तो सुरेल आवाजात गात व ल्यूट वाजवत असल्याचे उल्लख सापडतात पण केवळ संगीतसाधना वा कलोपासना ह्यातच त्याचे मन रमले नाही. ज्ञानप्राप्तीची तीव्र लालसा व एक अस्वस्थ कुतूहल त्याला सतत वेगवेगळ्या दिशांना खेचून नेत होते. मानवी विचाराच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याची स्वाभाविक ऊर्मी त्याच्यात होती. त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या सु. पंधराव्या वर्षी व्हेररॉक्क्यो ह्या प्रसिद्ध चित्रकाराच्या कार्यशाळेत उमेदवारीसाठी धाडले. तिथे त्याने चित्र-शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. व्हेररॉक्क्योच्या बाप्तिझम ऑफ ख्राइस्ट (सु. १४७५) या भित्तिचित्राच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील एका देवदूताचे चित्रे लिओनार्दोने रंगवले. त्यात त्याचे चित्रकौशल्य प्रकर्षाने दिसून येते. फ्लॉरेन्समध्ये लिओनार्दोने १०-१२ वर्षे शास्त्र आणि कला ह्यांची निस्सीम उपासना केली. १४७२ मध्ये तो फ्लॉरेन्सच्या चित्रकारसंघाचा (गिल्ड) प्रमुख चित्रकार बनला. त्याने स्वतः निर्मितिकाल नोंदलेले आद्य रेखाचित्र अर्नो लँड्‍स्केप (५ ऑग्सट १४७३) हे असून, त्यात खडकांची घडन व भूरचना ह्याविषयी त्यान संशोधनात्मक निरीक्षण प्रत्ययास येते. १४७८ मध्ये त्याने फ्लॅरेन्स येथे स्वतः चे कलागृह स्थापन केले. ॲडोरेशन ऑफ द मॅगी ९१४८१) हे चर्चमधील वेदिचित्र रंगवण्याचे मोठे काम त्याला मिळाले. हे चित्र जरी अपूर्ण राहीले, तर त्यातही त्याचे चित्रनिर्मितीचे कौशल्य व नवा दृष्टीकोन दिसून येतो. मिलानचा ड्यूक लोदोव्हीको स्फॉर्त्साच्या निंमंत्रणावरून तो १४८२ मध्ये मिलानला त्याच्या दरबारी रुजू झालात. त्याचा तेथील वास्तव्याचा काळ कलानिर्मितीच्या दृष्टीने भरभराटीचा ठरला. तेथे त्याने राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींची हुबेहुब व्यक्तिचित्रे रंगवली. मिलान नगरीचा सरकारी अभियंता म्हणूनही त्याने कार्य केले. नगरामध्ये विविध रंजनप्रकारांची योजना, तसेच एकाखाली एक असे रस्ते तयार करून रहदारीच्या वेळी अपघात टाळण्याच्या दृष्टीने रस्त्याची पुनर्रचना शहराचे सौंदर्य वृध्दींगत करणारी सरोवरे, धबधबे उद्याने वगैरेंच्या विविध योजना-अशा अनेक कल्पना समाविष्ट असलेला आदर्श नगररचनेचा आराखडा त्याने तयार केला होता. शिल्पकलेतील त्याची महत्त्वपूर्ण निर्मितीही ह्याच काळात मिलान मध्ये आकारास आली. ड्यूकच्या पित्याचा-फ्रांचेस्को स्फॉर्त्साचा भव्य अश्वारूढ पुतळा ब्राँझमध्ये घडवण्याचे काम त्याने हाती घेतले. त्यासाठी प्रचंड अवाढव्य आकारमानाचा घोडा त्याने भाजक्या मातीमध्ये तयार केला. (सु. १४९३) हा घोडा त्या काळात जगातले आठवे आश्चर्य मानला गेला पण दरम्यानच्या युद्धकाळातील ब्राँझच्या तुटवड्यामुळे तो ब्राँझमध्ये ओतता आला नाही, तसेच घोड्यावरचा पुतळाही तयार झाला नाही. अल्पावधीतच तो मातीचा घोडाही नष्ट झाला. मिलानमधील वास्तव्यात त्याने व्हर्जिन ऑफ द रॉक्स हे प्रसिद्ध वेदिचित्र रंगवले. या चित्राच्या लूव्ह्‍र, पॅरिस (सु. १४८३-८५) येथील व नॅशनल गॅलरी, लंडन (सु. १४९४-१५०६) येथील दोन आवृत्त्या उपलब्ध आहेत. ह्या चित्रात गूढरम्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर, एका गुहेमध्ये जॉन व येशू या बालकांची भेट कुमारी माता मेरी व देवदूत यांच्या सान्निध्यात रंगवली आहे. संदिग्ध बाह्यरेषा, गुहेतील धूसर प्रकाश, सौम्यसर रंगच्छटा ह्यांमुळे चित्राला साक्षात्कारी आध्यात्मिक अनुभूतीचे वलय लाभले आहे. चित्रातील व्यक्तिप्रतिमा शंक्वाकार (पिरॅमिड) रचनेमध्ये बसवल्या आहेत. मिलानमध्ये एका मठाच्या भिंतीवर रंगवलेले द लास्ट सपर हे भव्य भित्तिलेपचित्र ह्याच काळातले (१४९७). पण या भित्तिलेपचित्रात तैलरंगाचा वापर केल्याने ते अल्पकाळातच खराब झाले. मात्र प्रबोधनाच्या उक्तर्षकाळातील हे एक श्रेष्ठ चित्र मानले जाते. त्यात येशू ख्रिस्ताने आपल्या निकटवर्ती बारा शिष्यांसमवेत घेतलेल्या अंतिम भोजनाचे दृश्य रंगवले आहे. यांपैकी एक शिष्य आपला विश्वासघात करील, असे भाकीत ख्रिस्ताने या प्रसंगी वर्तवले. त्याचा परिणाम वेगवेगळ्या शिष्यांवर भिन्नभिन्न प्रकारे झाला. त्यांच्या संमिश्र भावभावनांचे व मानसिक ताणतणावांचे चित्रण अत्यंत सूक्ष्मपणे आणि प्रभावी रीत्या लिओनार्दोने केले आहे. या चित्राची रचना समतोल पद्धतीची असूनही त्यातील मानवी आकृत्यांची गतिशीलता प्रभावी व परिणामकारक आहे. व्यक्तिचित्रणाला मानसशास्त्रीय बैठक प्राप्त करून देणारे हे कलेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चित्र होय. ⇨मोनालिसाच्या व्यक्तिचित्रणालाही अशीच सूक्ष्म भावदर्शनाची मानसशास्त्रीय बैठक आहे. फ्रेंचांनी १४९९ मध्ये मिलानवर हल्ला केला. परिणामी लिओनार्दो मिलान सोडून १५०० मध्ये फ्लॉरेन्सला परतला. तेथे काही काळ लष्करी अभियंता म्हणून त्याने काम केले. ह्या काळात त्याने मानवी देहाचे शवविच्छेदन विपुल प्रमाणात करून शरीररचना शास्त्राची जाणकारी प्राप्त केली व तो त्याच्या काळातील सर्वांत निपुण शरीरविज्ञ म्हणून मान्यता पावला. ह्या कालखंडात त्याने तीन मोठे कलाप्रकल्प हाती घेतले. द बॅटल ऑफ आंग्यारी ( १५०३-१५०५) हे भव्य भित्तिचित्र पण ते अपूर्णच राहिले. ‘सेंट ॲन समवेत कुमारी माता व बालक येशू’ ह्या विषयावर त्याने अनेक रेखाटने केली त्यांपैकी पॅरिसच्या लव्हर संग्रहालयात असलेले सेंट ॲन, द व्हर्जिन अँड द इन्फंट ख्राइस्ट विथ अ लँब (१५१०) हे रंगचित्र अप्रतिम आहे. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रातील नेटक्या, सुबक व्यक्तिप्रतिमा व त्यांची शंक्वाकार रचना. पौराणिक विषयावरील लेडा अँड द स्वान ह्या चित्राची अनेक रेखाटने त्याने केली (सु.१५०३-०६). लेडाच्या स्त्रीप्रतिमेचे प्रवाही वक्राकार रेषांकन पुढील चित्रकारांना प्रेरणादायक ठरले . फ्‍लॉरेन्समधील बड्या स्त्री-पुरूषांची व्यक्तिचित्रे रंगवण्यात त्याने बराच काळ व्यतीत केला. मोनालिसा ही जगद्‍विख्यात कलाकृती ह्याच काळातली (सु.१५०१-१५०४). फ्‍लॉरेन्समधील फ्रांचेस्को देल जोकोन्दो ह्या व्यापाऱ्याच्या तिसऱ्या पत्‍नीचे हे व्यक्तिचित्रण कलेच्या इतिहासात अव्दितीय व अजरामर ठरले आहे. व्यक्तिचित्रण कलेतील ही सर्वोच्च सिद्धि मानली जाते. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंदस्मित, डोळ्यांतील विलक्षण चैतन्यपूर्ण जिवंत भाव व त्यातून डोकावणारे सूक्ष्म कारुण्य, हातांचे व त्यांवरील वस्त्रांच्या चुण्यांचे अत्यंत कौशल्यपूर्ण सुबक रेखाटन, चित्राला दिलेली निसर्गाची-काल्पनिक गिरिप्रदेशाची-गूढरम्य पार्श्वभूमी धूसर बाह्यरेषा व सौम्यसर रंग (स्फुमातो) या तंत्राचा कटाक्षाने केलेला वापर ही या चित्राची ठळक वैशिष्ट्ये होत. चित्रावरील हळुवार छायाधूसर अवगुंठन व छायाप्रकाशाचा सूचक वापर यांमुळे चित्रास यथादर्शनीय सखोलता प्राप्त होऊन, परिणामी त्याच्या गूढरम्य मुग्धतेत अधिकच भर पडली आहे. संदिग्धता व अनेकार्यसूचकता ही श्रेष्ठ कलाकृतीची मुख्य लक्षणे मोनालिसामध्ये पूर्णाशाने दृग्गोचर झाली आहेत. लिओनार्दा १५०६ मध्ये मिलानला परतला. तेथे १५१३ पर्यंत होता. ह्या काळात त्याने आणखी एका अश्वारूढ पुतळ्यावर काम सुरू केले पण त्याची फक्त रेखाटनेच तो करू शकला. नंतर तो रोमला गेला (१५१३-१५१६). पुढे फ्रेंच राजा पहिल्या फ्रान्सिसने त्याला फाँतेन्‍ब्लो येथे आपल्या दरबारी बोलावून घेतले आणि राजाचा अग्रणी चित्रकार-वास्तुकार-यंत्रज्ञ म्हणून त्याला मानाचा किताब दिला. तसेच आंब्वाझनजीक क्‍लाउक्स येथे त्याला निवासस्थान दिले. सेंट जॉन द बाप्तिस्ट (१५१३-१५१६) हे त्याचे अखेरचे रंगचित्र. क्‍लाउक्स येथे त्याचे निधन झाले. लिओनार्दोचा नंतरच्या तरूण चित्रकारांवर खूपच प्रभाव पडला. फिलिप्पिनो लिप्पी, रॅफेएल, मायकेलअँजेलो प्रभृतींचा त्यांत समावेश होतो.

लिओनार्दोच्या कलानिर्मितीइतक्याच, त्याने मागे ठेवलेल्या सु. ५,००० पृष्ठांच्या टिपणवह्या हा पुढील पिढ्यांना प्रेरक व मार्गदर्शक ठरलेला अमोल ठेवा आहे. त्याच्या टिपणांत अगणित विषय व विपुल रेखाटने यांचा समावेश आहे. समुद्राच्या भरती-ओहोटीची कारणमीमांसा, फुफ्फुसाची रचना, पृथ्वीची मोजणी आणि पृथ्वी व सूर्य यांतील अंतर, मानवी दृष्टीचे भौतिकीय नियम, उंचावरून खाली पडणाऱ्या पदार्थाची गती, उड्डाणयंत्राचे रेखाटन, छायाप्रकाशासंबंधी शोधनिबंध, युद्धोपयोगी नवीन शस्त्र व यंत्रसामग्री, भौमितिक प्रमेये, कारंज्यातील जलदाब आणि जलशक्ती यांसंबंधी अभ्यासपूर्ण रेखाटने, पशुपक्ष्यांच्या दैनंदिन सवयींसंबंधी सूक्ष्म निरीक्षणे, वाफेचा प्रेरक शक्ती म्हणून वापर करण्यासंबंधी टिपणे असे असंख्य विषय व रेखने ह्या टिपणांत आली आहेत. भावी काळातील अनेक वैज्ञानिक शोधांची विस्मयजनक बीजे त्यांत आढळतात. हेलिकॉप्टर, पाणबुड्या यांची आद्य प्रारूपे, तसेच हवेचे घटक, तरफेचा उपयोग, गुरूत्वाकर्षण-नियम यांसारख्या विषयांवर प्राथमिक विचार आढळतात. मानवदेहातील गुपितांचा शोध घेण्यासाठी त्याने शवविच्छेदन केले, तसेच गर्भावस्थेतील अपत्याच्या वाढीसंबंधी अनुमाने केली. लाटांच्या व प्रवाहांच्या गतिनियमांची निरीक्षणे, वनस्पतींच्या वाढीचे नियम, यांच्या विविध आकारांचा त्याने सूक्ष्म निरीक्षणांद्वारा शोध घेतला. तटबंदी व कालवे ह्यांच्या बांधकामासंबंधीच्या अभिनव कल्पना त्याच्यापाशी होत्या.

लिओनार्दोच्या मते काव्य व कला ही अस्सल वास्तवाच्या ज्ञानाचे साधन होत. केवळ मानसिक कल्पनातरंग एवढाच कलेचा अर्थ नाही. विज्ञानात सत्याचे मूल्य जेवढे आहे, त्यापेक्षा कलेत कमी नाही. दोन्हीतील सत्य सारख्याच तोलाचे आहे आणि या दोन्ही सत्यांचा पाया अचूक व सूक्ष्म निसर्गनिरीक्षण हाच आहे आणि या दोन्ही सत्यांचा पाया अचूक व सूक्ष्म निसर्गनिरीक्षण हाच आहे. निसर्ग आकार घेऊनच अस्तित्वात येतो. निराकारता हा त्याचा स्वभाव नव्हे. कलेच्या माध्यमातूनदेखील साकार निसर्गाचेच दर्शन घडते. कलात्मक प्रतिभा निसर्गाला उल्लंघून अवास्तव कल्पनाविलासात न रमता निसर्गाचा स्वाभाविक नियम पकडते आणि हा नियम वास्तव सौंदर्याचा आविष्कार करतो. मानवी प्रज्ञेमध्ये बुद्धि व प्रतिभा हे दोन घटक आहेत, ते परस्परपूरक आहेत. बुद्धि व प्रतिमा यांचे कार्य एकच, ते म्हणजे वस्तूंना आकार देणे. बुद्धीने विज्ञान व प्रतिमेने कला निर्माण होते. सौंदर्य व नियमद्धता यांच्या तादात्म्याची उक्तट संवेदना प्रबोधनसंस्कृतीवर अंमल गाजवत होती. कला व विज्ञान यांचे अधिष्ठान ही संवेदनाच बनली. लिओनार्दोची कला व वैज्ञानिक निरीक्षणे ह्या प्रबोधनयुगीन विचारसरणीचेच आविष्कार होत.

संदर्भ : 1. Clark, Kenneth, Leonardo da Vinci, Harmondsworth, Middlesex, 1961.

2. Freud, Sigmund, Leonardo, Harmonds worth, Middlesex, 1963.

3. Pater, Walter, The Renaissance, London, 1961.

4. Wallace, Robert, The World of Leonardo, New York, 1966.

इनामदार, श्री. दे.

सेंट ॲन, द व्हर्जिन अँड द इन्फंट ख्राइस्ट विथ अ लँब’ (सु. १५१०). ‘व्हर्जिन ऑफ द रॉक्स’ (सु. १४९४—१५०६), नॅशनल गॅलरी, लंडन.
‘द बाप्तिझम ऑफ ख्राइस्ट’ (सु. १४७५); अंशदृश्य : डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील देवदूत. ‘सेंट जॉन द बाप्तिस्ट’ (१५१३—१६).
‘द लेडी विथ द आर्मेन’ (सु. १४८३).