पॉल सेझानसेझान, पॉल : (१९ जानेवारी १८३९-२२ ऑक्टोबर १९०६). फ्रेंच चित्रकार. आधुनिक चित्रकलेचा तो आद्य प्रवर्तक मानला जातो. त्याचा जन्म फ्रान्समधील एक्स-आं-प्रॉव्हांस येथे एका सधन कुटुंबात झाला. त्याचे वडील व्यापारी व बँक संस्थापक होते आणि स्वभावाने आक्रमक व हुकूमशाही वृत्तीचे होते. त्यांच्या दडपणाखाली संवेदनाक्षम पॉलची बालवयात मानसिक घुसमट झाली व त्याचे दूरगामी परिणाम पुढे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर घडून आले. वडिलांच्या आग्रहास्तव १८५९ मध्ये त्याने एक्स येथील विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली व त्याच वेळी रात्री तो कला अकादेमीमध्ये जाऊन कलेचेही शिक्षण घेऊ लागला. अखेर १८६१ मध्ये सेझानने कलासाधनेसाठी पॅरिसला जाण्याबाबत वडिलांचे मन वळविले आणि कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडून कलेचे शिक्षण घेण्यासाठी तो पॅरिसमध्ये ‘अकादेमी स्वीस’ येथे दाखल झाला. तेथे पीसारो या दृक्‌प्रत्ययवादी चित्रकाराचा प्रेरक सहवास त्याला लाभला व त्याच्या प्रभावामुळे तो दृक्‌प्रत्ययवादी चित्रसंप्रदायात सामील झाला. तसेच या संप्रदायाची तंत्रे व चित्रशैलीही त्याने आत्मसात केली. पॅरिसमध्ये १८७४ साली दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांचपहिले चित्रप्रदर्शन भरले, त्यात सेझानने आपली अ मॉडर्न ऑलिंपिया (१८७२-७३) व द हाउस ऑफ द हँग्ड मॅन (१८७३) ही चित्रे मांडली. दृक्‌प्रत्ययवाद्यांच्या तिसऱ्या चित्रप्रदर्शनात (१८७७) सेझानने १६ चित्रे मांडली मात्र त्या काळात त्याची सर्व चित्रे रसिकांच्या व कलासमीक्षकांच्या दृष्टीने जहाल टीकेचा, कुचेष्टेचा व उपहासाचा विषय ठरली. विशेषतः त्याचे अ मॉडर्न ऑलिंपिया  हे चित्र त्यातील लैंगिक विषयासक्त चित्रणामुळे वादग्रस्त व खळबळजनक ठरले. या टीकेमुळे सेझान व्यथित व निराश झाला पण खचून न जाता त्याने आपली चित्रनिर्मिती पुढेचालूच ठेवली. १८६४-६९ या काळात सेझान आलटून-पालटून एक्स व पॅरिस येथे राहिला. १८६९ मध्ये हॉर्टेन्झ फिक्वे ही श्रमिक वर्गातीलतरुणी त्याच्या चित्रांसाठी मॉडेल बनून त्याच्या जीवनात आली. तिच्यापासून त्याला पॉल नावाचा मुलगा झाला (१८७२). पुढे त्याने १८८६ मध्ये तिच्याशी विवाह केला. तिची एकूण २७ व्यक्तिचित्रे सेझानने रंगविली. त्यांतील मादाम सेझान इन अ यलो आर्मचेअर (१८९०-९४) हे चित्र त्यातील रंगसंगतीमुळे विशेष उठून दिसते. सेझानच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे, त्याचा शालेय जीवनापासूनचा मित्र प्रख्यात कादंबरीकार ⇨ एमिल झोला  हा होय. झोलाची व त्याची घनिष्ठ मैत्री अनेक वर्षे टिकून होती पण १८८६ मध्ये ही मैत्री संपुष्टात आली. झोलाने आपल्या L’ouevre या कादंबरीत एका अपयशी कलावंताचे व्यक्तिचित्र सेझानवरून बेतले होते. हे निमित्त होऊन सेझानने झोलाबरोबरचे संबंध तोडून टाकले. शीघ्रकोपी व विक्षिप्त स्वभावाचा सेझान समाजापासून फटकून एकाकी अवस्थेत जगला. ह्या एकाकीपणाचे व त्याच्या खिन्न, निराश मनःस्थितीचे प्रतिबिंब त्याच्या काही चित्रांतून उमटलेले दिसते. उदा., सेझानच्या काही आत्मचित्रांतून (सेल्फ पोर्ट्रेट्स) चेहऱ्यावरील उदास, खिन्न भाव व डोळ्यांतला धगधगता अंगार भोवतालच्या जगाविषयीचा क्रोध व उपरोध सूचित करतात. तसेच द बॉय विथ द रेड व्हेस्ट (१८८८-९०) ह्या व्यक्तिचित्रातून आणि शातो नॉयर व क्वॉरी बिबेमस ह्या प्रदेशांच्या निसर्गचित्रणांतून त्याच्या एकाकीपणाची व नैराश्याची भावप्रतीती येते.

सेझानच्या चित्रनिर्मितीचे साधारणपणे तीन टप्पे दिसून येतात : (१) ऐन तारुण्यातील स्वच्छंदतावादी चित्रांचा कालखंड (सु. १८६४- ७२) (२) दृक्‌प्रत्ययवादी चित्रनिर्मितीचा कालखंड (सु. १८७२-८२) व (३) अखेरचा, स्वतंत्र शैलीतील प्रगल्भ चित्रनिर्मितीचा कालखंड (१८७०च्या दशकापासून ते अखेरपर्यंत).

स्वच्छंदतावादी चित्रनिर्मितीच्या काळात त्याचे चित्रविषय प्रक्षोभक व कामोत्तेजक (इरॉटिक) होते. ‘व्हेनिशियन ’ (इटलीतील व्हेनिस शहरातील चित्रकारांचा गट) रंगप्रभू (कलरिस्ट) चित्रकारांचा-उदा., तिशन, व्हेरोनीझ, तिंतोरेत्तो, रूबेन्स इत्यादींचा-दाट प्रभाव त्याच्यावर त्या काळात होता. या प्रभावातून त्याची रंग व रंगसंगतीविषयक जाण अधिक समृद्ध होत गेली. तसेच ⇨फेर्दीनां व्हीक्तॉर अझेअन दलाक्र्‌वा  या स्वच्छंदतावादी चित्रकाराचा प्रभावही त्याच्या या कालखंडातील चित्रांवर दिसतो. द टेम्प्‌टेशन ऑफ सेंट अँटनी  (१८६७ – ६९), द मर्डर (१८६७-७०), रेल्वे कटिंग (१८६९-७१),द ब्लॅक क्लॉक (१८६९- ७१) ही त्याची स्वच्छंदतावादी चित्रे त्यांतील अतिनाट्यात्म विषय व सफाईदार रंगलेपन यांसाठी प्रसिद्ध आहेत. निसर्गाचे अनुकरण करण्यापेक्षा त्याचा अन्वयार्थ लावण्याची व निसर्गातील दृष्टीला जाणविलेल्या घनाकार रचना चित्रांतून साकारण्याची प्रवृत्ती त्याच्या दृक्‌प्रत्ययवादी चित्रांतून दिसते. दृक्‌प्रत्ययवादी संप्रदायाचे काही सर्वसाधारण समान गुणधर्म त्याच्या चित्रांतून जाणवत असले, तरी या संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून त्याने चित्रनिर्मितीविषयक स्वतःची स्वतंत्र धारणा व शैली विकसित केली. त्यामुळे तो उत्तर-दृक्‌प्रत्ययवादी ( पोस्ट-इंप्रेशनिस्ट) चित्रकार मानला जातो. दिनक्रमाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये बदलत्या प्रकाशातील वस्तूंवरील बदलती रंगरूपे चित्रात पकडण्याच्या ध्यासापोटी दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांच्या चित्रांमधील वस्तुचित्रण व पर्यायाने आकृती क्षीण व विसविशीत झाली होती. तसेच रंगांचा उपयोग केवळ प्रकाशानुभवासाठी केल्याने रंग हे छटा-छायांपुरतेच मर्यादित झाले होते. सेझानने चित्रातील वस्तूची घनता जतन करण्यावर व रंगांचे स्वायत्त मूल्य व सामर्थ्य अबाधित राखण्यावर भर दिला. हे त्याचे योगदान आधुनिक कलेच्या जडणघडणीच्या संदर्भात फार मोलाचे आहे. ‘सृष्टीतील सर्व वस्तूंमध्ये आपल्याला भौमितिक घनाकार दिसतात’, हे त्याचे विधान फार अर्थपूर्ण व महत्त्वाचे ठरले. सेझानने निसर्गदृश्ये रंगविताना गोल, दंडगोल, शंकू अशा भौमितिक घनाकारांमध्ये त्यांचे चित्रण केले. तसेच या घनाकारांची दृश्यपृष्ठे जेथे एकत्र मिळतात, त्या ठिकाणी दिसणारे रेषात्मक कंगोरे त्याने ठळक व ठसठशीत दर्शविले. सेझानने घनता साधताना वस्तूच्या पृष्ठांचे पृथक्करण सुरू केले, त्यांतून पुढे आधुनिक ⇨घनवादी  संप्रदाय उत्क्रांत झाला. विशेषतः घनवादी संप्रदायातील बाख व ⇨ पिकासो  या चित्रकारांना सेझानपासून प्रेरणा लाभली. तसेच रंगांचे स्वायत्त मूल्य व सामर्थ्य जोपासण्याच्या सेझानच्या भूमिकेमुळे ⇨रंगभारवादाला चालना मिळाली आणि त्याच्या चित्रांतून प्रकटणाऱ्या अमूर्त आकारांमुळे आधुनिक चित्रकलेतील अमूर्तीकरणाची प्रवृत्ती वाढीस लागली. क्षणोक्षणी पालटणाऱ्या चंचल प्रकाश-प्रत्ययाची बदलती, अस्थिर रंगरूपे चित्रात पकडू पाहणाऱ्या दृक्‌प्रत्ययवादी कलेला संग्रहालयीन कलेप्रमाणे स्थायी शाश्वत रूप देण्याची त्याची भूमिका त्याच्या चित्रनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यावर साकार झालेली दिसून येते. त्याने निसर्गचित्रे, स्थिरवस्तुचित्रे, व्यक्तिचित्रे, आकृतिरेखन, मानवसमूहाकृती अशा विविध प्रकारांत विपुल चित्रनिर्मिती केली. १८७० च्या दशकाच्या अखेरच्या कालखंडात त्याने रंगविलेली स्थिरवस्तुचित्रे त्याच्या शैलीतील नव्या आकारघडणीची वैशिष्ट्ये दर्शवितात. उदा., आकारांची सघनता, त्यांचे परस्परांपासूनचे अंतर, वस्तुचित्रणातील सुसंवादी रंगयोजना ही त्यांची वैशिष्ट्ये नजरेत भरणारी आहेत. तसेच दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांचे उत्स्फूर्त स्वैर कुंचलांकनाचे तंत्र अव्हेरून, त्याने कुंचल्याचे उभे, आडवे, तिरपे असे जाड फटकारे मारून चित्रफलक वास्तवसदृश ढोबळ, स्थूल आकारांनी भरण्याचे नवे तंत्र अंगीकारले. त्याच्या उत्तरकालीन चित्रांमध्ये निसर्गाचे खोल अवकाश व चित्रपृष्ठाची सपाट पातळी यांत संतुलन साधलेले दिसून येते. १८९०-१९०५ या काळात त्याने अनेक सरस व श्रेष्ठ दर्जाची चित्रे रंगविली. माँ सँतव्हिक्तुआर (१९०४-०६) हे तैलरंगातील भव्य निसर्गचित्र, द बॉय विथ द रेड व्हेस्ट  हे व्यक्तिचित्र, असंख्य वस्तुचित्रे, तसेच निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील नग्नयुवतींच्या जलविहाराची चित्रमालिका-विशेषतः त्यांतील द ग्रेट बेदर्स (१८९८-१९०५) हे चित्रही या काळातील विशेष उल्लेखनीय निर्मिती होय.

चित्रविक्रेता व्होलार याने पॅरिसमध्ये सेझानच्या चित्रांचे पहिले एकल प्रदर्शन (वन मॅन शो) १८९५ मध्ये व दुसरे १८९८ मध्ये भरविले. नव्या तरुण चित्रकार पिढीला या चित्रांनी भारावून टाकले. त्याच्या रचनाप्रधान चित्रशैलीचा प्रभाव या चित्रकारांवर पडला. बाह्य निसर्गपरिसरात चित्र रंगवत असताना, वादळी पावसात सापडून आजारी पडल्याने त्याचे एक्स-आं-प्रॉव्हांस येथे निधन झाले.

संदर्भ : 1. Beucken, Jean De­ Trans. Small, Lothian, Cezanne : A Pictorial Biography, London, 1962.

            2. Murphy, Richard W. The World of Cezanne, New York, 1968.

इनामदार, श्री. दे.

'मादाम सेझान इन अ यलो आर्मचेअर' (१८९०-९४) - पॉल सेझान. 'द ब्लॅक क्लॉक' (१८६९-७१) - पॉल सेझान.
'द ब्लॅक क्लॉक' (१८६९-७१) - पॉल सेझान.

Close Menu
Skip to content