'सेल्फ-पोर्ट्रेट', १४९८.

ड्यूरर, आल्ब्रेक्त : (२१ मे १४७१–६ एप्रिल १५२८). प्रख्यात जर्मन चित्रकार व आरेख्यक कलावंत. न्यूरेंबर्ग येथे जन्म. त्याचे वडील सुवर्णकार होते. त्यांच्या हाताखाली त्याने प्रारंभी कारागिरीचे धडे घेतले. पुढे मिखाएल व्होल्गेमूट याच्या कृतिअभ्यासनिकेतनात उमेदवारी केली (१४८६–९०). त्या ठिकाणी जर्मन कलाकारांच्या श्रेष्ठ कलाकृतींचा, ⇨उत्कीर्णनाच्या विकसित यंत्रांचा व काष्ठठशांच्या चित्रणाचा त्याने अभ्यास केला. या सुमारास कोबेर्गर या मुद्रकासाठी त्याने काही चित्ररेखाटने केली. १४९० मध्ये तो प्रवासासाठी प्रथमच बाहेर पडला व काल्मार, बाझेल आणि स्ट्रॅस्‌बर्ग या ठिकाणी त्याने भ्रमंती केली. त्याच्या अशा प्रवासांनीच त्याचे कलाजीवन बऱ्याच अंशी घडविले. १४९४ मध्ये स्वतःच्या विवाहानिमित्ताने तो न्यूरेंबर्गला परतला पण त्याच वर्षी त्याने इटलीला प्रयाण केले. या व नंतरच्या (१५०५–०७) वास्तव्यात त्याने इटलीतील क्रांतिकारी, विकसित चित्रकलेचा, इटालियन प्रबोधनाच्या बौद्धिक पार्श्वभूमीचा व मानवतावादी लिखाणाचा, त्याचप्रमाणे कलेची अभिजात तत्त्वे चित्रांतून व उत्कीर्णनांतून साकार करण्याच्या मानतेन्याच्या कर्तृत्वाचा सखोल अभ्यास केला. अशा रीतीने ड्यूररने उत्तरेकडील उत्तरकालीन गॉथिक कला व दक्षिणेकडील इटालियन प्रबोधन कला यांचा नेमका समन्वय साधला व हा समन्वय यूरोपीय कलेला विशेष उपकारक ठरला. १४९५ मध्ये त्याने न्यूरेंबर्गला आपले कृतिअभ्यास-निकेतन स्थापले, तेव्हापासून त्याचे यश व प्रतिष्ठा उत्तरोत्तर वाढतच गेली. १४९९ पर्यंत त्याने प्रायः चित्रमुद्रानिर्मितीसाठी उत्कीर्णने व काष्ठठसे तयार कले. १५१२ मध्ये मॅक्सिमिल्यन या सम्राटाच्या दरबारी चित्रकार म्हणून त्याची नियुक्ती झाली. आयुष्याच्या अखेरीस कलेच्या तात्त्विक बैठकीविषयीचा प्रबंध त्याने लिहावयास घेतला होता पण तो पूर्ण होऊ शकला नाही. न्यूरेंबर्ग येथे त्याचे निधन झाले.

त्याच्या काही प्रमुख कलाकृती पुढीलप्रमाणे होत : द फीस्ट ऑफ द रोझ गार्लेड्स (१५०६) व द ॲडोरेशन ऑफ द ट्रिनिटी (१५११) ही चित्रे इटालियन परंपरेतील आहेत. त्याची प्रतिमाचित्रे वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक आहेत. विशेषतः १४९३, १४९८, १५०० व १५२२ या साली काढलेली स्वतःची प्रतिमाचित्रे. फोर अपॉसल्स (१५२६) हे त्याचे एक भव्य तैलचित्र होय. त्याच्या काष्ठठशांमुळे व उत्कीर्णनांमुळे तो आंतरराष्ट्रीय कलाविश्वात विशेष ख्याती पावला आहे. यादृष्टीने द अपॉकॅलिप्स (१४९८) हे त्याचे काष्ठठशांचे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. यांखेरीज द ग्रेट पॅशन (१५१०), द लाइफ ऑफ द व्हर्जिन (१५१०) आणि द स्मॉल पॅशन (१५०९-११) या काष्ठठशांच्या मालिका आणि द लास्ट सपर  व द मेन्स बाथ हाउस हे सुटे काष्ठठसे उल्लेखनीय आहेत. त्याच्या उत्कीर्णनांपैकी द एन्‌ग्रेव्हड पॅशन (१५१३) ही मालिका व द प्रॉडिगल सन (१४९६), आदम अँड ईव्ह (१५०४), द नाइट, डेथ अँड डेव्हिल (१५१३), सेंट जेरोम इन हिज स्टडी (१५१३), मेलँकोलिया (१५१४) इ. उत्कीर्णने प्रसिद्ध आहेत, त्याचे असामान्य रेखनकौशल्य क्राउन्ड डेथ ऑन अ थिन हॉर्स (१५०५) यांसारख्या लहान रेखनांतून समर्थपणे प्रकटले आहे. त्याच्या जलरंगचित्रांमध्ये भोवतालचे विश्व रेखीवपणे व हुबेहूब साकार करण्याची त्याची हातोटी प्रत्ययास येते.

संदर्भ : 1. Panofsky, Erwin, The Life and Art of Albrecht Durer2 Vols., Princeton, N.J., 1953.

            2. Russell, Francis, The World of Durer, New York, 1967.

इनामदार, श्री. दे.