‘सेल्फ-पोर्ट्रेट’ (१८८९)

गॉख, व्हिन्सेंट व्हान : ( ३० मार्च १८५३ — २७ जुलै १८९० ). डच चित्रकार. ग्रूट झुंडर्ट (ब्राबांत) येथे जन्म. त्याच्या आयुष्याची सुरुवात बेल्जियमच्या एका कंगाल खाणप्रदेशात साधा धर्मोपदेशक म्हणून झाली. १८८० पासून खाणकामगारांची प्रतिमाने (मॉडेल्स) पुढे ठेवून त्याने चित्रणास प्रारंभ केला. द पोटॅटो इटर्स (१८८५) ही त्याची पहिली श्रेष्ठ चित्रकृती विषण्ण, मातकट रंगांनी शेतकऱ्यांच्या दारूण व्यथांचे दर्शन घडविते. या सुमारासच गॉखला आपले खरे कार्यक्षेत्र चित्रकलेचेच आहे, ह्याची जाणीव झाली. त्याने पॅरिसला प्रयाण केले व लवकरच तेथील दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांचा परिचय करून घेतला. लहान लहान फटकाऱ्यांनी लखलखीत रंग वापरण्याच्या त्यांच्या शैलीकडे तो आकृष्ट झाला आणि त्याने जुन्या वळणाच्या शिष्टमान्य चित्रपद्धती झुगारून दिल्या. त्याने जपानी चित्रमुद्रांचा संग्रह केला तसेच अभिव्यक्तीचे नवे घाट शोधला. १८८८ च्या फेब्रुवारीत त्याने पॅरिस सोडले व दक्षिण फ्रान्समधील आर्लकडे प्रयाण केले. तेथे असताना तो जवळजवळ दररोज मोकळ्या जागी जाऊन चित्रे काढीत असे. भोवतालच्या झगमगीत वातावरणाच्या आविष्कारासाठी आपल्या चित्रांचे विस्तृत भाग तो घनतीव्र रंग वापरून आणि कुंचल्याचे भरदार फटकारे मारून रंगवी. सूर्यफुलांच्या मालिका रंगविताना दैदिप्यमान रंगद्रव्यांचा त्याने वापर केला. त्यामुळे आपल्या चित्रांत स्वतःची भावावस्था यथार्थपणे प्रकट व्हावी, हा त्याचा मनोदय सफल झालेला दिसतो. १८८८ च्या ऑक्टोबर महिन्यात त्याचा चित्रकार मित्र गोगँ आर्ल येथे आला. त्या दोघांच्या मनोवृत्तींतून जो संघर्ष निर्माण झाला, त्याची भयानक परिणती म्हणजे गॉखने आपला कान कापून टाकला. ही घटना गॉखच्या पुढील आयुष्यातील शोकात्म कालखंडाची नांदी ठरली. अशा व्यथित मनोवस्थेत असूनही त्याने चित्रनिर्मिती चालू ठेवली आणि १८८९ मध्ये दोनशेहून अधिक चित्रे काढली. लवकरच तो स्वच्छेने मनोरुग्णांच्या उपचारकेंद्रात दाखल झाला. यावेळच्या त्याच्या चित्रांतील आचक्यांनी पिळवटलेल्या आकृती त्याच्या वेदनामय मनाच्या निदर्शक आहेत. त्यांतील रंगांनाही एक प्रतिकात्मक अर्थ येऊ लागतो. निळा रंग हा अनंततेचा सूचक ठरतो. सायप्रिसीस, द स्टारी नाइट  ही त्या वेळची त्याची अधिक प्रसिद्ध अशी चित्रे होत. १८९० मध्ये त्याने एक चित्र विकले. त्याच्या आयुष्यातील ही एवढी एकच चित्राची विक्री. त्यानंतर दोन महिन्यांनी त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली गॉखच्या शोकात्म जीवनात आधुनिक कलावंताच्या दुरवस्थेचे मर्म भरलेले आहे. त्याच्या आयुष्यात लाभलेला एकमात्र विरंगुळा म्हणजे थीओचे — त्याच्या भावाचे — प्रेम. थीओला गॉखने लिहिलेली पत्रे हा त्याच्या आकांक्षांचा, चित्रणपद्धतीचा व दैनंदिन जीवनाचा केवळ आलेख आहे असे नव्हे तर एका महान हृदयाची साक्ष असलेले श्रेष्ठ वाङ्‌मय, अशी या पत्रांची गणना होते. 

संदर्भ : 1. Cabanne, Pierre Trans. Woodward, Daphne, Van Gogh, London, 1963.

          2. Gogh, V. W. Van, Complete Letters of Vincent Van Gogh, 3 Vols., New York, 1959.

          3. Graetz, H. R. The Symbolic Language of Vincent Van Gogh, London, 1963.

          4. Nagera, Humberto, Vincent Van Gogh : A Psychological Study, London, 1967.

          5. Tralbaut, Mark Edo Trans. Shenfield, Margaret, Van Gogh : A Pictorial Biography,

              London, 1959.

मेहता, कुमुद 


'द पोटॅटो ईटर्स' ( १८८५ ) व्हिन्सेंट व्हान गॉख. 'सन्‌फ्लॉवर्स' ( १८८८ ) व्हिन्सेंट व्हान गॉख. 'द स्टारी नाइट' ( १८८९ ) व्हिन्सेंट व्हान गॉख.