चिक्कणितचित्रण  :  (कोलाज). एक आधुनिक चित्रण-प्रक्रिया. फ्रेंच ‘Coller’ (चिकटवणे) या मूळ शब्दावरून ‘Collage’ ही संज्ञा रूढ झाली. ती प्रक्रियेची तसेच तद्‌भव कलाकृतींचीही निदर्शक आहे. ह्या प्रक्रियेत चित्रफलकावर अथवा अन्य सपाट पृष्ठावर कागदाचे तसेच कापडाचे तुकडे, वृत्तपत्रांची किंवा नियतकालिकांची कात्रणे, तिकिटे, भित्तिपत्रे, छायाचित्रे, रेखाटने इ. चिकटवली जातात आणि त्यातून नाना प्रकारचे सुसंवादी व सौंदर्यपूर्ण आकृतिबंध रूपास आणले जातात. चिक्कणितचित्रणाचा वापर विसाव्या शतकातील कलावंतांनी एक स्वतंत्र आविष्कार-माध्यम म्हणून तसेच चित्रकलेच्या वा रेखनाच्या प्रक्रियेस पूरक म्हणून विपुलपणे केला.

 वस्तू चिकटवण्याचे वा डकविण्याचे तंत्र आलंकारिक कला आणि लोककला यांत पूर्वीपासून प्रचलित होते. तथापि आधुनिक काळात या तंत्राचा वापर ⇨घनवादी  पंथाच्या कलावंतांनी प्रथमतः केला. पाब्लो पिकासोने स्टिल लाईफ वुइथ चेअर केनिंग (१९१२) या तैलचित्रात खुर्चीची वेतवीण सूचित करणारा छापील तैलकापडाचा तुकडा डकविला. पुढे ब्राकने द फूट डिश (१९१२) या रेखाचित्रात काष्ठतंतुदर्शक कागदाचे तीन आयताकृती तुकडे डकविले. हे पहिले ‘Papier Colle’ (कागदाचे चिक्कणितचित्र) होय. १९१२–१४ या काळात फ्रेंच घनवादी चित्रकारांनी अशी चित्रे निर्माण केली.

  

चिक्कणितचित्रणाच्या शोधामुळे आकार, प्रतिमा, साधने, अक्षरेशब्दसमूह यांच्या संश्लेषणांच्या नवनव्या शक्यता निर्माण झाल्या. पिकासो, ब्राक, ग्रीस यांसारख्या घनवादी चित्रकारांनी चित्रांमध्ये अक्षरे, वृत्तपत्र कात्रणे, तिकिटे, लेबले, पत्रिका तसेच क्वचित आरशांचे तुकडेही वापरून, त्यांना एक आगळी दृक्‌वास्तवता प्राप्त करून दिली. घनवाद्याप्रमाणेच नवकालवादी, दादावादी, अतिवास्तववादी वगैरे आधुनिक कलावाद्यांनी ह्या प्रक्रियेचा वापर विमुक्तपणे व कल्पकतेने केला आहे. त्यात कुर्ट श्व्हिटर्स, मॅक्स अर्न्स्ट इ. उल्लेखनीय होत. 

इनामदार. श्री. दे.

चिक्ककणितचित्रण : 'बॉट्‌ल, ग्लास अँड पाइप' (१९१४) - झॉर्झ ब्राक.चिक्कणितचित्रण : 'स्टिल लाइफ वुइथ चेअर केनिंग' (१९१२) - पाब्लो पिकासो.