रंगशलाकाचित्रण :  ( पॅस्टल पेंटिंग). विशिष्ट रंगीत कांड्यांनी चित्र रंगविण्याची पद्धती. ‘ पॅस्टल ’चा रंगीत कांडी वा रंगशलाका निदर्शक असा ‘पास्तेल्लो’हा मूळ इटालियन शब्द असून ,  तो ‘पास्ता’ या लॅटिन शब्दावरून आला आहे व त्याचा अर्थ लुकण  ( पेस्ट) असा होतो. रंगशलाकाचित्रण पद्धती इतर रंगपद्धतीपेक्षा बरीच आधुनिक आहे.

रंगशलाका बनविण्याकरिता रंगकणांची वस्त्रगाळ पूड करून ती पाण्यामध्ये कालवून त्याचे लुकण तयार करतात. त्यात चिकटण्याची  ( ॲ ड्हीसिव्ह) क्रिया वाढविण्याची योग्य त्या प्रमाणात गोंद मिसळून मग हव्या त्या आकाराच्या लंबवर्तुळाकार कांड्या तयार करतात. त्या ज्या प्रमाणात कठीण किंवा नरम करावयाच्या असतील ,  त्या प्रमाणात गोंद मिसळला जातो. चिकटण्याची क्रिया वाढवण्याकरिता इतरही द्रव्यांचा उपयोग केला जातो. उदा. ,  अरेबिक गम ,  ट्रागाकांथ गम ,  ओट धान्याचे पीठ ,  ‘मार्सेल्झ सोप ’ ( विशिष्ट प्रकारचा साबण) किंवा साबणाचे पाणी इत्यादी. विशिष्ट प्रमाणात मेणाचा उपयोग करूनही रंगशलाका बनवतात. वेगवेगळ्या रंगच्छटा बनविण्यासाठी रंगकणांमध्ये विशिष्ट पांढऱ्या चिकणमातीचा  ( व्हिचेंत्सा किंवा सिव्हिता कास्तेलाना अर्थ ,  पाइप क्ले) उपयोग करतात. त्यामुळे रंगाची चित्रपृष्ठ व्यापण्याची  ( कव्हरिंग) क्षमता वाढते.

शलाकांचे रंग टिकाऊ स्वरूपाचे असतात. तैलरंगाप्रमाणे ते पिवळट किंवा गडद होत नाहीत ,  शिवाय ते चकाकतही नाहीत. त्या रंगात असे काहीही मिसळलेले नसते ,  की ज्यायोगे तडे जाणे ,  खपल्या पडणे किंवा पोपडे येणे अशा प्रकारचे त्यावर परिणाम व्हावेत. रंगांचा इच्छित परिणाम त्वरित साधला जातो व कालांतरानेही त्यात बदल होत नाहीत. तथापि रंगकण सुटे व पूड लावल्यासारखे बसतात ,  त्यामुळे ते पूर्णांशाने स्थिर नसतात. थोड्याशाही धक्क्याने ते कागदापासून सुटतात ,  म्हणून रंगशलाकांनी रंगवलेली चित्रे रंगरोगण द्रवाने स्थिर करावी लागतात व ती काचेमध्ये बंदिस्त करावी लागतात. रंगशलाका-चित्रणाच्या स्थिरतेसाठी आजपर्यंत बऱ्याच द्रवांचा उपयोग करण्यात आला आहे. पण प्रत्येकात काहीना काही दोष आढळले आहेत. वातावरणातील कार्बन व बाष्प यांच्यामुळेही रंगशलाका चित्रावर वाईट परिणाम होतो व अशी खराब झालेली चित्रे पुन्हा दुरूस्त करता येत नाहीत.

रंगशलाकाचित्रणासाठी विशिष्ट प्रकारचा अक्रिय छटा  ( न्यूट्रल टोन) असलेला कागद वापरतात. त्यामुळे रंगांच्या विविध छटा योग्य तऱ्हेने दाखवता येतात. कागदावर रंग चिकटून व टिकून रहावे ,  म्हणून कागदास चित्रणापूर्वी लेप  ( कोटिंग) देण्याची पद्धत आहे. या तंत्राचा प्रभावी वापर करणाऱ्या काही चित्रकारांनी शोधून काढलेल्या पद्धती अशा  : ( १) फ्रेंच चित्रकार लातूर  ( १७०४ − ८८) ह्याच्या मते निळसर रंगाच्या कागदावर शाडूमध्ये  ( यलो ऑकर) अंड्याचा पिवळा बलक खलवून त्याचा पातळ लेप द्यावा  ( २) कॅस्कियारो हा स्पॅनिश चित्रकार करड्या रंगाच्या पातळ पण मजबूत पुठ्ठा वापरत असे व त्यावर पाणी व गोंद यांत पांढरा रंग मिसळून त्याचा पातळ लेप देत असे.  ( ३) सार्तोरिओ  ( १८६० − १९३२) हा इटालियन चित्रकार चित्रपृष्ठावर पातळ तैलरंग माखून त्यावर अगदी बारीक वाळू पसरत असे व पृष्ठभाग पूर्णपणे वाळल्यानंतर त्यावर रंगशलाकांनी रंगवीत असे. रोझाल्वा कार्येअरा  ( १६७५ − १७५७) ही इटालियन चित्रकर्त्री रंगशलाकाचित्रांसाठी रंगीत कागद वापरत असे. काही चित्रकारांनी तर बारीक वाळूकागदही वापरला आहे.

रंगशलाकांचे रंग वापरण्यात सोपे असतात. ते कागदावर अगदी सहजतेने लावता येतात. रंग लावल्यानंतर बोटांनी किंवा ‘शॅम्बा’ या हरिणाच्या नरम कमावलेल्या कातडीपासून बनविलेल्या दांडीने ते हवे तसे गुळगुळीत करता येतात. रंगांच्या कांड्या किंवा कातडी दांडी कागदावर घासताना पृष्ठभागाचा खरखरीतपणा नष्ट होऊ नये ,  म्हणून फार काळजी  घ्यावी लागते.

यूरोपमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकांत रंगशलाकाचित्रणाची सुरुवात झाली. तथापि सुरुवातीस केवळ रेखाचित्रणाकरिता किंवा रेखाचित्र विशेष भरीव बनविण्याकरिता त्यांचा वापर केला जाई व त्यात विविध रंगच्छटा भरल्या जात. धाकटा हान्स होल्बाइन  ( सु. १४९७ − १५४३) या जर्मन चित्रकाराने प्रथमच पद्धतशीरपणे रंगशलाका वापरावयास सुरुवात केली. पुढे अठराव्या शतकात फ्रेंच चित्रकारांनी रंगशलाका वापराचे स्वयंपूर्ण कलात्मक तंत्र शोधून काढले. मात्र ह्या चित्रण पद्धतीत फार मोठ्या आकाराची चित्रे बनवता येत नसत व ही अडचण कायमच राहिली.

आधुनिक चित्रकार दगा व तूलूझ-लोत्रेक यांनी विशेषत्वाने रंगशलाकांमध्ये अनेक चित्रे रंगविली. भारतीय चित्रकारांमध्ये नाव घेण्यासारखे चित्रकार फारसे झाले नाहीत. मुंबईत गुर्जर ,  डॅडी इरॉचशा यांनी काही रंगशलाका चित्रे केली आहेत.

संदर्भ  : 1. Bazzi Maria, The Artist’s Methods and Materials, London, 1960.

2. Handell, Albert Trainor, Leslie, PastelPaintingWorkshop, New York, 1981.

3. Roddon, Guy. Pastel Painting Techniques, New York, 1979.

सडवेलकर ,  बा बुराव