सडवेलकर, बाबुराव नारायण : (२८ जून १९२८-२३ नोव्हेंबर २०००). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रीय चित्रकार. जन्म वेंगुर्ले (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये व महाविदयालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. शालेय जीवनातच चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी निर्माण झाली व ह्या प्रेरणेने त्यांनी ‘ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ’, मुंबई येथे उच्च कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला (१९५०). रंग व रेखाकला विषयाची जी. डी. आर्ट ही पदविका त्यांनी संपादन केली (१९५२). त्यानंतर ‘ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ’मध्ये १९५३ ते ७१ या काळात त्यांनी चित्रकला बाबुराव सडवेलकरविभागात अधिव्याख्याता म्हणून अध्यापन केले. अध्यापन करीत असताना ‘ फुलब्राइट स्मिथमुंट ’ उपकमांतर्गत शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेलागेले व आधुनिक कलाशिक्षण-पद्धतींचा व तंत्रांचा तेथे त्यांनी अभ्यास केला (१९६२-६३). तत्पूर्वी अधिव्याख्याता असताना ते बाँबे ग्रूप ऑफ आर्टिस्टचे सभासद होते. या ग्रूपतर्फे त्यांनी सहा वर्षे प्रदर्शने भरविली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या रूपभेद या कला नियतकालिकाचे ते संपादक होते. १९६७ साली महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या कला संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. कला संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव व संस्मरणीय ठरली. १९५५ ते ७४ या काळात त्यांनी स्वत:च्या चित्रांची सहा एकल प्रदर्शने (वन मॅन शो) भरविली. त्याचप्रमाणे अमेरिकेत प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड व न्यूयॉर्क येथे त्यांनी स्वत:च्या चित्रांची एकल प्रदर्शने भरविली. अनेक आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनांतून व कलामहोत्सवांतून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. उदा., व्हेनिस, पॅरिस, साओ पाओलो येथील व्दैवार्षिक प्रदर्शने तव्दतच मॉस्को, टोकिओ, सायगाँव (हो-चि-मिन्ह) येथील त्यांची प्रदर्शने.

अमेरिकेत १९५० ते ६० या दशकात बहरलेला पाश्चात्त्य अमूर्त (ॲबस्ट्रॅक्ट) चित्रकलेचा नवप्रवाह मुंबईच्या कलाक्षेत्रात रूजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. ⇨ पॉल क्ले या स्विस आधुनिक चित्र-काराचा त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. त्यांची अमूर्त शैलीतील वैशिष्टयपूर्ण गाजलेली चित्रे म्हणजे वन वर्ल्ड (१९५७), लूनॅटिक (१९५९), द अर्थ I (१९६२), इमेज ऑफ द सिटी (१९६३), द कॉस्मिक सिटी II (१९७४), फ्लाइट ऑफ द लूनर रॉक (१९७४), फ्लोटिंग सिटीज (१९८१) इत्यादी. त्यांच्या अमूर्त चित्रांतील प्रतिमा वस्तूच्या सारभूत तत्त्वाच्या सूचक असतात. त्यांच्या चित्रांतील प्रतिमा-प्रतीकांतून रूपकात्मक, गूढ, आध्यात्मिक भाव सूचित केले जातात. त्या दृष्टीने चित्रांची शीर्षकेही अन्वर्थक वाटतात. त्यांच्या चित्रांमध्ये साधलेल्या रंग व आकार यांच्या सुसंवादी मेळातून अपूर्व सौंदर्य प्रतीत होते. व्यक्तिचित्रे रंगविण्यातही त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळविले. सुरूवातीच्या काळात त्यांनी विपुल व्यक्तिचित्रे रंगविली. बॉबी, रीटा, दादाजी, गे हेम्स, विजू ही त्यांनी रंगविलेली काही उत्कृष्ट व्यक्तिचित्रे होत. चेहऱ्यावरील भावदर्शनातून व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे, ही त्यांच्या व्यक्तिचित्रांमागील प्रेरणा होती. तैलरंगाप्रमाणेच जलरंग-माध्यमावरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. मुंबईतील अनेकविध स्थळांची शेकडो चित्रे अपारदर्शक रंगांत रंगवून त्यांनी मुंबईचे आगळेवेगळे रंगमय सचित्र दर्शन घडवले. छटायुक्त (टिंटेड) कागदाच्या नैसर्गिक छटेचा कौशल्यपूर्ण वापर, रंगांचे द्रूत फटकारे, रंग व छाया-प्रकाशाचे मनोहारी दर्शन इ. वैशिष्टयंमुळे ही चित्रे लक्षणीय ठरली आहेत. भित्तिचित्रण (म्यूरल) व भित्तिलेपचित्रण (फेस्को) तंत्रांचाही त्यांचा गाढा, सखोल व्यासंग होता. खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील व एस्. के. एफ्. फॅक्टरीतील भित्तिचित्रे (म्यूरल्स) हे मोठे प्रकल्प त्यांनी सांघिक पद्धतीने काही विदयार्थ्यांच्या साहाय्याने पूर्ण केले. मुंबई दूरदर्शनवरून त्यांनी अनेक कलाविषयक कार्यकम सादर केले. चित्रकथी या लोककला-परंपरेवर त्यांनी अनुबोधपट तयार केला. चित्रकला वअन्य ललित कला यांविषयी त्यांनी सैद्धांतिक व उपयोजित स्वरूपाचे मौलिक लेखनही केले आहे. वर्तमान चित्रसूत्र (१९९६) हा त्यांचा कलाविषयक लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : बाँबे आर्ट सोसायटीची सुवर्णपदके (१९५४, १९५५, १९५६, १९५८ व १९५९). ‘ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ’ नवी दिल्ली ‘ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ’, मुंबई ‘ पंजाब नॅशनल म्यूझीअम ’, चंडीगढ ‘ टाऊन हॉल म्यूझीअम ’, कोल्हापूर इ. संस्थांमध्ये त्यांची चित्रे कायमस्वरूपी संग्रहीत करण्यात आली आहेत.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले. 

इनामदार, श्री. दे. 


'लूनॅटिक' (१९५९). 'वन वर्ल्ड' (१९५७).
'लॅन्डस्केप', कोल्हापूर (१९५०). 'पिंक सिंफनी' (१९५२).
'ओडेसी' 'सेल्फ पोर्ट्रेट' (१९५४).