दगा, एद्‌गार : (१९ जुलै १८३४–२७ सप्टेंबर १९१७). आधुनिक फ्रेंच चित्रकार व मूर्तिकार. पूर्ण नाव ईल्येअर झेर्‌मँ एद्‌गार दगा. पॅरिसमध्ये एका उच्चवर्गीय सधन कुटुंबात जन्म. १८५५ मध्ये त्याने ‘Ecole des Beaux–Arts’ मध्ये प्रवेश घेतला व अँग्रचा शिष्य ल्वी लामॉत याच्या हाताखाली कलेचे धडे घेतले. अँग्रच्या नव–अभिजाततावादाचा त्याच्यावर प्रभाव होता व या प्रभावातून त्याने अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे रेखनकौशल्य आत्मसात केले. १८५६–५९ या कालावधीत तो वारंवार इटलीला गेला व तेथील वास्तव्यामध्ये त्याने प्रबोधनकालीन चित्रकारांचा अभ्यास केला. या सुरुवातीच्या काळात त्याने यंग स्पार्टन गर्ल्स चॅलेंजिंग स्पार्टन बॉइज  (१८६०) यासारखी ऐतिहासिक विषयांवरील चित्रे काढली. या चित्रांतून नवअभिजाततावादी विषय आणि चित्ररचना यांच्या प्रभावाबरोबरच त्याचे मानवी देहाकाराचे वास्तववादी आकलनही सूचित होते. याच सुमारास त्याने द बेल्लेली फॅमिली  (सु. १८६०–६२) हे समूह–व्यक्ति चित्र रंगवले त्यातून त्याची नव–अभिजाततावादाकडून वास्तववादाकडे वाटचाल सूचित होते. १८६२ च्या सुमारास त्याची मानेशी भेट झाली आणि तो दृक्‌प्रत्ययवादी संप्रदायात सामील झाला. १८७४–८६ पर्यंतच्या त्यांच्या आठ चित्रप्रदर्शनांतूनही त्याने भाग घेतला. वूमन वुइथ क्रिसॅनथिमम्स  (१८६५) यासारख्या त्याच्या चित्रांतून मानेचा प्रभाव जाणवतो. तो दृक्‌प्रत्ययवादी मानला जात असला, तरीही दृक्‌प्रत्ययवाद्यांच्या निसर्गचित्रणाविषयी आणि नैसर्गिक प्रकाशछटांच्या अभ्यासाविषयी त्याला एक प्रकारे अनास्थाच होती. त्याच्या अभिजात रेखनकौशल्यामुळे त्याच्या शैलीलाही दृक्‌प्रत्ययवाद्यांपेक्षा वेगळे आणि पृथगात्म स्वरूप लाभले. मात्र दृक्‌प्रत्यवाद्यांची वास्तववादी चित्रविषयांकडे पाहण्याची दृष्टी त्याला मान्य होती. यानंतरच्या त्याच्या चित्रांमध्ये भोवतालच्या वास्तवाचे आविष्करण आढळते. घोड्यांच्या शर्यती, नाट्यगृहे, नृत्यगृहे, कुंटणखाने येथील वातावरणाचे व व्यक्तींचे त्याने प्रभावी चित्रण केले. १९७३ च्या सुमारास त्याने नर्तकींची चित्रे काढण्यास सुरुवात केली आणि पुढे बॅले नर्तकी तसेच कार्यमग्न व कामाने थकलेल्या, स्नान करणाऱ्या, कपडे बदलणाऱ्या, केस विंचरणाऱ्या अशी स्त्रियांची विविध रूपे हे त्याचे नित्याचे चित्रविषय बनले. अशा समाज घटकांच्या ‘हालचाली व वर्तनातील बारकावे त्याने सूक्ष्मपणे टिपले. रंग, आकार व प्रकाशछटा यांच्या शोधकतेचे तसेच रंगांच्या व रंगशलाकांच्या (पॅस्टल) वापरातील प्रयोगशीलतेचे साधन म्हणून त्याने या व्यक्तिप्रतिमांचा आविष्कार केला. मानवी हालचालींचे गतिमान चित्रण करण्याबद्दल त्याची विशेष ख्याती आहे. गतिमान वास्तवाच्या चित्रणातून त्याने चिरंतन सत्याचा साक्षात्कार घडवला. त्याची तांत्रिक प्रयोगशीलताही कलाविकासात उपकारक ठरली. तैलरंग, जलरंग, रंगशलाका, अम्लरेखन, छायाभेदांकित अम्लरेखन’ (अक्वाटिंग) अशा अनेक माध्यमांमध्ये त्याने विविध लक्षणीय प्रयोग केले तसेच यशस्वी माध्यम–मिश्रणेही केली. आयुष्याच्या अखेरीस त्याने प्रामुख्याने रंगशलाका–माध्यमामध्ये चित्रनिर्मिती केली. जपानी ठशांचा व आधुनिक छायाचित्रणतंत्राचा त्याने कल्पकतेने कौशल्यपूर्ण वापर करून घेतला व चित्ररचनेमध्ये क्रांतिकारक प्रयोग केले. आयुष्याच्या उत्तर काळामध्ये त्याने प्रामुख्याने शिल्पनिर्मिती केली. त्याची ७४ शिल्पे उपलब्ध आहेत. बॅले नर्तकी, गतिशील मानवी प्रतिमा, घोडे यांचा त्यांत अंतर्भाव होतो. ही शिल्पे त्याने मेणामध्ये निर्माण केली आणि पुढे (म्हणजे दगाच्या मरणोत्तर, १९१९–२१ च्या सुमारास) ब्राँझमध्ये ओतून घडविण्यात आली. त्यात एका छोट्या बॅले नर्तकीची बॅले डान्सर ड्रेस्ड (सु. १८८१) ही ब्राँझप्रतिमा विशेष प्रशंसनीय आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या अंगावर चढवलेली खरीखुरी वस्त्रे.

दगा एकाकी व अविवाहित आयुष्य जगला. त्याला रोगविभ्रम विकृतीने पछाडले होते व वाढत्या वयाबरोबर त्याची ही विकृतीही बळावत गेली. आयुष्याच्या अखेरीस त्याची दृष्टीही अधू झाली होती. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Boggs, Jean S. Portraits by Degas, Berkeley, 1962.

            2. Pool, Phoebe, Degas, London, 1963.

इनामदार, श्री. दे.


 'द रिहर्सल' (सु. १८७७) - दगा.'द टब' (१८८६) - दगा.

Close Menu
Skip to content