पॉलक, जॅक्सन : (२८ जानेवारी १९१२-११ ऑगस्ट १९५६). जगप्रसिध्द आधुनिक अमेरिकन चित्रकार. जन्म कोडी, वायोमिंग येथे. त्याचे बालपण अरिझोना व कॅलिय़फोर्निया येथे गेले. वयाच्या सतराव्या वर्षी तो न्यूयॉर्कला गेला. तेथे ‘आर्ट स्टुडंट्स लीग’ मध्ये टॉमस हार्ट बेंटनच्या हाताखाली त्याने चित्रकलेचे शिक्षण घेतले. १९३८ ते १९४२ या काळात त्याने ‘फेडरल आर्टस् प्रोजेक्ट’ या कला प्रकल्पामध्ये काम केले. त्याचे पहिले व्यक्तीगत चित्रप्रदर्शन (वन मॅन शो) १९४३ मध्ये ‘आर्ट ऑफ धिस सेंच्युरी गॅलरी’ मध्ये भरले. ली क्रॅसनर या चित्रकर्तिशी त्याने १९४४ मध्ये विवाह केला. अप्रतिरूप अभिव्याक्तिवादाच्या [⟶अभिव्याक्तिवाद] प्रणालीचा पॉलक हा प्रमूख प्रवर्तक मानला जातो. त्याच्या सुरूवातीच्या चित्रांवर घनवाद, अतिवास्तववाद अशा युरोपिय कलाप्रणालींचा प्रभाव होता. मेल अँड फिमेल (१९४२) हे त्यांचे उकृष्ट उदाहरण. १९४७ च्या सुमारास त्याने रूढ व सांकेतिक चौकटचित्रणाचा अव्हेर करून, खास स्वत:ची अशी क्रांतिकारक जॅक्सन पॉलक व पार्श्वभागी त्याचे एक चित्रचित्रणपद्धती अस्तित्वात आणली. ही पद्धती ⇨क्रियाचित्रण म्हणून ओळखली जाते. तीत जमिनीवर सैलसर पसरलेल्या मोठ्या कॅनव्हासवर रंग फेकणे, फासणे, ठिबकवणे, रंगाचे शिंतोडे उडवणे तसेच काठ्या, सुर्‍या, थाप्या आदी साधनांनी तो ढवळणे, अशा प्रक्रियांचा समावेश असे. कॅनव्हासच्या सर्व बाजूंनी फिरून तो रंग देत असे. सर्जनाच्या अवस्थेतील मानसिक व शारीर चैतन्यशक्तीचे अत्यंत उत्स्फूर्त असे विमुक्तीकरण क्रियाचित्रणात अभिप्रेत असल्याने ते मूलत: अतिवास्तववादी विचारसरणीला जवळचे होते. ही चित्रणपध्दती अनांवर सहजप्रेरणांवर व स्वयंचलनावर भर देणारी होती. ‘चित्राला स्वत:चे असे आयुष्य असते व ते आकाराला आणण्यासाठी मी धडपडत असतो’, असे तो म्हणे. समग्र चित्राची (ओव्हरऑल पेंटिग) संकल्पना ह्यातून सिध्द झाली. अशा चित्राला सकृतदर्शनी आरंभ व परिपूर्ती नसते. ते चित्रफलकाची संपूर्ण व्याप्ती पसरून उरते, किंबहुना त्यापलीकडे पसरण्याच्या शक्यता सूचित करते. पॉलकने रंग ठिबकवण्याच्या तंत्रातून अनेक उत्तमोत्तम चित्रे निर्माण केली. उदा., फूल फॅदम फाइव्ह (१९४७), नंबर वन (१९४८), ऑटम र्‍हिदम (१९५०, ब्ल्यू पोल्स (१९५३) इत्यादी. ब्ल्यू पोल्स हे चित्र एका विमुक्त जबरदस्त जोपात काढलेले असूनही ते रंगीबेरंगी व रूपेरी रेषांच्या अतिनाजुक जाळीसारखे दिसते. त्याच्या चित्रणातील रेषांकनाची गुणवत्ता असाधारण होती. आकार वा वस्तू गोचर करणे, यासारखी रेपेची जी पारंपरिक कार्यवादी उद्दिष्टे असतात, त्यांपासून त्याने रेपा मुक्त केली. परिणामत: त्याच्या चित्रातून रेपेची चित्रमयता आणि अभिव्याक्तिक्षमता प्रकर्पाने नजरेत भरते. साउथॅम्पटन येथे मोटार अपघातात त्यांचे निधन झाले.

संदर्भ : O’ Hara, Frank, Jackson Pollock, New York, 1967.

इनामदार, श्री. दे.