पिकासो, पाब्लोपिकासो, पाब्लो : (२५ ऑक्टोबर १८८१-८ एप्रिल १९७३). विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ स्पॅनिश कलावंत. चित्रकार, शिल्पकार, आरेख्यक कलावंत अशा विविध नात्यांनी त्याची कारकीर्द आधुनिक कलाक्षेत्रात संस्मरणीय ठरली आहे. आधुनिक (मॉडर्न) कला म्हटली, की सामान्य रसिकाला एकदम पिकासोचे नाव आठवते. इतके यश, इतकी किर्ती आणि वैयक्तिक जीवनातील इतक्या घडामोडींसह  इतके समृध्द जीवन क्वचितच कोणा कलावंताच्या वाट्याला आले असेल. वास्तविक आधुनिक कलेचे युग पिकासोच्या जन्माआधिच सुरू झाले होते. त्याच्य आधि व त्याच्य हयातीत विविध आधुनिक कलाप्रवाहांत विविध कलावंतांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण वाटा चोखाळून अस्सल कलासिध्दी मिळविल्या. त्यातील अनेकांकडून पिकासोने गुण व वाणही उचलले पण त्याच्य विलक्षण व्यक्तिमत्त्वाने आणि कार्यशक्तीने त्याची कलानिर्मिती सर्वांपेक्षा आधिक प्रमाणात गाजली. लिओनार्दो दा व्हींची हा कलावंत, भाष्यकार आणि शास्रज्ञही होता. मायकेलअँजेलो हा कलावंत आणि भाष्यकारही होता. पिकासोचा समकालीन पॉल क्ले कलावंत आणि भाष्यकार म्हणूनही जाणकारांमध्ये प्रसिध्द आहे. पिकासो स्वत: भाष्यकार नव्हता: तथापि त्याच्या हयातीतच त्याची कला व खाजगी जीवन यांवर जितके ग्रंथ निर्माण झाले, तितके ते कोणत्याही कलावंताच्या वाटेला आले नाहीत. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात बालपणापासून ते अगदी मृत्यूपर्यत झपाटलेपणाने विलक्षण मेहनत करून अनेकविध माध्यमांमध्ये पिकासोने कलाकृती आणि कलावस्तू  यांची इतकी प्रचंड निर्मिती करून ठेवली आहे, की तिचा जगड्व्याळ व्याप पाहून कोणीही चकित होईल.

स्पेनमधील मॅलागा या गावात त्याच जन्म झाला. त्याचे वडिल रूईथ ब्लास्को कलाशिक्षक होते. वयाच्या दहाव्या वर्षीच भावी काळातील प्रतिभावंत म्हणून लोक त्याच्याकडे पाहू लागले. बार्सेलोना येथे वडील शिक्षकी करीत असलेल्या कलासंस्थेत तो दाखल झाला आणि सर्वप्रथम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. श्रीमंत चुलत्याच्या आश्रयाने माद्रिद येथिल ‘रॉयल अकॅडमी’मध्ये तो नंतर दाखल झाला. पण शिक्षक आणि मित्र यांच्याशी बिनसल्याने त्याला तेथून निघावे लागले. चुलत्याचा आश्रयही तुटला. आजार, प्रेम, मैत्री जुळणे व तुटणे असे अनुभव घेत, कठीण परिस्थितीशी झगडत तो पॅरिस, बार्सेलोना, मॅलागा या दरम्यान फिरत होता. १९०४ साली गर्टूड स्टाइन आणि तिचा भाऊ यांनी त्याच्या कलेला पहिला प्रतिसाद दिला. येथपर्यत त्याचे जिवन हलाखीचे होते.

'बबून अँड यंग', ब्रांझशिल्प, 1951

ह्याची साक्ष या काळातील त्याच्या ‘नीलकालखंड’ (ब्ल्यू पीरीअड १९०१-०४) या नावाने ओळखल्या जाणार्‍या चित्रांतून मिळते. नंतरच्या दोन वर्षात त्याच्य जिवनाचा रंग पालटला. चित्रांत गुलाबी रंगाने अंग धरले. हा ‘गुलाबी कालखंड’ (रोझ पीरीअड १९०५) होय. तथापि १९०७ साली त्याने Les Demoiselles d’ Avignon हे ⇨ घनवादी चित्र रंगविले (पहा : मराठी विश्वकोश : १, चित्रपत्र ६३) आणि तेथून त्याच्या यशाची चढती कमान सुरू झाली व ती अखेरपर्यत चढतीच राहीली. रॅफेएलाइट वास्तववादी शैलीचे बाळकडू पिकासोला बालपणीच वडिलांकडून मिळाले होते. कलाजगात तो उमेदवारी करू लागला, त्या काळात व्हान गॉख, गोगँ, सेझान यांसारख्या उत्तरदृकप्रत्ययवाद्यांनी नवे युग आणले होते. कोरड्या वास्तववादाची सद्दी आता संपली होती. रॅफेएलाइट वास्तववादाचा त्याग करून नवे काही करण्याची पिकासोची धडपड चालली होती. आधुनिकतेचे विविध प्रवाह आले आणि कलावंतांचे विविध गट बनले. पिकासोला कोणत्याही गटाचे पाठबळ नव्हते. अविश्रांत मेहनत करूनही कलादृष्टीची स्पष्टता नव्हती व लौकीक स्थैर्यही नव्हते. नीलकालखंडात तो असा चाचपडताना दिसतो. गुलाबी कालखंडामध्ये मात्र तो स्थिरावलेला दिसतो. हीच दिशा घेऊन तो सहजतया विकसीत होत गेला असता, तर कदाचित वेगळा पिकासो घडला असता. पण सेझानच्या उक्तीतून पिकासोच्या कलाजीवनाला वेगळीच कलाटनी मिळाली. ‘सृष्टीतील वस्तूंमध्ये सर्वत्र घनाकार असतात’, या सेझानच्या भूमिकेतून त्याला स्फूर्ती मिळाली. ब्राक, फायनिंगर यांच्या सहकार्याने त्याने घनवादी पंथ सुरू केला. त्यांचे नेतृत्व केले व कीर्ती  मिळविली. मात्र त्याबरोबरच घनवादी कोरड्या विश्लेषणपध्दतीचा यांत्रिकपणा त्याने ओढवून घेतला. वडिलांपासून लाभलेल्या त्याच्या वास्तववादी प्रवृत्तीची त्यामुळे ओढाताण झाली, असे दिसते. पुढे बहुधा त्यातून सुठण्यासाठीच काहीशा वास्तववादीपण शिल्पसदृश घनाकारी शैलीत मनुष्यकृती रंगविणे त्याला अटळ वाटले असावे. आपल्या या शैलीला त्याने ‘ग्रीक अभिजाततेचा काळ’ असे नामाभिधान स्वत:च करून टाकले. कलादृष्टीची अशी चंचलता त्याला आयुष्यभर पुरली. 

'द व्हाइट आउल', मृत्स्नशिल्प, 1952स्पेनमधील यादवीमध्ये नाझींनी विमान हल्ला करून उद्ध्वस्त केलेल्या शहराचा विषय घेऊन त्याने गेर्नीका हे भव्य चित्र रंगविले (पहा : मराठी विश्वकोश : ५, चित्रपत्र ४५). युद्धावर प्रखर भाष्य करणारे हे चित्र स्पॅनिश सरकारने १९३७ सालच्या पॅरिसमधील जागतिक महोत्सवात प्रदर्शित केले. तेथून त्याची कीर्ती जगभर सामान्य रसिकांपर्यंत पसरली. गेर्नीकाच्या निर्मीतीने त्याने जगाला धक्का दिला  पण पहिल्या महायुद्धातील भयानक संहाराच्या वेळी मात्र तो घनवादाच्या यांत्रिक कोरडेपणात गढून गेला होता. पहिल्या महायुद्धाविरूद्ध झालेल्या प्रखर दादावादी प्रतिक्रियेत पिकासो उतरलेला दिसत नाही. नंतरच्या अतिवास्तववादी कलाप्रवाहाशी नाते जोडण्याचा प्रयत्न त्याने केला तथापि अतिवास्तववादामधील अभिव्यक्तीची निखळ सहजता त्याला पेलली नाही. दुसर्‍या महायुद्धात नाझींनी फ्रान्सचा कब्जा घेतला. तरीही पिकासोला पॅरिसमध्ये राहू दिले. मात्र चित्रे प्रदर्शित करू दिली नाहीत. तथापि नंतरही त्याने दुसर्‍या महायुद्धावर चित्रभाष्य केले नाही. यानंतरचे त्याचे चित्रभाष्य म्हणजे १९५१ साली कोरियातील हत्याकांडावर त्याने रंगविलेले मॅसॅकर इन कोरिया हे चित्र पण त्याला गेर्नीकाची सर नाही. १९५२ मध्ये त्याने व्हॅलोरीस येथील चॅपलवर वॉर अंड पीस हे भव्य भित्तिचित्र दोन भागांत रंगवले तेव्हापासून ते शांतिमंदिर म्हणून संबोधले जाऊ लागले. यानंतरच्या काळात मात्र पिकासोने चित्रांतून सामाजिक भाष्य केले नाही.

 कलावंत आणि व्यक्ती या दोन्ही दृष्टींनी पाहता विसाव्या शतकातील गुंतातुंतीच्या आणि परस्परविरोधी जीवनप्रवाहांच्या जटील प्रेरणांचे ज्याला जबरदस्त आकर्षण होते. त्यात त्याच्या व्यक्तिमत्वाची ओढाताण झाली हे खरे असेल, तरी जीवनाच्या या प्रखर ओढीमुळेच त्याच्या अफाट कलानिर्मितीचे परिपोषण होत राहिले, हेही खरे आहे. विसाव्या शतकातील सांस्कृतिक व अन्य प्रेरणांमधील परस्परविरोध त्याच्या व्यक्तिमत्वातही खिळलेला होता. कला व जीवन यासंबंधी सनसनाटी भाष्ये करण्याचा त्याचा हव्यास आमरण टिकून होता. शेवटी तर ‘ आपण आधुनिकतेच्या नावाखाली जे जे केले, ते केवळ मानभावीलोकांची फसवणूक करण्यासाठी केले’, अशी घोषणा त्याने केली.अगदी म्हातारपणापर्यंत अनेक स्त्रियांशी विवाह करून तो जसा गाजला तद्वतच साम्यवादी पक्षाचा सभासद होऊनही. फ्रान्स्वाझ गिलॉत या स्त्रीने त्याच्याशी फारकत घेतल्यानंतर लाइफ विथ पिकासो नावाचे पुस्कत लिहिले. त्यात कलावंत आणि माणूस म्हणून त्याचे परखडपणे दर्शन घडविले. त्याच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षीही या पुस्तकाने खळबळ माजविली. साम्यवाद्यांशी त्याने जवळीक केली, त्यात त्या विचारप्रणालीपेक्षाही मित्रांचा प्रभाव जास्त होता. 


आयुष्याच्या अखेरीस मात्र या जगातील आजच्या प्रेरणांपेक्षाही त्याला आदिमानवी वृत्तीची ओढ लागली. त्याचा कलाविष्कार आदिमानवी गुणवत्तेने बहरून आला. पशू, पक्षी, घुबडे, विदूषक या विषयांत तो बुडून गेला. मिनोटॉर (नृवृषभ), सेंटॉर (हयग्रीव) या ग्रीक अलौकिक पौराणिक प्राण्यांमधील पाशवी शक्तीचा ठाव त्याने आपल्या रेखनांतून आणि शिल्पांतून घेतला. सर्कशीतील कसरती आणि बैलझोंबी या जीवनमरणाशी मुकाबला करणार्‍या स्पॅनिश लोकांच्या आवडत्या खेळांचे त्यासा बालपणापासून आकर्षण होते, हे त्याच्या चित्रांवरून दिसते. आयुष्याच्या अखेरीस मृत्स्नाशिल्पावर त्याने रंगविलेली या विषयावरील चित्रे रेषात्मक चैतन्याने अजोड ठरणारी आहेत. वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी पिकासोचे फ्रान्समधील मॉगीन्स या गावा हृदयविकाराने निधन झाले आणि त्याच्या मृत्यूने विसाव्या शतकातील खळबळजनक पिकासोपर्व संपले.

 संदर्भ : 1. Barr, Alfred H. Jr. Picasso : Fifty Years of His Art, New York, 1946.

    2. Gilot, Francoise Lake, Carlton, Life with Picasso, London, 1965.

   3. Penrose, Roland, Picasso : His Life and Work, London, 1958.

   4. Wertenbaker, Lael, The World of Picasso, New York, 1967.

कदम, संभाजी 

‘द ड्रीम’, १९३२.        ‘द ओल्ड गिटारिस्ट’, १९०३.  ‘मा जोली’ (‘वुमन विथ गिटार’), १९११-१२. ‘त्रि म्यूझिशन्स’, १९२१.‘पोर्ट्रेट ऑफ गर्ट्रूड स्टाइन’, १९०६.‘द फॅमिली ऑफ ॲरक्रोबॅट्स विथ एप’, १९०५.‘नाइट फिशिंग ॲरट अँतीब’, १९३९.