दाली, साल्वादोर: (११ मे १९०४– ). आधुनिक स्पॅनिश चित्रकार. अतिवास्तववादी पंथातील तो सर्वांत लोकप्रिय व प्रभावी कलावंत मानला जातो. त्याचा जन्म फिगेरास येथे झाला. १९२१ मध्ये त्याने माद्रिद येथील ‘Escuela Nacional de Bellas Artes de San Fernando’ या कलाविद्यालयात प्रवेश घेतला. तथापि त्याचे तेथील वास्तव्य वादग्रस्त ठरून १९२६ मध्ये त्याची तेथून हकालपट्टी झाली. त्याच सुमारास माद्रिद व बार्सेलोना येथे त्याने चित्रप्रदर्शने भरवली. या सुरुवातीच्या काळात त्याने घनवादी, वास्तववादी, नव–अभिजाततावादी इ. विविध प्रणालींचे संस्कार आत्मसात करून घेतले. जोर्जो दी कीरीको व कार्लो कारा या अध्यात्मवादी पंथाच्या इटालियन चित्रकारांचाही त्याच्यावर प्रभाव पडला. १९२८ मध्ये दाली पॅरिस येथे गेला तिथे त्याची जोन मीरो या अतिवास्तववादी स्पॅनिश चित्रकाराशी भेट झाली व तो अतिवास्तववादी पंथात सामील झाला. या सुमारास त्याच्या शैलीला खास त्याचे असे व्यक्तिविशिष्ट वळण लाभले. स्वप्नसदृश, भ्रमसूचक प्रतिमांचे चित्रण त्याने सूक्ष्म बारकावे यथातथ्यपणे टिपणाऱ्या वास्तववादी शैलीने केले. फ्रॉइडप्रणीत मानसशास्त्रीय सिद्धांतांच्या प्रभावातून त्याने अबोध मनाच्या तळातील इच्छाकांक्षांचे, भयादी मनोविकारांचे दर्शन घडविले. हे दर्शन घडविताना त्याने अनेकविध प्रतिमांची सरमिसळ केली सखोल किंबहुना असीम यथादर्शनाचा वापर केला अतिशय विसंवादी व असंबद्ध वस्तुप्रतिमांचे संश्लेषण केले आणि वस्तुतः कठीण व घनरूप अशा वस्तूंचे विद्राव्य व ठिसूळ–मृदू अवस्थेमध्ये रूपांतर केले. उदा., पर्सिस्टन्स ऑफ मेमरी (१९३१) या त्याच्या प्रख्यात चित्रामध्ये लवचिक, वितळणारी, प्रसरणशील, निष्पर्ण झाडाच्या फांदीवर टांगलेली, अशी घड्याळाची विविध रूपे चित्रित केली आहेत. विमुक्त, सर्वस्वी नावीन्यपूर्ण आणि अन्वर्थक असे प्रकल्पन (फँटसी) व दुःस्वप्नसदृश प्रतिमासृष्टी हे त्याच्या चित्रनिर्मितीचे लक्षणीय विशेष होत. आपल्या चित्रांचे वर्णन त्याने ‘हाताने रंगवलेली स्वप्नरूप छायाचित्रे’ असे केले आहे. इल्युमिन्ड प्लेझर्स (१९२९), ॲकॉमोडेशन्स ऑफ डिझायर (१९२९), सॉफ्ट कन्स्ट्रक्शन वुइथ बॉइल्ड बीन्स, प्रीमॉनिशन ऑफ सिव्हिल वॉर (१९३६), द मेटॅमॉर्फसिस ऑफ नार्सिसस (१९३६–३७) इ. त्याची उल्लेखनीय चित्रे होत.

दालीने अमेरिकेतील आपले पहिले चित्रप्रदर्शन १९३४ मध्ये भरवले. १९४० नंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. न्यूयॉर्क येथील जागतिक मेळाव्यामध्ये (१९३९) त्याने ‘दाली’स ड्रीम ऑफ व्हीनस’ हे दालन सजविले. १९४१ आणि १९६६ या वर्षी न्यूयॉर्क येथे त्याच्या समग्र चित्रांची प्रदर्शने भरवण्यात आली होती. १९४९ पासू दालीने विशेषत्वाने धार्मिक विषयांवर नाट्यपूर्ण चित्रनिर्मिती केली. मॅडोना ऑफ पोर्ट–लिगात (१९४९), ख्राइस्ट ऑफ सेंट जॉन ऑफ द क्रॉस (१९५१), क्रूसिफिक्शन (१९५४), लास्ट सपर (१९५६) इ. त्याची धार्मिक चित्रे उल्लेखनीय आहेत. दालीने जडजवाहिर, फर्निचर, वस्त्रप्रावरणे, ग्रंथसजावट, रंगमंच–नेपथ्य व वेषभूषा इ. क्षेत्रांतही वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली. दान्तेचा ब्राँझमधील अर्धपुतळा (१९६५) ही त्याची महत्त्वपूर्ण शिल्पनिर्मिती. लूईस ब्यूनेल समवेत त्याने Un chien andalou(१९२८ इं. शी. अन अँडलूझियन डॉग) आणि L’Age d’or(१९३०इं. शी. द गोल्डन एज) हे दोन अतिवास्तववादी चित्रपट निर्माण केले. या चित्रपटांमध्ये माशांनी बुजबुजलेले प्रेतांचे सांगाडे, जळणारे जिराफ, लिबलिबित घड्याळे अशा खास दालीकल्पित दुःसह प्रतिमांची गर्दी आहे. स्पेलबाउंड (१९४५) या चित्रपटातील स्वप्नदृश्यांच्या कल्पक हाताळणीमुळे त्यास अमाप लोकप्रियता लाभला. द सीक्रेट लाइफ ऑफ साल्वादोर दाली (१९४२) व डायरी ऑफ अ जिनीयस (१९६५) ही त्याची आत्मचरित्रपर पुस्तके प्रसिद्ध आहेत.

संदर्भ: Descharnes, Robert, The World of Salvador Dali, Bombay, 1968.

इनामदार, श्री. दे.

'सॉफ्ट कन्स्ट्रक्शन वुइथ बॉइल्ड बीन्स प्रीमॉनिशन ऑफ सिव्हिल वॉर' (१९३६) – साल्वादोर दाली. 'द मेटॅमॉर्फसिस ऑफ नार्सिसस' (१९३६ – ३७) – साल्वादोर दाली