शेर-गिल, अमृता : (३० जानेवारी १९१३ – ५-६ डिसेंबर १९४१). श्रेष्ठ भारतीय चित्रकर्ती. जन्म बूडापेस्ट (हंगेरी) येथे. तिचे वडील उमराव सिंग हे शीख, तर आई मारी अँटनेट ही हंगेरियन होती. उमराव सिंग

अमृता शेरगिल

ह्यांचे वडील आणि आजोबा पंजाबातील शीख सत्तेचे संस्थापक महाराजा रणजितसिंग ह्यांच्या सेवेत होते. हे सरदार घराणे होते. मारी अँटनेट ही भारतात आली असताना उमराव सिंग ह्यांच्याशी तिचा परिचय झाला आणि ४ फेबुवारी १९१२ रोजी लाहोरला त्या दोघांचा विवाह झाला. उमराव सिंग ह्यांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता तसेच संस्कृत, फार्सी आणि उर्दू साहित्याचा व्यासंग होता. मारी अँटनेट उत्तम गायिका आणि पियानोवादक होती. लग्नानंतर पुढे अमृताचे आईवडील हंगेरीला गेले. २ फेबुवारी १९२१ रोजी अमृतासह ते भारतात परतले. परतीच्या प्रवासादरम्यान दोन आठवडे त्यांचे वास्तव्य पॅरिसमध्ये होते. त्यामुळे अमृताला प्रथमच तेथे काही श्रेष्ठ कलाकृती-उदा., लिओनार्दो दा व्हींची ह्याची मोनालिसा-त्यांच्या मूळ स्वरूपात पाहायला मिळाल्या. भारतात हे कुटुंब सिमल्याला राहू लागले. सिमल्याला असताना अमृताचा चित्रकलेकडे असलेला विशेष कल पाहून मेजर व्हिटमार्श नावाचा एक चित्रकलाशिक्षक तिच्यासाठी नेमला गेला तथापि अगदी हुबेहूब चित्रणावर त्याचा भर असल्यामुळे आणि तसे ते होईपर्यंत अमृताला तो पुनःपुन्हा प्रयत्न करायला लावत असल्यामुळे ती त्याला कंटाळली आणि त्याचे अध्यापन थांबविण्यात आले. त्यानंतरचा शिक्षक हाल बेव्हन पेटमन हा मात्र तिला आवडला. अमृतामध्ये कलेसाठी अखंड मेहनत करण्याची असलेली वृत्ती पेटमनला जाणवली. तिला वाव मिळाल्यास तिच्या बोटांतून उमटणारी रेषा तिला भविष्यकाळात उत्कृष्ट चित्रकार बनवील, अशीही त्याची खात्री झाली.१९२४ मध्ये काही महिने इटलीतील फ्लॉरेन्स शहरी तिचे वास्तव्य होते मात्र ह्या वास्तव्याचा तिला कलेच्या दृष्टीनेफारसा उपयोग झाला नाही. तथापि १९ एप्रिल १९२९ रोजी ती पॅरिसला आपल्या कुटुंबीयांसह आली आणि १९३४ च्या अखेरीस भारतात परतली. पॅरिसमधल्या ह्या वास्तव्यात तिला आधुनिक चित्रकलेचा सर्वांगीण अभ्यास करता आला. पियानोवादनात अमृताला चांगली गती होती पण पॅरिसमध्ये असतानाच संगीताऐवजी चित्रकलेलाच वाहून घेण्याचा निर्णय तिने घेतला. पॅरिसमध्ये असताना फ्रेंच भाषाही अस्खलितपणे बोलायला आणि लिहायला ती शिकली. त्यामुळे पॅरिसच्या सामाजिक जीवनात ती एकरूप झाली. तिचे मित्रमैत्रिणींचे वर्तुळ तयार झाले. ह्या काळात तिने शेकडो रेखाटने केली. तैलरंगात व्यक्तिचित्रे रंगवली. १९३२ मध्ये तिने केलेले टॉर्सो हे चित्र लक्षवेधक ठरले. एका नग्न स्त्रीच्या पाठीचे हे चित्र आहे (ही स्त्री म्हणजे स्वतः अमृताच). चित्रकलेच्या माध्यमावरील तिचे विलक्षण प्रभुत्व ह्या चित्रातून प्रत्ययास येते. कॉन्व्हर्सेशन (१९३४ पुढे रूढ झालेले नाव यंग गर्ल्स) ह्या तिच्या चित्रकृतीमुळे  ‘ ॲसोशिएट ऑफ द ग्रँड सॅलाँ ’ म्हणून तिची निवड झाली. हा बहुमान प्राप्त होणारी ती सर्वांत तरूण आणि कदाचित पहिली आशियाई व्यक्ती. आकार आणि रंगछटा ह्यांच्या संयोजनाची तीव्र जाणीव तिच्या चित्रांतून प्रकट होत होती. चित्रकर्ती म्हणून तिच्या विकासाच्या ह्या टप्प्यावर फ्रेंच चित्रकार ⇨  अझेअन आंरी पॉल गोगँ आणि ⇨  पॉल सेझान ह्यांचा प्रभाव होता. पुढे मात्र डच चित्रकार ⇨  व्हिन्सेंट व्हान गॉख हा तिचा सर्वांत आवडता चित्रकार ठरला. १९३४ च्या सुमारास तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. ‘ मला माझ्या कलेच्या विकासासाठी भारतात जावयाचे आहे. भारत, तिथली संस्कृती, तेथील लोक, भारतीय साहित्य ह्यांची मला अतिशय ओढ आहे ’ अशा आशयाचे विचार तिने व्यक्त केले होते. यूरोपातील वास्तव्यामुळे भारताचा शोध घेण्याची दृष्टी तिला लाभली आणि आधुनिक चित्रकलेच्या अभ्यासामुळे भारतीय चित्रकला आणि शिल्पकला ह्यांचे आकलन आपल्याला झाले, असे तिचे म्हणणे होते. भारतात परतणे तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते पण तिने तसा निर्धार केला होता. तिच्या आयुष्यातील हा काळ जसा सर्जनाचा, तसाच चिंतनशीलतेचा होता. पॅरिसमधल्या वातावरणाचे आणि विविध चित्रकारांचे संस्कार तिच्यावर झाले, तरी कलावंत म्हणून तिचे स्वतंत्र व्यक्तित्व इतके प्रबल होते, की ती कोणाचेही अनुकरण करणे शक्यच नव्हते. तिने स्वतःची स्वतंत्र चित्रशैली निर्माण केली. पॅरिसमध्ये तिने आपला ठसा उमटविला. पॅरिसमधल्या विख्यात कलाशाळेने आयोजित केलेल्या व्यक्तिचित्रणाच्या आणि स्थिरचित्रणाच्या स्पर्धेमध्ये तिने पहिली पारितोषिके मिळविली.

भारतात परतल्यानंतर अमृताने भारतीय पोषाखाला प्राधान्य दिले. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय तिच्या बदललेल्या दृष्टीचा द्योतक आहे. भारताच्या भूमीवर पाऊल टाकल्यानंतर तिच्या चित्रांमध्ये मोठे परिवर्तन घडून आले. चित्रकर्ती म्हणून आपल्या जीवनातील खऱ्याखुऱ्या कार्याचा तिला साक्षात्कार झाला : चित्रांच्या माध्यमातून भारतीयांच्या- विशेषतः कंगाल भारतीयांच्या-जीवनाचा अर्थ लावणे, टोकाची सहनशीलता आणि शरणता प्रकट करणाऱ्या त्यांच्या मूक प्रतिमा चित्रांकित करणे, त्यांच्या डोळ्यांनी तिच्या मनावर उमटविलेला ठसा चित्रफलकावर साकार करणे, तेही तिच्या स्वतःच्या अशा एका नव्या तंत्राने. भारतात आल्यानंतर अमृतसरमध्ये पहिले काही महिने राहत असताना तिने ग्रूप ऑफ थी गर्ल्स (१९३५) हे चित्र केले. तिच्या चित्रदृष्टीला एक नवा आयाम प्राप्त झाल्याचे ह्या चित्रावरून दिसते. विचारमग्न अवस्थेतल्या तीन भारतीय मुली ह्यात दिसतात. साध्या चित्ररेषा आणि वेधक रंग ही ह्या चित्राची वैशिष्ट्ये.

मुंबईला २० नोव्हेंबर १९३६ रोजी तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरले. मुंबईला तिच्या चित्रांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दक्षिण भारत तसेच अलाहाबाद, दिल्ली, लाहोर अशा ठिकाणांना तिने भेटी दिल्या. अजिंठा आणि वेरूळ येथील कलाकृतींनी ती प्रभावित झाली. १६ जुलै १९३८ रोजी अमृताचा विवाह तिचा जवळचा आप्त व्हिक्टर एगन ह्याच्याशी हंगेरीत बूडापेस्ट येथे झाला. २ जुलै १९३९ रोजी व्हिक्टर आणि अमृता भारतात यावयास निघाले. सिमल्यात राहण्याची त्यांची कल्पना होती पण काही कारणांमुळे-विशेषतः  काही कटू अनुभवांमुळे-वैफल्याखेरीज तिला काही मिळाले नाही. त्यानंतर ती तिच्या पतीसह सप्टेंबर १९४१ मध्ये लाहोरला आली आणि तेथे एका सदनिकेत राहू लागली. लाहोरला १९४१ च्या डिसेंबरात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा तिचा विचार होता. त्या दृष्टीने तिने तयारीही सुरू केली होती तथापि ३० नोव्हेंबर १९४१ रोजी एका पार्टीला जाऊन आल्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली आणि ह्या अचानक उद्‌भवलेल्या आजारातच लाहोर येथे तिचे अकाली निधन झाले.


उपर्युक्त चित्रांखेरीज अमृताच्या विशेष उल्लेखनीय चित्रांत खालील चित्रांचा समावेश होतो : पॅरिस-रिक्लाय्निंगन्यूड (१९३३), व्ह्यूफॉम स्टूडिओ (१९३४), हिल मेन (१९३५), हिल विमेन (१९३५), चाइल्ड वाइफ (१९३६) भारत-फ्रूट व्हँडर्स (१९३७), बाइड्स टॉयलेट (१९३७), बह्मचारीज (१९३७), सिएस्टा (१९३८), एलिफंट्स बेदिंग इन ए गीन पूल (१९३८), व्हिलेज ग्रूप (१९३८), एन्शंट स्टोरीटेलर (१९४०), वुमन ऑन ए चारपॉय (१९४०), कॅमल्स (१९४१) हंगेरी-हंगेरियन मार्केट प्लेस (१९३८), टू गर्ल्स (१९३९). एकुलती एक अशी एक शिल्पाकृतीही तिने घडविली आहे. तिच्या कलाकृतींचा प्रमुख संग्रह ‘ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ’ नवी दिल्ली येथे ठेवण्यात आला आहे. काही चित्रे इंदिरा सुंदरम् ह्या तिच्या बहिणीच्या संग्रही आहेत.

पूर्वीच्या महान कलाकारांच्या कलाकृती आणि श्रेष्ठ आधुनिक कला-कारांच्या कलाकृती ह्यांच्यांतील मूलभूत तत्त्वे एकच आहेत. चांगल्या कलेचा कल हा सुलभीकरणाकडे असतो. तीत आकारांच्या अत्यावश्यक भागांचाच विचार केला जातो आणि पोत व बांधणी यांतून सौंदर्यनिर्मिती साधली जाते. आकारांची नुसती नक्कल करून कला निर्माण होत नाही, तर त्या आकारांचे सुयोग्य अर्थांतर करावे लागते, अशी तिची धारणा होती.

आधुनिक चित्रकलेच्या इतिहासात तिचे आगमन एखादया धूमकेतूसारखे होते. तिच्या चित्रांनी भारतीय चित्रकलेला एक नवी दिशा दिली. विकासाचा एक नवा टप्पा गाठला. भारतीय मातीशी नाते सांगणाऱ्या आणि भारतीय चित्रकलेच्या महान भूतकाळाशी सातत्य राखणाऱ्या एका चित्राभिव्यक्तीची, एका चित्रशैलीची शक्यता तिने आपल्या चित्रांतून दाखवून दिली. कुंठित झालेल्या भारतीय चित्रकलेला एका कोंडमारलेल्या अवस्थेतून तिने मुक्त केले.

अमृताने स्वतःचा संप्रदाय निर्माण केला नाही. अमृतावर यूरोपीय चित्रकारांचा प्रभाव होता पण ती अनुकरणाच्या पाशात अडकली नाही. स्वतंत्र वृत्तीच्या ह्या थोर चित्रकर्तीचा प्रभाव इथल्या चित्रकारांवर पडला. तिच्या मृत्यूनंतर भारतातील तरूण चित्रकारांना तिच्या महानतेची जाणीव झाली. तिच्या चित्रशैलीचे अनुकरणही झाले पण अनुकरणाचा हा टप्पा लवकरच संपला आणि त्यातून काही चांगल्या गोष्टी घडल्या. चित्रातील रंग आणि आकार ह्यांच्या संबंधीच्या अमृताच्या दृष्टीची त्यांना समज येऊ लागली त्यांची चित्रदृष्टी विस्तारली.

संदर्भ : 1. Bartholomew, Richard, “Amrita Sher-Gil–Her Life and Paintings”, Indian and Foreign Review, Vol. 9, No. 14, 1 May, 1972.

2. Fabri, Charles Anand, Mulk Raj, “Amrita Sher-Gil” (Two Essays), Lalit Kala Contemporary, Vol. 2, Bombay, December, 1964.

3. Kapur, Gita Sundaram, Vivan Sheikh, Ghulam Mahammed, Amrita Sher-Gil, Bombay, 1971.

4.  Khandalavala, Karl, The Art of Amrita Sher-Gil, Allahabad, 1943.

5. Miklos, Loconczi, A Few Aspects of the Life of Amrita Sher-Gil Relating to Hungary-The Influence of Hungarian Painting on Her Art, 1974.

6. Singh, N. Iqbal, Amrita Sher-Gil: A Biography, New Delhi, 1984.

7. Vyas, Chintamani, Amrita Sher-Gil, Amritsar, 1982.

8. Watson, Francis, “The Art of Amrita Sher-Gil”, Marg, Vol. I, Bombay, October, 1946.

9. Wojtilla, Gyula, Amrita Sher-Gil and Hungary, New Delhi, 1981.

कुलकर्णी, अ. र. यंदे, विश्वास


'ब्राइड्‌स टॉयलेट' (१९३७) 'हिल विमेन' (१९३५)
'कॅमल्स' (१९४१) 'ग्रूप ऑफ थ्री गर्ल्स' (१९३५)
'ब्रह्मचारीज' (१९३७) 'हिल मेन' (१९३५)