लक्ष्मण, आर्. के. : (२३ ऑक्टोबर १९२४ -). भारतीय कीर्तीचे व्यंगचित्रकार. संपूर्ण नाव राशिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण. त्यांच्या पूर्वजांचे वास्तव्य राशिपुरम किंवा रासीपुर (जि. सेलम) तालुक्यामध्ये होते. लक्ष्मण यांचा जन्म म्हैसूर येथे झाला. म्हैसूरच्या ‘महाराज कॉलेजा’तून ते अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन बी.ए. झाले. कर्नाटकातून मुंबईला आल्यावर  लक्ष्मण यांनी प्रथम फ्री प्रेस जर्नल या दैनिकात व्यंग्यचित्रकार म्हणून नोकरी पतकरली. त्याआधीच ते बंगलोर येथून प्रसिद्ध होणाऱ्या कुरवंजी या कानडी नियतकालिकात व्यंग्यचित्रे काढीत होते. १९४९ पासून ते टाइम्स ऑफ इंडियाचे प्रमुख व्यंग्यचित्रकार आहेत. आपल्या पहिल्या पानावरील राजकीय व्यंग्यचित्राखेरीज लक्ष्मण टाइम्सच्या त्याच पानावर दररोज एक छोटे व्यंग्यचित्र (पॉकेट कार्टून) काढीत असतात. त्याचे शीर्षक आहे ‘यू सेड इट’. टक्कल पडलेला, ब्रशासारख्या मिशा असलेला आणि जाड काचांच्या भिंगांचा चष्मा लावलेला, त्याचप्रमाणे धोतर व रेघारेघांचा चौकडयांचा कोट असा पोशाख घातलेला एक सामान्य माणूस या छोट्या व्यंग्यचित्रांतून वावरत असतो. त्याला ‘लिट्ल मॅन’ असे म्हणण्याची प्रथा आहे. या ‘लिट्ल मॅन’च्या साक्षीने या व्यंग्यचित्रातल्या गोष्टी घडत असतात. मंत्री, पुढारी आणि अन्य प्रकारचे लब्धप्रतिष्ठित यांच्या बिंगांचा स्फोट करणारी यातील बरीच व्यंग्यचित्रे असतात. सामान्य खेडूत आणि त्यांच्या खेड्यांना भेट देऊन उगाच लंब्याचौड्या बाता करणारे पुढारी येथे खूपदा भेटतात. एकंदरीत राजकारणी लोकांचा मठ्ठपणा आणि त्यांचा मग्रूरपणा याचे लक्ष्मण मर्मभेदक चित्रण करतात. पुष्कळदा मुंबईकर नागरिकांचे नाना गोष्टींमुळे जे हाल चाललेले असतात, त्याचेही मर्मस्फोटक चित्रण या व्यंग्यचित्रांत केलेले दिसते. मुंबईच्या रस्त्यांतील खड्डयांवर तर लक्ष्मण यांनी सातत्याने छोटी व्यंग्यचित्रे काढलेली होती. देशातील अगर मुंबईतील जनजीवनातील वेगवेगळ्या विसंगतींवर बोट ठेवणारे पात्र म्हणजे ‘लिट्ल मॅन’ची पत्नी. जरी ही बोलते, तरी कोणत्याही छोटया व्यंग्यचित्रात तो ‘लिट्ल मॅन’ स्वतः तोंड उघडीत नाही.

राजकीय व्यंग्य- व्यक्तिरेखांचे नमुनेलक्ष्मण यांची राजकीय व्यंग्यचित्रेसुद्धा बहारदार असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांत बोचक टीका असते. पूर्वी जवाहरलाल नेहरूंचे ते बोलके व्यंग्यचित्र काढीत असत. तीच गोष्ट भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची. व्यंग्यचित्रा (कार्टून) प्रमाणेच विडंबनचित्र (कॅरिकेचर) हाही लक्ष्मण यांचा हातखंडा आहे. एऱ्हवी त्यांच्या राजकीय व्यंग्यचित्रात ताज्या घटनांवर औपरोधिक भाष्य असते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील विषयांत अमेरिकन राष्ट्राधक्षांचे परकीय राजकारणातील डावपेच, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे वेगवेगळे आव्हानखोर पवित्रे अथवा दक्षिण आफ्रिकेतील सत्ताधाऱ्यांचे बेमुर्वतखोर वांशिक धोरण हे सर्व सातत्याने लक्ष्मण यांच्या कुंचल्याच्या फेकीचे विषय होत असतात. भारतीय राजकारणातील गमतीजमती तर ते नेहमीच आपल्या पहिल्या पानावरील व्यंग्यचित्रांतून आजच्या राजकारणी मंडळींच्या दंभस्फोट करण्यासाठी उपयोगात आणत असतात. इतक्या तल्लखपणे आजच्या सामाजिक व राजकीय जीवनातील विसंगती शोधून काढणारे फार थोडे व्यंग्यचित्रकार या देशात आहेत.

लक्ष्मण हे सुप्रसिद्ध इंग्रजी भाषिक कादंबरीकार आर्.के. नारायणयांचे कनिष्ठ बंधू होत. लक्ष्मण हे स्वतःही उत्तम लेखक आहेत. डूडल्स आणि सॉरी, नो रूम ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके.  यांखेरीज काही लघुकथा व प्रवासवर्णनेही त्यांनी लिहिली. त्यांच्या व्यंग्यचित्रांचे व छोट्या चित्रांचे (पॉकेट कार्टून्स) काही संग्रह प्रसिद्ध आहेत. उदा., यू सेड इट (१९६१, सुधारित आवत्ती, १९६७) व इलोक्वंट ब्रश (१९८९). मध्य प्रदेश : रॅन्डम स्केचीस (१९८६) हा मध्य प्रदेशात त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या स्थळांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या रेखाटनांचा संग्रह आहे. लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रप्रदर्शनात (१९५८) भाग घेणारे ते पहिले भारतीय व्यंग्यचित्रकार होत.

त्यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत : पद्मभूषण (१९७१), मागसायसाय पारितोषिक व नोपेक्स ट्रॉफी (१९८४), कर्नाटक राज्य पारितोषिक (१९८३), मराठवाडा विद्यापीठाची डी.लिट (१९७९), दुर्गा रतन पारितोषिक (१९७४), उत्कृष्ट पत्रकारितेचे बी.जी. हॉर्निमन पारितोषिक (१९६९) इत्यादी.

नाडकर्णी ज्ञानेश्वर

293 - 1293 - 2293 - 3293 - 4चित्र क्रमांक १ ते ५ – नागरी जीवनातील आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय घटना व सद्यस्थिती यांवर खुसखुशीत औपरोधिक भाष्ये करणारी, आर्. के. लक्ष्मण यांची काही व्यंगचित्रे. आर्. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेली दोन व्यक्तिचित्रे