ख्वारनाक किल्ल्याचे बांधकाम : निजामीच्या ‘खमसा’च्या हस्तलिखितातील एक लघुचित्र, सु. १४९४.बिहजाद : (सु. १४५५ – सु. १५३६). एक श्रेष्ठ इराणी चित्रकार. पूर्ण नाव कमालुद्दीन बिहजाद. हेरात (अफगाणिस्तान) येथे जन्म. बालपणीच तो पोरका झाल्याने मीरक नक्काश या चित्रकाराने त्याचा सांभाळ केला. त्याच्याच हाताखाली त्याने चित्रकलेचे धडे घेतले. हेरात येथील सुलतान हुसैन मिर्झाचा प्रधान मीर अली शिर नवाई याच्या पदरी तो चित्रकार म्हणून काही काळ राहिला आणि पुढे शाही ग्रंथालयाच्या सेवकवर्गात त्याचा समावेश झाला. १५१० मध्ये सफाविद वंशाचा मूळ संस्थापक शाह इस्माईलने हेरात काबीज केले व तेथील बिहजाद व अन्य कलावंतांना ताब्रीझ या राजधानीच्या शहरी नेले. येथे बिहजादला राजाश्रय लाभला. १५२२ मध्ये त्याची तेथील शाही ग्रंथालयाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. शाह इस्माईलचा उत्तराधिकारी शाह तहमास्फ याच्या कारकीर्दीत तो ह्या पदावर असावा, असे अनुमान आहे. ताब्रीझ येथेच त्याचे निधन झाले. कासिम अली, मीर सय्यद अली, आका मीरक, मुझफ्फर अली इ. त्याचे शिष्य होत. त्याची स्वतःची चित्रे किती व कोणती आणि त्याच्या शिष्यगणांची कोणती, हे निश्चितपणे ओळखणे अवघड आहे. कारण त्याच्या शिष्यांनी त्याच्या शैलीचे कसोशीने अनुकरण केले. चित्रांवर स्वाक्षरी करणारा तो बहुदा पहिलाच इस्लामी कलावंत असावा तथापि त्याच्या स्वाक्षऱ्या असलेली चित्रेही मोजकीच आहेत. १४८६ ते १४९५ मधील बत्तीस चित्रेच निश्चितपणे त्याची आहेत. सादीच्या बोस्तानसाठी त्याने काढलेली पाच लघुचित्रे (१४८८) ही त्याच्या शैलीची उत्तम निदर्शक आहेत. ती कैरोच्या ’ईजिप्शियन नॅशनल लायब्ररी’ मध्ये आहेत. निजामीच्या खमसाची दोन हस्तलिखिते ’ब्रिटिश म्युझियम’ मध्ये असून, त्यात बिहजादची अठरा लघुचित्रे आहेत. 

बिहजादची ⇨लघुचित्रण-शैली व कलाशिक्षक या नात्याने त्याने केलेली कामगिरी या दोहोंचाही उत्तरकालीन इस्लामी कलेवर मोठा प्रभाव पडला. पंधराव्या शतकात अखेरच्या दोन दशकांमध्ये हेरात येथे जो चित्रसंप्रदाय विकसित झाला, त्याचा तो प्रवर्तक मानला जातो. तत्कालीन इराणी लघुचित्रणाच्या प्रवाहामध्ये परंपरेने दृढमूल झालेले जे संकेत होते, ते त्याने स्वीकारले. तथापि त्याचे चित्र-संयोजनाचे उत्कृष्ट कौशल्य, रंगांच्या अनोन्यसंबंधांचे नेमके व सूक्ष्म भान, रंग-रेषांद्वारे जिवंत व नाट्यपूर्ण व्यक्ती-समूह-चित्रण करण्याची हातोटी, व्यक्तिचित्रण व त्याची पार्श्वभूमी यांचे सुसंवादी संतुलन या त्याच्या शैलीच्या वैशिष्ट्यांनी त्याने प्रवाहाला वेगळे वळण दिले. पशूंच्या आणि मानवी देहांच्या नैसर्गिक हालचालींनी नटलेली त्याची चित्रे केवळ ग्रंथांतर्गत संदर्भचित्रे न राहता त्यांना स्वायत्त कलाकृतींचे मूल्य लाभते. चित्रविषयांची विविधता व त्यांची विषयांनुरूप खुलवट, हीही त्याची वैशिष्ट्ये होत. इराणी चित्रकलेमध्ये त्याने वास्तवता आणून नवचैतन्य निर्माण केले. अशा रीतीने त्याने लघुचित्रणाला जी नवी दिशा दिली, तिचा प्रभाव उत्तरकालीन इराण, तुर्कस्तान व भारत येथील चित्रकारांवर दिसतो.

संदर्भ : 1. Gray, Basil, Persian Painting, London, 1961. 

            2. Martin, F. R. The Miniature Painting and Painters of Persia, India and Turkey from the 8th Century, 2 Vols., 1912.

 

इनामदार, श्री. दे.