रविवर्मा : ( २९ एप्रिल १८४८–  २ ऑक्टोबर १९०६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म केरळ राज्यातील किलीमानूरच्या ( त्रिवेंद्रमपासून सु. ४५ किमी.) राजप्रासादात-मातृगृही झाला. त्यांची आई उमांबा ही राजघराण्यातील असून ती नृत्यनिपुण कलावती होती आणि वडील श्रीकांतन भट्टथिरीपाद हे संस्कृत पंडित होते. अशा रीतीने त्यांना आईकडून कलेचा व वडिलांकडून संस्कृत साहित्याचा वारसा लाभला. त्यांचा विवाह १८६६ मध्ये पुरोकृतथ्थी नाल या राजकन्येशी झाला. भूतपूर्व त्रावणकोर संस्थानच्या राजघराण्याशी त्यांचा निकटचा नातेसंबंध होता. अशा रीतीने जन्म,  विवाह व नातेसंबंध यांद्वारे राजा रविवर्मा यांना राजघराण्याचे वलय लाभले होते. लहानपणापासूनच त्यांचा चित्रकलेकडे विलक्षण ओढा होता. त्यांना कलेचे प्राथमिक धडे व प्रोत्साहन त्यांचे काका राजा राजवर्मा यांनी दिले. त्यांनी रविवर्मांना वयाच्या चौदाव्या वर्षी त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आणले. त्या काळात भारतातील अनेक संस्थानिक पाश्चा त्त्य चित्रकारांना पाचारण करून,  त्यांच्याकडून आपली व्यक्त्तिचित्रे रंगवून घेत असत. इंग्रज चित्रकार थीओडोर जेन्सन यांना १८६८ मध्ये त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आमंत्रित केले होते. जेन्सन व राजदरबारचे चित्रकार रामस्वामी नायडू या दोघांचाही रविवर्मा यांच्यावर प्रभाव पडला. थीओडोर जेन्सन यांनी हाताळलेले तैलरंग हे माध्यम त्या काळी भारतीय कलापरंपरेला नवीनच होते. तरुण रविवर्मांच्या पुढे या माध्यमामुळे एक नवीन विश्वच उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी हे माध्यम आत्मसात करून,  त्यात विलक्षण प्रभुत्व संपादन केले.

  रविवर्मा यांनी ज्या काळात चित्रे काढायला सुरुवात केली,  त्यावेळी भारतातील मोगल,  राजपूत इ. कलाशैलींना उतरती कळा लागली होती. वेगवेगळ्या कलाशैलींचा संकर असलेली कला दिल्ली,  लखनौ,  पाटणा,  तंजावर येथे उगम पावत होती. रविवर्मा यांनी आपल्या कलाजीवनाच्या सुरुवातीच्या काळात तंजावर शैलीत चित्रे रंगविली.

   रविवर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चा त्त्य कलेतील वास्तववादी तंत्र व तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यांतील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगविले. या त्यांच्या तजेलदार व अभिनव आविष्कारमुळे त्यांना भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्य जनक मानले जाते. पाश्चा त्त्य चित्रतंत्रातील यथादर्शनाच्या साहाय्याने निर्माण होणारा,  वातावरणाचा त्रिमितीय आभास त्यांनी आपल्या चित्रांतून परिणामकारकतेने दाखविला. त्यांच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने लक्ष्मी,  सरस्वती,  कृष्ण,  शिव-पार्वती,  दत्तात्रेय,  रामपंचायतन इ. पौराणिक देवदेवता  तसेच कृष्णशिष्टाई,  विश्वामित्र-मेनका,  शकुंतला-पत्रलेखन,  हरिश्चं द्र-तारामती,  नल-दमयंती,  रावण-जटायू,  मोहिनी-रुक्मांगद,  श्रीकृष्ण-बलराम यांसारख्या रामायण,  महाभारतादी महाकाव्यांच्या कथानकांतील पौराणिक व्यक्त्ती व घटना यांवर आधारित असत. विशेषतः लक्ष्मी,  सरस्वती,  शिव-पार्वती,  रामपंचायतन,  विश्वामित्र-मेनका,  कृष्णशिष्टाई इ. चित्रे त्या काळी घराघरांतून दर्शनी भागांत लावलेली दिसत. राजेरजवाड्यांच्या व संस्थानिकांच्या महालांत अडवून पडलेली चित्रकला,  त्यांनी जनसामान्यांपर्यंत आणून पोहोचवली,  असे म्हटले जाते. या चित्रांच्या असंख्य प्रती भारतभर व परदेशांतही फार लोकप्रिय झाल्या. रविवर्मा यांच्यावरील संस्कृत व मल्याळम्‌ काव्यांचे संस्कार त्यांच्या चित्रांतून उमटलेले दिसतात. चित्रांत वापरलेली प्रतीके त्याची साक्ष देतात. चित्रांतील देवतांची आणि अन्य स्त्रियांची वस्त्रे महाराष्ट्रीय नऊवारी लुगड्याच्या पद्धतीची रंगविलेली आहेत,  हे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. रविवर्मांच्या मते नऊवारी साडीत स्त्रीच्या सुडौल देहाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यांची मूळ तैलरंगातील चित्रे मोठ्या आकाराची असत. तसेच चित्ररचनेच्या बाबतीत ते अत्यंत दक्ष असल्याचे जाणवते. चित्र रंगविताना प्रमुख विषयास महत्त्व देण्याच्या दृष्टिकोणातून त्यांनी छाया-प्रकाशाचा नाट्यपूर्ण वापर केला,  तसेच मुख्य विषयाच्या मांडणीस पोषक असेच सूक्ष्म तपशील चित्रात भरले. चित्रातील व्यक्त्तींचे प्रसंगानुरूप आविर्भाव,  चेहऱ्यावरील यथोचित भावदर्शन व शरीररचनाशास्त्राची जाण ही वैशिष्ट्ये त्यांच्या चित्रांतून ठळकपणे जाणवतात.

  परंतु त्यांनी पाश्चा त्त्य शैलीबरोबरच वास्तववादी दृष्टीकोनाचाही अंगीकार केल्याने,  भारतीय कलापरंपरेचा ओघ खंडित झाला आणि त्यांच्या चित्रांतील अभिनव आविष्काराची भारतीय विचारप्रणालीशी फारकत झाली,  असाही एक आक्षेपघे तला जातो. भारतीय विचारधारा व त्याचे कलेत उमटलेले प्रतिबिंब यांत असणारी एकात्मताच इथे लोप पावली की काय,  असे वाटते. अजिंठ्याच्या गुहेत चित्रित झालेल्या जातककथा,  यक्ष-किन्नरादी घटकांचे पारंपरिक चित्रण अलौकिक भासावे असे म्हणजे आदर्श कोटीतील आहे. ते येथे नाहीसे होऊन देवादिकांनी राजे,  राण्या,  दासदासी यांसारखी मानवी रूपे घेतलेली आढळतात. भारतीय लघुचित्रशैलीत कृष्ण या व्यक्तिरेखेभोवती उत्कट शृंगार व भक्त्तिरस यांचा परिपोष करणारी अनेक चित्रे निर्माण झाली  पणशृं गारिक चित्रांतही कृष्णभक्ती हा गाभा कायम राहिला. रविवर्मा यांच्या चित्रांबाबत असे घडले नाही. इथे आशयापेक्षा विषयाचा तपशील महत्त्वाचा ठरला. हा परिणाम पाश्चा त्त्य कलाशैलीच्या प्रभावातून आलेला दिसतो.

  परिणामी,  रविवर्मा यांच्या कलेच्या मूल्यमापनाबाबत ज्येष्ठ समीक्षकांनीही अत्यंत परस्परविरोधी मते मांडली आहेत,  व्हिन्सेंट स्मिथ यांनी या विरोधाभासाचा उल्लेख केला आहे.‘हिंदुस्थानात ही धार्मिक व महाकाव्यांवरील चित्रे,  अत्यंत उच्च दर्जाची व भारतीय भावनेचे उचित चित्रण करणारी समजली जातात’.  तर नेमक्या याच मताला हॅवेल यांचा विरोध आहे. त्यांच्या मते, ‘कल्पक’  असे भारतीय काव्य व त्यातील रूपके चित्रित करताना त्यातील काव्यात्मक बाजूच उणी पडली आहे. कुमारस्वामी यांचेही मत सामान्यपणे हेच आहे. ते म्हणतात, ‘रविवर्मांच्या चित्रात भारतीयत्वाचा,  भारतीय विचारधारेचा अभाव आहे’.

  परंतु हे निर्विवाद की,  रविवर्मा यांच्या कलेला जशी राजदरबारी प्रतिष्ठा मिळाली  तसाच जनसामान्यांकडूनही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हैसूर आणि बडोदा या संस्थानांसाठी त्यांनी बरीच चित्रे काढली. बडोद्याचे दिवाण सर माधवराव यांच्या सल्ल्यावरून त्यांनी लोणावळ्यानजीक मळवली येथे तैलचित्र ( ओलिओग्राफीक) छापखाना स्थापन केला आणि चित्रांच्या असंख्य प्रतिकृती तयार केल्या. पाश्चा त्त्य तंत्रात चितारलेल्या व भारतीय वातावरण असलेल्या या चित्रांची विलक्षण मोहिनी तत्कालीन समाजावर होती. अमाप लोकप्रियतेबरोबरच त्यांना व्यावसायिक यशही मिळाले. रविवर्मांच्या या प्रतिकृती म्हणजे सध्याच्या कॅलेंडरची पूर्वपीठीका होय.

  मद्रास येथे भरलेल्या प्रदर्शनात ( १८७३) त्यांच्या शकुंतलापत्रलेखन ( शकुंतलेचे दुष्यंत राजाला प्रेमपत्र) या चित्राला प्रथम पारितोषिक,  गव्हर्नरच्या सुवर्णपदकाच्या रूपात,  मिळाले. तेव्हापासून त्यांची कीर्तिशिखराकडे वाटचाल सुरू झाली. मद्रासचे गव्हर्नर बकिंगहॅमचे ड्यूक यांनी त्यांना बरीच कामे मिळवून दिली. १८७५ मध्ये त्रिवेंद्रमला प्रिन्स ऑफ वेल्स आले असता रविवर्मांची चित्रे राजेसाहेबांनी त्यांना भेट म्हणून दिली. १८८० साली पुणे येथे आणि १८९२ मध्ये व्हिएन्ना व शिकागो येथील प्रदर्शनांत त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली व त्यांना आंतरराष्ट्रीय मानमान्यता मिळाली. कलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मांना मिळालेली मान्यता तसेच त्यांची प्रतिभा व कार्य बघून सातवे एडवर्ड यांनी त्यांना‘कैसर-इ-हिंद’  हे सुवर्णपदक देऊन गौरव केला ( १९०४). त्यांनी काही व्यक्त्तिचित्रे व लोकजीवनावर आधारित प्रायिक चित्रेही काढली आहेत. त्यांनी केलेले डॉ. दादाभाई नवरोजी यांचे व्यक्त्तिचित्र प्रसिद्ध आहे. त्रावणकोरच्या अल्पवयीन राजपुत्राचे पालकत्व त्यांच्याकडे आले असता,  ते न पत्करता त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत निष्ठेने चित्रे रंगविली. किलीमानूर  येथे त्यांचे निधन झाले. रणजित देसाई यांनी त्यांच्या जीवनावर राजा रविवर्मा ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे ( १९८४).

  राजा रविवर्मा यांची चित्रे‘लक्ष्मीविलास पॅलेस’,  बडोदा ‘उदयपूर पॅलेस’ ‘सालारजंग म्युझियम’,  हैदराबाद ‘श्री चित्रालयम’,  त्रावणकोर ‘चित्रशाळा’,  म्हैसूर ‘नॅशनल म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’,  नवी दिल्ली इ. संग्रहालयांतून जतन केली आहेत. ( पहा :  चित्रपत्र १६  यांखेरीज अधिक चित्रांसाठी पहा :  मराठी विश्वकोश,  खंड ७,  चित्रपत्र ४३  खंड ९,  चित्रपत्र ५१).

  संदर्भ :  ललित कला अकादे मी,  समकालीन भारतीय कला सीरीज,  चैतन्य,  कृष्ण,  अनु. कपूर,  गौरीशंकर,  रविवर्मा,  नवी दिल्ली,  १९८५

 खडपेकर,  साधना

मत्स्यगंधेशी आपल्या पित्याचा-शंतनूचा-विवाह व्हावा, म्हणून राजपदाचा त्याग करणारा भीष्म.कीचकाच्या महालाकडे निघालेली चिंताव्यथित द्रौपदीराजा रविवर्मा-तैलचित्र-चित्रकार आनंद बोंद्रे, पुणे.शकुंतलेचे पत्रलेखनकंसवध करून आपल्या मातापित्यांना बंधमुक्त करणारे कृष्ण-बलराम.विविध प्रादेशिक वेशभूषा व वाद्यवैशिष्ट्ये दर्शविणारी भारतीय लावण्यवतींची संगीत मैफल.