मगध : प्राचीन भारतातील इतिहासप्रसिद्ध प्रदेश. या प्रदेशाच्या भूसीमा वेळोवेळी बदलत गेल्या असल्या, तरी विद्यमान बिहार राज्यातील नालंदा, औरंगाबाद, हाजीपूर, बिहारशरीफ, गया, पाटणा, ससराम या जिल्ह्यांतील भूभाग या प्रदेशात सामान्यपणे अंतर्भूत होता असे म्हणता येईल.

मगध नावाच्या व्युत्पत्तीविषयी वि. का. राजवाडे यांनी ‘मगान् दधाति इति मगधः’ (मग लोकांना धारण करणारा देश) असे म्हटले असून ‘मग’ म्हणजे शाकद्वीपातील (मध्य आशिया) ब्राह्मण होत. ते ज्या देशात येऊन राहिले तो मगध देश.

मगधचा उल्लेख कधी भौगोलिक प्रदेश म्हणून, तर कधी साम्राज्य म्हणून, तर कधी एक महाजनपद म्हणून प्राचीन संस्कृत व पाली वाङ्मयात, विशेषतः वैदिक वाङ्मय, रामायण, महाभारत, बौद्ध साहित्य व पुराणे यांत येतो. तसेच मीग्यॅस्थिनीझ, फाहियान, ह्यूएनत्संग यांसारख्या प्रवाशांच्या प्रवासवर्णनांतून आढळतो. अंगुत्तर निकायातील निर्देशानुसार बुद्धाच्या वेळी जी सोळा महाजनपदे होती,त्यांपैकी मगध हे एक होय. ऋग्वेदात मगधाचा उल्लेख ‘कीकट देश’ या नावाने केला आहे पण अथर्ववेदात मगध असाच स्पष्ट उल्लेख आढळतो पण तो काहीसा अवहेलनात्मक आहे. त्यावरून वैदिक आर्यांच्या प्रभावाबाहेर हा प्रदेश असावा, असे वाटते. बौद्ध साहित्याच्या सर्वांगीण अभ्यासानंतर टॉमस विल्यम रीस डेव्हिड्झ (१८४३-१९२२) या प्रख्यात प्राच्यविद्या पंडितांनी मगधाच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : पूर्वेस अंग देश, पश्चिमेस शोण नदी, उत्तरेस गंगा आणि दक्षिणेस छोटा नागपूरचे पठार. जैन ग्रंथांतही मगधाचा पवित्र जनपद म्हणून उल्लेख आहे. जैन तत्त्वज्ञान व आचार धर्म यांचे पालन मगधात चांगल्या प्रकारे होत असल्याचा उल्लेख निशीथसूत्रात मिळतो. वैदिक वाङ्मयात पूर्व दिशेस व्रात्यांचे प्रियधाम म्हटले आहे. त्यांचा वेदप्रामाण्यास व पशुहिंसेला विरोध होता. जैन तीर्थकरांपैकी वीस तीर्थकरांचे निर्वाण मगधातच झाले. या भागात यती, बौद्ध इ. वैदिकेतर पंथ व धर्म अधिक प्रभावी होते. त्यामुळे मगध ही व्रात्यांची पुण्यभूमी आणि वैदिक ब्राह्मणांची पापभूमी अशी कल्पना रूढ झाली. ‘मग’ शब्दाचा अर्थही दोष अथवा पाप असाच शब्दकल्पद्रुमात आढळतो.

मगधचा प्राचीन इतिहास आख्यायिकांतून आणि पौराणिक कथांतून आढळून येतो. पुराणांनुसार जन्हू कुळातील गय या राजाने गया नावाचे राज्य स्थापन केले. त्यालाच पुढे मगध राज्य म्हणण्यात येऊ लागले. पौराणिक राजांमध्ये बृहद्रथ, जरासंध इ. महत्त्वाकांक्षी राजे झाले. श्रीकृष्णाच्या मुत्सद्दीपणामुळे पांडवांपैकी भीमाकडून मल्लयुद्धात जरासंधाचा वध करण्यात आला. विद्वानांच्या मते या घराण्यातील रिपुंजय हा बार्हद्रथ वंशातील अखेरचा राजा होता. भट्टिक नावाच्या एका सामंताने त्याच्याविरूद्ध बंड करून त्याला मारले आणि आपला मुलगा बिंबिसार (इ.स.पू. ५८२-५५४) याला मगधाच्या गादीवर बसविले, असे महावंस ग्रंथात म्हटले आहे. शिशुनाग वंशातील या पराक्रमी राजाने मगध राज्याची प्रतिष्ठा व सामर्थ्य यांत भर घातली. बिंबिसाराच्या कारकीर्दीविषयी भिन्न मतांतरे आहेत. त्यानेच मगध राज्याची स्थापना केली आणि तो हर्यंक कुलातील होता, असे बुद्धचरितात म्हटले आहे. बिबिंसाराला अनेक पुत्र होते. त्यांपैकी अजातशत्रू (कार.इ.स. पु. ५५४-५२७) मगधाच्या गादीवर आला. पितृहत्या करून अजातशत्रूने राज्यारोहण केले. असा एक प्रवाह बौद्ध साहित्यात सांगितला आहे आणि त्या पापाची उपरती होऊन तो बुद्धानुयायी झाला. बुद्धाच्या अवशेषांवर त्याने स्तूप बांधला व बौद्ध भिक्षूंची पहिली संगिनी (परिषद) राजगृह (राजगीर) येथे भरविली. शिशुनाग क्षत्रिय हे व्रात्य होते व ते वैदिक कर्मकांडांपासून अलिप्त राहिले. त्यामुळे याच कुळातील पार्श्वनाथाने चातुर्याम धर्माची स्थापना केली. त्याला मगध, अंग व वाज्जिसंघ या जनपदांत बहुसंख्य अनुयायी लाभले. साहजिकच मगधचे प्राचीन वैदिक रूढींचे खंडण करणारे व नव्या आचार-विचारांचे प्रवर्तन करणारे प्रमुख केंद्र म्हणून महत्त्व वाढले. बौद्ध ग्रंथांत अजित केशकंबली, गोशाल मस्करिन, पूर्ण काश्यप इ. विचारवंतांचा उल्लेख येतो. हे सर्वजण वैदिक विचारांविरूद्ध होते आणि त्यांची कर्मभूमी मगधच होती. या काळातच मगधात भाषेच्या क्षेत्रात क्रांती झाली. बुद्ध, महावीर यांनी संस्कृतऐवजी पाली-मागधी या प्राकृत लोकभाषांचा स्वीकार केला.

अजातशत्रूला उदायिन या त्याच्या मुलाने ठार मारून मगधची गादी बळकाविली. त्याने पाटलिपुत्र (पाटणा) वसविले व राजधानी तेथे हलविली. काही विद्वानांच्या मते अजातशत्रूच्या सुनिधी व वस्सकार या दोन मत्र्यांनी वैशालीच्या वज्जींपासून संरक्षण व्हावे, म्हणून पाटलिपुत्र हे शहर वसविले. उदायिनचा अंत कारस्थानांतूनच झाला. त्यानंतर ⇨नंद वंशाची (इ.स.पू. ३६४–३२४) अधिसत्ता मगधावर आली. नंद राजे शूद्र कुळातील होते. त्या वंशातील महापद्म नंद याने अनेक प्रदेश पादाक्रांत करून मगधाचे साम्राज्यात रूपांतर केले. अलेक्झांडर द ग्रेट (इ.स.पू. ३५६–३२३) याने मगध साम्राज्याच्या विशाल सेनेविषयी आपल्या हेरांकडून माहिती ऐकली होती. म्हणून त्याने इ.स.पू. ३२६ च्या फेब्रुवारीत हिंदुस्थानातून परत जाण्याचा निर्णय घेतला. नंद वंशाच्या कारकीर्दीत मगधमध्ये नवीन वजनमापे सुरू करण्यात आली, असा उल्लेख अष्टाध्यायीवरील काशिका टीकेत आढळतो. नंद राजांचा जैन धर्माला आश्रय होता. नंद साम्राज्याची हद्द उत्तरेस बनारसपासून मोंघीर आणि दक्षिणेला सिंगभूमपर्यंत पसरली होती. इ.स.पु. ३२४ च्या सुमारास चाणक्याच्या साहाय्याने चंद्रगुप्त मौर्याने नंदराजाला पदच्यूत करून मगधाची गादी बळकाविली.

मौर्यवंशातील ⇨चंद्रगुप्त मौर्य (कार.इ.स.पू. ?–३००) व सम्राट अशोक (कार.इ.स.पू. २६९–२३२) यांनी मगध साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद पाटलिपुत्र येथे भरविली अनेक विहार व स्तूप बांधले [⟶ अशोक–२]. अशोकानंतर मौर्य वंशात दुबले राजे आले व ग्रीकांची मगधावर आक्रमणे झाली. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग (कार.इ.स.पू. १८७–१५१) याने या संधीचा फायदा घेऊन बृहद्रथाचा खून केला आणि शुंग घराण्याची सत्ता मगधावर आली. त्याने संकोच पावलेल्या मौर्य साम्राज्याची सत्ता पंजाबात जलंदर व शाकल (सियालकोट) पर्यंत वाढविली. त्याने वैदिक धर्माचे आणि संस्कृत विद्येचे पुनरूज्जीवन केले आणि अश्वमेध यज्ञ केला तथापि भारहूत आणि सांची येथील तत्कालीन स्तूपांवरून व तोरणांवरील शिल्पांकनांवरून शुंगांच्या काळी (इ.स.पू. १८७–७५) बौद्ध धर्म भरभराटीत असावा, असे दिसते. शुंगांनंतर येथे काही काळ कण्व राजांनी राज्य केले पण मगधाला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आले ते गुप्तवंशाच्या अमदानीतच. ⇨गुप्तकालात (इ.स. ३००–५५५) पहिला चंद्रगुप्त (कार.३२०–३३५), समुद्रगुप्त (कार. ३३५–३७६), दुसरा चंद्रगुप्त (कार.३७६–४१३). पहिला कुमारगुप्त (कार.४१३–४५५) असे एकापाठोपाठ पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजे झाले. त्यांनी मगधचे राज्य वाढविले आणि पाटलिपुत्र ही त्यांची राजधानी प्रसिद्धीस आली.


गुप्त राजे वैदिक धर्माचे–भागवत पंथाचे–अनुयायी होते तरी त्यांचा बौद्ध व जैन धर्मांना विरोध नव्हता. त्यांच्या अनेक मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी बौद्ध संघास देणग्या दिल्याचे उल्लेख मिळतात. सुप्रसिद्ध बौद्धतत्त्वज्ञ वसुबंधू याला समुद्रगुप्ताचा आश्रय होता. गुप्त साम्राज्याबद्दल फाहियान या चिनी प्रवाशानेही प्रशंसोदगार काढले आहेत. इ.स. पाचव्या-सहाव्या शतकांत गुप्त साम्राज्यावर हूणांनी आक्रमणे केली. पुढे उज्जैनच्या यशोधर्म्याने मिहिरकुल या हूण राजाचा पाडाव करून सत्ता आपल्या हाती घेतली (५३०). यानंतर गुप्त राजांचे नाव फारसे आढळत नाही. मगधचा पुढील इतिहास अनागोंदीने भरलेला आहे. इ. स. आठव्या शतकात ⇨पाल वंशाने हा प्रदेश जिंकला. पाल राजे बौद्ध धर्मी होते. त्यांच्या चार शतकांच्या कारकीर्दीत बोधगया, नालंदा, आदंतपुरी आणि विक्रमशिला येथे बौद्ध विद्यापीठे भरभराटीस आली. ११९७ मध्ये मगध बख्तिआर खल्जीने पालांकडून घेतले. काही वर्षे दिल्लीच्या गुलाम घराण्याची सत्ता मगधावर होती. नंतर तुघलकांनी ताब्यात घेतलेला बिहार चौदाव्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानांनी जिंकला. त्या वेळी येथे इस्लामचा प्रसार झाला. पुढे मोगल काळात (१५२६–१८५६) मगध त्यांच्या सुभेदारांच्या सत्तेखाली व पुढे ब्रिटिश अंमलाखाली आला.या प्रदेशात झालेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणांत तसेच विविध उत्खननांत अनेक अवशेष उपलब्ध झाले.

त्यांपैकी बोधगयेचे महाबोधी मंदिर, गयेचे विष्णुपद मंदिर, पावापुरीचे संगमरवरी दगडातील जैन मंदिर, नालंदा विद्यापीठाचे अवशेष आणि कुर्कीहार येथील स्तूपअवशेष व तारा, अवलोकितेश्वर, लोकनाथ, वागीश्वर, विष्णू, शिवपार्वती, सूर्य आणि बलराम यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. कबदल येथील बुद्धाची पाषाण मूर्ती भव्य व लक्षणीय आहे. राजगीर येथे शांतिस्तूप, गरम पाण्याचे झरे, मणियार मठ आणि वेणुवन इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांशिवाय गया जिल्ह्यात बराबर पर्वतरांगात अशोककालीन गुहा असून औरंगाबाद जिल्ह्यातील केऑन, उमगा, देव या स्थळी अनुक्रमे शैव, वैष्णव मूर्ती असून देव येथील पंधराव्या शतकात बांधलेले सूर्यमंदिर प्रसिद्ध आहे. येथील शिल्पावशेष पाटणा व गया येथील पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयांत ठेवण्यात आले आहेत. पाटण्याचे के. पी. जयस्वाल वस्तुसंग्रहालय यासाठी प्रसिद्ध आहे. बोधगयेला जपान, तिबेट, चीन, आदी देशांना विसाव्या शतकात बांधलेले स्तूप असून एक पुरातत्त्वीय संग्रहालय आहे तसेच दिल्लीच्या मुस्लिम अंमलाखाली बांधलेल्या इंडो-इराणी वास्तूंचे नमुने ससराम, मोंघीर व शेरगढ येथे आढळतात. मगध ही गौतम बुद्ध, वर्धमान महावीर. चैतन्य महाप्रभू यांसारख्या थोर धर्मसंस्थापकांची कर्मभूमी असून रामकृष्ण परमहंस यांसारख्या आधुनिक तपस्व्याची ती जन्मभूमी होय.

पहाः गया पाटणा बिहार राज्य बोधगया.

संदर्भ : 1. Chatterjee, Srichandra, Magadha, Architecture and Culture, Calcutta, 1942.

            2. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1973.

            3. Samaddar, J. N. Glories of Magadha, Patna, 1969.

देशपांडे, सु. र.