मक्चारी : (हिं.मक्चारी, मख्या बाजरा पंजाबी मक्चारी इ. टेओसिंटे लॅ. यूक्लीना मेक्सिकाना कुल-ग्रॅमिनी). हे एक हिरव्या चाऱ्याचे पीक आहे. मूलस्थान मध्य अमेरिका. १८८१ मध्ये भारतात प्रथम आणले गेले. चाऱ्याचे पीक म्हणून सध्या भारतात पुष्कळ भागात व विशेषतः पंजाब व आसाम या राज्यांत लागवडीत आहे. ज्या महिन्यात हिरवा चारा नसतो त्या वेळी हिरव्या चाऱ्यासाठी उपयुक्त आहे.
या वर्षायू ( जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणाऱ्या) वनस्पतीचे मक्याच्या वनस्पतीशी पुष्कळ साधर्म्य आहे. ही वनस्पती १.८ ते ३.६ मी. पर्यंत उंच वाढते. पाने गुळगुळीत, ९० सेंमी. लांब व ५-७.५ सेंमी. रुंद असतात. याला मुळापाशी पुष्कळ फुटवे निघत असल्यामुळे मक्यापेक्षा या पिकाचे चाऱ्याचे उत्पादन जास्त असते. मक्याप्रमाणे या वनस्पतीची फुले एकलिंगी असतात. मक्याबरोबर या वनस्पतीचा संकर होऊ शकतो.
जमीन नांगरून व कुळवून, हेक्टरी २०-२५ टन शेणखत घालून तयार करतात. पेरणी मार्च-एप्रिलपासून जुलै-ऑगस्टपर्यंत करतात. हेक्टरी ३७ ते ४० किग्रॅ. (महाराष्ट्रात सु. १७ किग्रॅ.) बी पाभरीने ४५ सेंमी. अंतरावरील ओळीत पेरतात अथवा मुठीने फेकतात.
या पिकाला मक्यापेक्षा जास्त पाणी लागते. पिकाच्या हंगामात ४-५ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात.
पेरणीपासून सु. ३ ते ३ १/२ महिन्यांनी पहिली कापणी करता येते व त्यानंतर ६ ते ७ आठवड्यांनी कापणी करतात. मार्चमध्ये पेरलेल्या पिकाच्या जूनपर्यंत दोन कापण्या होतात व जुलैमध्ये पेरलेल्या पिकाची फक्त एकच कापणी ऑक्टोबरमध्ये करतात.
पाणी देण्याची सोय असलेल्या व भारी जमिनीत हेक्टरी १८ ते ४५ टन आणि केवळ पावसाच्या पाण्यावर १७ ते २२.५ टन हिरवा चारा मिळतो. त्याचा मुरघासही करता येतो. मका अथवा ज्वारीच्या चाऱ्यापेक्षा मक्चारीचा चारा हलक्या प्रतीचा असतो परंतु जनावरे तो आवडीने खातात.
बियांसाठी जुलैमध्ये पेरणी करून नोव्हेंबरमध्ये मक्याप्रमाणे कणसे काढून मळणी करतात. हेक्टरी १,२०० ते १,५०० किग्रॅ. बी मिळते.
या पिकाला रोग अगर किडींचा सहसा उपद्रव होत नाही.
संदर्भ : Narayanan, T. R.: Dabadghao, P.M. Forage Crops of India, New Delhi, 1972.
चव्हाण, ई. गो.
“