मकालू : जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर.याची उंची ८,४८१ मी. असून हे नेपाळ हिमालयाच्या ईशान्य भागात नेपाळ-तिबेट सरहद्दीवर आहे. येथे मकालू-१ (८,४८१ मी.) व मकालू-२ (७,६६० मी.) अशी दोन शिखरे आहेत. एव्हरेस्टपासून आग्नेयीस २३ किमी. अंतरावर एकाकी असलेल्या या शिखरावर तीव्र व हिमाच्छादित उतारांमुळे १९५४ पर्यंत कोणीही जाऊ शकले नव्हते. मात्र एव्हरेस्टवर जाणाऱ्यांनी लांबूनच हे शिखर पाहून त्याचा अभ्यास केला होता. १९५४ नंतर मात्र तीन गिर्यारोहक तुकड्यांनी मकालूवर जाण्याचे प्रयत्न केले त्यांपैकी पहिली तुकडी अमेरिकन होती. १९५४ मध्ये कॅलिफोर्नियाच्या सिएरा क्लबने विल्यम सिरीच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली ही तुकडी शिखरावर ७,०७० मी. पर्यंतच जाऊ शकली. या तुकडीने शिखराच्या दक्षिणेकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु हा भाग फारच विलक्षण व हिमालयातील एव्हरेस्टपेक्षाही अति-तीव्र उताराचा असलेला आढळला. पूर्व पाहणीशिवाय शिखरावर जाणे अशक्य असल्याचे त्यावेळी आढळून आले होते.
सर एडमंड हिलरीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडची एक तुकडी मकालूच्या व या भागातील कमी उंचीच्या शिखरांच्या समन्वेषणासाठी निघाली. परंतु तुकडीतील एक गिर्यारोहक बर्फाच्या खोल दरीत कोसळला. त्याला मदत करण्याच्या प्रयत्नात बरगडीची दोन हाडे मोडून हिलरीचे स्वतः जखमी झाला. मे १९६१ मध्ये दुसऱ्या एका गिर्यारोहण तुकडीचे नेतृत्व करीत असताना हिलरीला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्याला काठमांडूला परत पाठविण्यात आले.
मकालूवरील तिसरी मोहीम फ्रेचांनी काढली व तीच यशस्वी ठरली. झां फ्रांग्कोच्या नेतृत्वाखालील या तुकडीने १९५४ साली शरद ऋतूत या शिखराची प्राथमिक पाहणी केली. मे १९५५ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष मकालूवर चढाई करण्यास सुरूवात केली आणि या मोहिमेत त्यांनी यश मिळविले. झां कौझी व लिओनेल तेरे यांनी प्रथम १५ मे १९५५ रोजी या शिखरावर पाय ठेवले. नंतर १६ मे रोजी झां फ्रांग्को, गायडो मॅगनोन व ग्यालझेन, तर १७ मे रोजी झां बूव्हीअर, सर्ज कौपे, प्येर लरू व आंद्रे व्ह्यालाते हे गिर्यारोहक मकालूवर पोहोचले. या तुकडीतील सर्वच्या सर्व गिर्यारोहकांनी हे शिखर सर करून एक उच्चांकच प्रस्थापित केला. या शिखरावरूनच एअर इंडियाच्या एका बोईंग ७०७ विमानाला ‘मकालू’ असे नाव देण्यात आले.
चौधरी, वसंत