हिमाद्रिशीर्षविवर : (माथाभेग, बर्गश्रुंड) . हिमनदीमधील किंवा जमिनीवरच्या हिमराशींमधील जवळजवळ उदग्र (उभ्या दिशेतील) भेगेला हिमविवर म्हणतात आणि अतिशय रुंद व खोल अशा हिम-विवराच्या प्रकाराला हिमाद्रिशीर्षविवर म्हणतात. हिम व बर्फ जेव्हा खडकाच्या पृष्ठभागापासून अलग होते, तेव्हा हिमाद्रिशीर्षविवर तयार होते. उदा., पर्वतावरील हिमनदीच्या शीर्षालगत (माथ्यालगत) हिमाद्रिशीर्षविवर किंवा त्यांची मालिका पुष्कळदा आढळते. हिमनदी खालील दिशेत सरकण्यास किंवा तिच्या निर्मितिस्थानापासून अलग होण्यास सुरुवात होते, तेव्हा हिमाद्रिशीर्षविवर तयार होते. हे अतिशय रुंद व खोल म्हणजे बऱ्याचदा हिमनदीच्या तळापर्यंत गेलेले असते व त्याची खोली १०० मी. पर्यंत असू शकते. झिजेद्वारे तयार होणारे खडकांचे तुकडे अशा विदरात पडतात व हिमामध्ये गोठून जातात. यांच्यामुळे हिमनदीची पृष्ठभाग घासण्याची व झिजविण्याची क्षमता वाढते. याची हिमगव्हर निर्माण होण्यास मदत होते. अशा प्रकारे हिमनदीच्या तळाशी खडकांची झीज होऊन रंगमंडळाच्या (अँफिथिएटरच्या) आकाराची नैसर्गिक द्रोणी तयार होते.

 

हिमगव्हराच्या माथ्यालगतचे हिमकण क्षेत्र उन्हाळ्यात उघड होते. तेथे हिमनदीचा माथा हिमवर्षणयुक्त भित्तींपासून व त्यांना चिकटलेल्या संचयित हिमबर्फापासून दूर ओढला जातो. हिमाद्रिशीर्षविवराच्या मोठ्या भेगेऐवजी बऱ्याच वेळा लहान विवरे निर्माण होण्याची क्रिया घडते.

 

उन्हे असतानाच्या उबदार हवामानात हिमनदीच्या पृष्ठभागाचे रूप अनेक लहान कुंडे व ओहोळ यांच्यामुळे पालटून जाते. यांतून निर्माण होणारे जलप्रवाह बहुतेक वेळा हिमाद्रिशीर्षविवरात पडतात. हिमबर्फ वितळणे व ⇨ कुंभगर्त निर्मितीची क्रिया यांच्या एकत्रित परिणामामुळे भेगेतील बर्फात कटाह (कढईच्या आकाराचे खड्डे) खोदले जातात. कुंभगर्तनिर्मिती क्रियेला विवरातील वाळू व दगडगोटे यांची खोदण्यास मदत होते. यातून निर्माण होणारा पाण्याचा प्रवाह तेथील बर्फातील बोगद्यातून हिमनदीच्या तुंडाकडे (मुस्कटाकडे) जातो.

 

पर्वताच्या वरच्या भागातून येणाऱ्याहिमलोटांतील हिमाने हिवाळ्यात पुष्कळदा हिमाद्रिशीर्षविवर भरून जाते. नंतरच्या उन्हाळ्यातहिम वितळल्याने ते उघडे होते. असे उघडे झालेले हिमाद्रिशीर्षविवर हा गिर्यारोहकांपुढील गंभीर अडथळा ठरू शकतो. उदा., मौंट एव्हरेस्ट शिखराकडे साऊथ कोल या मार्गाने जाताना ल्होत्से फेसच्या (दर्शनी भागाच्या) तळाशी खोल हिमाद्रिशीर्षविवर लागते. त्याच्यामुळे कँप खख कँप खखख पासून (दुसरा तळ तिसऱ्या तळापासून) अलग झालेला आहे.

 

पहा : हिमविदर हिमानी क्रिया.

 

ठाकूर, अ. ना.