मंडन मिश्र : (सातवे शतक). प्रसिद्ध भारतीय मीमांसक आणि दार्शनिक पंडित. मंडनमिश्र हे कुमारिल भट्ट आणि आद्य शंकराचार्य यांचे समकालीन होते. आनंदगिरींचा शंकरविजय (प्रकरणे ५६-६२) व विद्यारण्यांचा शंकरदिग्विजय (सर्ग ८ वा) यांत मडंनमिश्र आणि शंकराचार्य यांच्यामध्ये झालेल्या वादासंबंधाने आणि मंडनमिश्रांच्या चरित्रासंबंधाने आख्यायिका सांगितलेल्या आहेत. मंडनमिश्र हे माहिष्मती येथे राहणारे मैथिल पंडित. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात महिषी नावाचे गाव आहे. ते पूर्वीचे माहिष्मती होय, असे काही अभ्यासकांचे मत आहे, तर काहींच्या मते मध्य प्रदेशातील महेश्वर हे माहिष्मती होय. कुमारिल भट्टांची बहिण (मूळ नाव अंबा किंवा उंबा पण विदुषी म्हणून भारती हे रूढ नाव) ही मंडनमिश्रांची पत्नी होती, असे आनंदगिरीनी म्हटले आहे. तैत्तिरीयोपनिषद्भाष्यवार्तिक आणि बृहदारण्यकोपनिषद्भाष्यवार्तिक या ग्रंथांचे कर्ते आणि शृंगेरी पीठावर शंकराचार्य म्हणून अधिष्ठित झालेले सुरेश्वराचार्य हेच मंडनमिश्र होत, असा एक समज आहे. पण दोघांच्याही ग्रंथांतील अंतर्गत पुराव्यांचा विचार करता तो निराधार ठरतो. पूर्वमीमांसा दर्शनावर मंडनमिश्रांचे तीन ग्रंथ आहेत : (१) विधिविवेक, (२) भावनाविवेक आणि (३) मीमांसामाष्यानुक्रमणिका. विधिविवेकात वेदवाक्याच्या क्रियापदातील विध्यर्थवाचक प्रत्ययाच्या अर्थाची चिकित्सा केली आहे. धात्वर्थविरहित प्रत्ययाचे मुख्य प्रतिपाद्य जी आर्थी भावना, तिचे स्वरूप आणि मर्यादा यांचे विवेचन भावनाविवेकात केले आहे. मीमांसाभाष्यानुक्रमणिका या ग्रंथात पूर्वमीमांसा दर्शनाच्या बारा अध्यायांतील अधिकरणांची पूर्वोत्तरपक्षांच्या निर्देशांसह सूची दिली आहे. स्फोटसिद्धि हा त्यांचा ग्रंथ भाषेच्या तत्त्वज्ञानासंबंधी आहे. भ्रम अथवा ⇨ख्यातिवाद याच्या चार प्रकारांचे विवरण विभ्रमविवेक या ज्ञानप्रक्रियेची चर्चा करणाऱ्या ग्रंथात केले असून त्यात मीमांसकांच्या भाट्ट मतातील विपरीतख्यातीचे समर्थन केले आहे. ब्रहासिद्धि हा त्यांचा ग्रंथ अद्वैत वेदान्ताचे प्रतिपादन करणारा आहे.

मंडनमिश्र हे मोठे मीमांसापंडित होते. मीमांसेतील भाट्ट मताचा त्यांना हिरिरीने पुरस्कार केला आहे. त्याचबरोबर उपनिषदांतील अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करीत असता, तितक्याच धैर्याने कुमारिलांच्या मताचा विरोध केला आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा यांचा समन्वय साधणारी भूमिका हे मंडनमिश्रांचे वैशिष्ट्य होय. पूर्वमीमांसेतील प्रमाणविचार त्यांनी स्वीकारला आहे. प्रत्यक्ष प्रमाणाच्या तत्त्वावबोधापेक्षा शब्दप्रमाणाचा तत्त्वावबोध श्रेष्ठ आहे. निर्गुण ब्रह्मसाक्षात्कार हे मानवाचे अंतिम ध्येय असल्याचे उपनिषदांनी प्रतिपादिले आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या कर्मांचा पूर्ण संन्यास करावयास पाहिजे, असे शंकराचार्यांचे ठाम मत आहे परंतु या मताच्या प्रभावाने दिपून न जाता शंकरपूर्व अद्वैतमताचा पाठपुरावा करून कर्म आणि उपासना यांच्या आश्रयाने औपनिषद सत्याच्या ज्ञानाच्या चिंतनाने मोक्षप्राप्ती होते, असे मंडनमिश्रांनी प्रतिपादिले आहे. न्याय, व्याकरण आणि मीमांसा यांतील सिद्धांतांचा योग्य प्रकारे उपयोग करून मंडनमिश्रांनी आपले अद्वैत वेदान्तविषयक मत सिद्ध केले आहे. हे त्यांचे कार्य इतके प्रभावी आहे, की अद्वैत मताचा निर्देश करताना अनेक ग्रंथकारांनी मंडनमिश्रांची एतद्विषयक वचने उदधृत केली आहेत. वाचस्पतिमिश्रांच्या भामतीतील प्रतिपादनात मंडनमिश्रांच्या विचारांचे प्रतिबिंब स्पष्टपणे जाणवते.

पहा : केवलाद्वैतवाद पूर्वमीमांसा शंकराचार्य.

संदर्भ : Janaki, S. S. Ed. M. M. Prof. Kuppuswami Sastri Birth Centenary Commemoration Volume, Part I, Madras, 1981.

काशीकर, चिं. ग.