मंडला : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३७,५३८ (१९८१). हे रस्त्याने जबलपूरच्या आग्नेयीस सु. १०० किमी. आणि नैनपूर प्रस्थानकापासून ईशान्येस ३६ किमी. नर्मदा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. याचे प्राचीन नाव ’माहिष्मती’ आहे. शहराच्या तीन बाजू नर्मदा नदीने वेढलेल्या असून नदीवर सुंदर घाट व मंदिरे आहेत. शहराच्या जवळच नदीने सु. १६ किमी. लांबीचे व १ किमी. रूंदीचे खोल असे सरोवर तयार केले आहे. येथील मंडला किल्ला तीन बाजूंनी नर्मदा नदीने आणि चौथ्या बाजूने खोल कालव्याने वेढलेला आहे. मंडला दाट जंगलमय प्रदेशात वसलेले असल्यामुळे त्याच्या परिसरात गवा, सांबर, चितळ, मृग यांचे कळप तसेच वाघ, बिबळ्या इ. प्राणीही आढळतात. १६७० मध्ये मंडला ही गढा-मंडलाच्या गोंड राज्याची राजधानी होती. गोंडांनीच येथील किल्ला व राजवाड्याची बांधणी केली. गोंडांच्या सत्तेनंतर येथे मराठ्यांची व त्यानंतर ब्रिटिशांची सत्ता आली. मराठ्यांच्या कारकीर्दीत शहराच्या ज्या बाजूस नदी नाही, त्या बाजूस संरक्षणार्थ भिंत बांधण्यात आली. शहरात कृषिउत्पादनाचा व्यापार चालतो. लाकूड कापण्याच्या गिरण्या, तागाच्या वस्तू व काश्याची भांडी यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. १९२६ मध्ये शहरांच्या बऱ्याचशा भागाचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते. शहरात आरोग्यविषयक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून सागर विद्यापीठाशी संलग्न असलेली दोन महाविद्यालये व एक खाजगी संस्कृत पाठशाळा आहे.

चौधरी, वसंत