बिसाऊ : पश्चिम आफ्रिकेतील गिनी बिसाऊची राजधानी आणि प्रमुख बंदर. लोकसंख्या १,०९,४८६ (१९७९). हे सेनेगलची राजधानी डाकारच्या आग्नेयीस ४०० किमी. अंतरावर गेब नदीमुखखाडीवर वसलेले आहे. जलवाहतुकीचे केंद्र असलेल्या या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे. पोर्तुगीजांनी गुलामांच्या व्यापाराचे केंद्र म्हणून १६८७ मध्ये हे वसविले. १८६९ मध्ये हे बंदर सर्वांना खुले करण्यात आले. १९४२ मध्ये बोलामा येथील पोर्तुगीज गीनीची राजधानी या शहरी हलविण्यात आली. तेव्हापासून त्याच्या विकासास अधिकच चालना मिळाली. येथून माडाचे तेल, नारळ, कातडी, लाकूड इत्यादींची निर्यात होते. शहरात नारळ, भात यांवरील प्रक्रियाउद्योगांचा विकास झालेला आहे. पोर्तुगीज वास्तुशैलीच्या निदर्शक अशा जुन्या इमारती शहरात आहेत. येथे एक विद्यापीठ आणि काही संशोधनसंस्था आहेत.

गाडे, ना. स.