सिंहनाद मुंजश्री : तिबेटी ब्राँझमूर्ती.

मंजुश्री : एका बोधिसत्त्वाचे नाव. हा सदोदित ‘कुमारभूत’ (म्हणजे सुंदर शोभा असलेला) असल्याचे वर्णन आढळते. ह्या नावाचा एक बोधिसत्त्वप्रकारही असून मंजुवर, धर्मधातुवागीश्वर, वज्रराग, मंजुवज्र, मंजुकुमार, मंजुनाथ, मंजुघोष इ. त्याची विविध नामेही आढळतात. बंगाल, नेपाळ, तिबेट, चीन, जपान, जावा वगैरे प्रदेशांत शिल्पकारांच्या कल्पनेप्रमाणे तयार केलेल्या त्याच्या विविध प्रतिमा उपासनेत आढळतात. त्याच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ग्रंथ असल्याचेही आढळून येते. खड्ग हे अज्ञानखंडनाचे आणि ग्रंथ हे अतिशायी ज्ञानाचे वा शहाणपणाचे (विजडम) प्रतीक मानले जाते. अक्षोभ्य ध्यानी बुद्धापासून त्याचा जन्म झाल्याचे आणि यमारी ही त्याची शक्ती असल्याचेही निर्देश आढळतात. अनेक तिबेटी ग्रंथांतून आरंभीच ह्याला वंदन केलेले असते. सद्धर्मपुंडरीकसूत्रात ह्याने असंख्य लोकांना उपदेश करून समुद्रातीलअसंख्य प्राण्यांनाही मार्ग दाखविला, त्यांच्या आपापल्या कुवतीप्रमाणे त्यांची धार्मिक ध्येये प्राप्त करून दिली आणि समुद्रातही सद्धर्मपुंडरीक सूत्राचेच वाचन केले, असे म्हटले आहे.

साधनामाला ह्या वज्रयान पंथाच्या तंत्रपर ग्रंथात मंजुश्री विषयी बरीच माहिती आलेली आहे तसेच त्याची ३९ साधने व ४० ध्याने ही वर्णिली आहेत. तिबेटीमधील बौद्ध तंत्रात मंजुश्रीला अनन्यसाधारण महत्त्व असून अनेक तंत्रांनाही त्याची नावे आहेत. तिबेटी साधनेतील मंडलांच्या मध्यभागी मंजुश्रीची प्रतिष्ठापना केलेली असते. मंजुश्रीच्या उपासनेने धर्मग्रंथांचे ज्ञान, धारणा व वक्तृत्वशक्तीचा लाभ होतो, अशी समजूत आहे. मंजुश्रीचा प्राचीनतम उल्लेख इ. स. चवथ्या शतकात चिनी भोषत भाषांतरित झालेल्या सुखावतीव्यूह ग्रंथात आढळतो. अश्वघोष, नागार्जुन आणि आर्यदेव ह्या बोद्ध पंडितांनी मंजुश्रीचा उल्लेख केलेला आढळत नाही तथापि सुखावतीव्यूहाच्या चिनी भाषांतरानंतर मात्र बौद्ध साहित्यात त्याचे अनेक उल्लेख आढळतात. स्वयंभूपुराणात त्याची एक चिनी साधुपुरूष म्हणून कथा आली असून तीत त्याला इ. स. तिसऱ्या शतकातील एक बौद्ध स्थापत्यविशारद व पूज्य पुरूष म्हणून ऐतिहासिक व्यक्ती मानल्याचे दिसते.

पहा : बौद्ध देवता. 

संदर्भ :1. Getty, Alic Trans. The Gods of Northern Buddhism, Tokyo, 1962.

          २. भट्टाचार्य, बिनयतोष, संपा. साधनमाला, 2 खंड, बडोदे, १९६८.                                                                                                                                                                                             

 

बापट, पु. वि.