भोपाळ: भारताच्या मध्य प्रदेश राज्याची राजधानी व इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या ६,७२,३२९ (१९८१). हे शहर इंदूरच्या ईशान्येस सु. १७५ किमी., सस.पासून सु. ६२५ मी. उंचीवर एका वालुकाश्माच्या कटकावर ‘पुलपुख्ता’ (छोटा तलाव) व ‘भोपालताल’ (मोठा तलाव) या तलावांच्या काठी वसले आहे. मुंबई–दिल्ली या मध्यरेल्वेच्या प्रमुख लोहमार्गावरील भोपाळ हे महत्त्वाचे प्रस्थानक असून येथून एक फाटा प. रेल्वेच्या नागद्याकडे जातो. याशिवाय ते राष्ट्रीय महामार्ग क्र. १२ वरील प्रमुख ठिकाण आहे. येथे वेरागढ नावाचा विमानतळही आहे.

अकराच्या शतकात धारचा परमारवंशीय राजा भोज याने या प्रदेशात एक किल्ला तसेच परिसरातील सरोवरांचे पाणी टिकून रहावे म्हणून एक बंधाराही बांधला. त्याला ‘भोजपाल’ किंवा ‘भोजाचा बंधारा’ असे म्हणत. पुढे या सरोवरासाठी शहर वसविले गेले व त्याचेच भोपाल अथवा भोपाळ असे नाव झाले. या शहराला सांप्रत ‘भूपाल’ असेही म्हटले जाते. भोज राजानंतर अनेक परमारवंशीय राजांनी या प्रदेशावर राज्य केले. परमार वंशाच्या पतनानंतर (१३०५) दिल्लीच्या तख्तावरील मुलसमान सत्तांनी माळव्यावर आपला अंमल बसविला. भोपाळपासून ४८ किमी.वरील रायसेन येथील किल्ल्यातून मोगलांनी भोपाळवर आपले प्रशासन जारी ठेवले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही काळ मराठ्यांचा प्रभाव वाढला. अठराव्या शतकाच्या सुरवातीस अफगाणिस्तानातून माळव्यात आलेल्या दोस्त मुहम्मद खानाने सीतामऊच्या राजाच्या पदरी नोकरी धरली. हळूहळू त्याने स्वतःचा असा फौजफाटा जमवून बेरासिया, भिलसा (सांप्रतचे विदिशा), गिन्नौरगढ व आसमंतीय प्रदेशावर ताबा मिळविला. १७२२ च्या सुमारास खानाने भोपाळ ही या सबंध क्षेत्राची राजधानी म्हणून घोषित केली त्या शहरात १७२८ मध्ये खानाने फतेगढ किल्ला बांधला आणि तो भोजराजाच्या जुन्या किल्ल्याशी एक भिंत बांधून जोडला. ही भिंत म्हणजे भोपाळ शहराभोवती बांधलेली मोठी तटबंदीच होती. दोस्त मुहम्मदाच्या वंशजांनी सु. २०० वर्षांपर्यंत भोपाळवर राज्य केले. ब्रिटिश अंमलात हे दुसऱ्या क्रमांकाचे मुसलमानी मांडलिक राज्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भोपाळ संस्थान हेही भारतीय गणराज्याचा एक भाग बनून त्याचे शासन केंद्र सरकारच्या हाती गेले [⟶ भोपाळ संस्थान]. १९५६च्या राज्य पुनर्रचनेनंतर पूर्वी मध्य प्रदेशात असलेला विदर्भाचा भाग महाराष्ट्र राज्याकडे (तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्याकडे), तर विंध्य प्रदेश, मध्य भारत व भोपाळ हे भाग मध्य प्रदेश राज्यात अंतर्भूत झाले. महाकोसल (महाकोशल) व छत्तीसगढ हे हिस्सेही मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आले. त्याच वेळी भोपाळ ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी बनविण्यात आली. भारतातील अनेक राज्यांच्या राजधान्यांप्रमाणे भोपाळही राज्याच्या काहीसे एका कोपऱ्यात आहे. छत्तीसगडसारख्या प्रदेशाला राजधानी सु. ९०० किमी. दूर पडते.

भोपाळ व आसमंतीय परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरातील शाहजहाँ बेगमने बांधलेली ताज-उल-मस्जिद (भारतातील सर्वांत मोठी मशीद), कुदसिया बेगमने बांधलेली जामा मशीद (१८३७), त्याचप्रमाणे सिकंदरा बेगम हिने उभारलेली मोती मशीद सदर मंजिल, सूफी मंजिल, मिंटो हॉल तसेच दोस्त मुहम्मदाची कबर इ. वास्तू सुविख्यात आहेत. फतेगढ किल्ल्यामध्ये सध्या धान्याचे कोठार असून जुन्या नऊ तोफा आहेत.

औद्योगिकीकरणामुळे भारतातील अनेक शहरांचे जुने व नवे असे दोन भाग बनलेले असून भोपाळही या प्रक्रियेस अपवाद राहिलेले नाही. जुन्या भोपाळमध्ये लहानलहान बोळ व गल्ल्या, जुन्या ढाच्याची मुसलमानी हॉटेले, जरीकाम असलेल्या सुंदर व शोभिवंत पिशव्यांची दुकाने, नक्षीकाम केलेले कपडे व पडदानशीन स्त्रिया, ही वैशिष्ट्ये हमखास आढळतात. नवीन भोपाळ यांपासून एकदम निराळे व स्वतंत्र असल्याचे दिसते. त्यामध्ये नवीन धर्तीच्या व आधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त अशा विविध इमारती उभारण्यात आल्या आहेत व उभारल्या जात आहेत. नवीन भोपाळचा केंद्रबिंदू ‘तात्या टोपे नगर’ असून याच भागात राज्य शासनाचे सचिवालय, विधानसभाभवन तसेच मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. तात्या टोपे नगर चंदीगढसारखे आधुनिक पद्धतीवर उभारण्यात आले आहे. याच भागात महाराष्ट्र मंडळ आहे.

भोपाळमध्येच केंद्र सरकारचा सरकारी क्षेत्रातील अवजड विद्युत सामग्री निर्मितिउद्योग (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड–भेल) हा प्रचंड कारखाना आहे. येथील ‘हेवी इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड’ हा कारखाना १९७४च्या प्रारंभी भेल कारखान्यात विलीन करण्यात आला. या कारखान्यात रोहित्र, मंडल खंडक (सर्किट ब्रेकर), स्विच गिअर, कर्षण मोटरी, अवजड विद्युत् सामग्री व उपकरणे, विद्युत् मोटरी इत्यादींचे उत्पादन होत असते. ह्या कारखान्याचा व्याप २५.८ चौ. किमी. मध्ये पसरलेला असून त्यात दहा हजारांवर कर्मचारी गुंतलेले आहेत. शहरामधील इतर प्रमुख उद्योगधंद्यांत सूत गिरण्या, पीठ गिरण्या, कापड विणकाम व रंगकाम, आगकाड्या, लाख, क्रीडावस्तू यांच्या निर्मितिउद्योगांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे जडजवाहीर व गुटका – विड्याच्या पानातून खाण्याचे केशर, चुना इत्यादींचे मिश्रण-यांच्या उत्पादनाबाबत भोपाळ प्रसिद्ध आहे.

शहरात नगरपालिका (स्था. १९०३) असून अनेक रुग्णालये, एक संगीत अकादमी, भोपाळ विश्वविद्यालय (स्था. १९७० – २७ महाविद्यालये संलग्न) अशा वैद्यकीय-शैक्षणिक सुविधा आहेत. भोपाळ शहराच्या परिसरातील मानवाभान, शिवमंदिर, श्यामला हिल (श्यामलगिरी), धरमपुरी, भदभदा व शहदकराड या पर्वतीय कपारींमध्ये प्रगैतिहासिक गुहाचित्रे विद्यमान आहेत. येथे लक्ष्मीनारायणगिरीवर बिर्ला मंदिर व बिर्ला संग्रहालय, धरमपुरी टेकडीवर मानवसंग्रहालय, श्यामलगिरीवर भारत भवन कलासंग्रहालय आणि बाणागंगा मार्गावर राज्य पुरातत्त्व संग्रहालय आहे. ह्या संग्रहालयांत प्रागैतिहासिक, परमारकालीन व आधुनिक कलाकृतींचा दर्शनीय संग्रह आहे.

भोपाळपासून जवळच असलेल्या ‘श्यामला’ व ‘ईदगाह’ या दोन डोंगरांवरून रात्रीच्या वेळी शहर झगमगत्या प्रकाशदीपांमुळे आणि सरोवरातील पाण्यामुळे परीनगरीप्रमाणे भासते.

भोपाळमध्ये १९६७ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते.

गद्रे. वि. रा.