भोज, दुसरा शिलाहार : (कार. सु. ११७५ – १२१२ ?). महाराष्ट्रातील शिलाहार या मध्ययुगीन वंशातील कोल्हापूर शाखेतील शेवटचा शूर राजा. त्याच्या जन्ममृत्यूंच्या सनांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. विजयादित्य राजाच्या रत्ना या राणीपासून झालेला मुलगा दुसरा भोज या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. तो पित्याच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या शिलाहारांच्या गादीवर आला (११७५). त्याच्या सुरुवातीच्या लेखांत ‘महामंडलेश्वर’ अशी मांडलिकपदनिदर्शक पदवी आढळते. पुढे त्याच्या पराक्रमामुळे त्यास ‘वीरभोज’ असे नाव प्राप्त झाले आणि त्याने आपले स्वातंत्र्यही उद्‌घोषित केले होते. त्याचा आश्रित सोमेश्वर (सोमदेव) मुनी याने लिहिलेल्या जैनेंद्रव्याकरणावरील शब्दार्णवचन्द्रिका या टीकात्मक ग्रंथात भोज राजाचा राजाधिराज, परमभट्टारक, पश्चिमचक्रवर्ती, परमेश्वर अशा सम्राटपददर्शक पदव्यांनी उल्लेख केलेला आढळतो. त्याच्या कारकीर्दीत कोल्हापूर, वळवडे व पन्हाळा यांचा ऋतुमानानुसार राजधान्या म्हणून उपयोग केला जात असावा कारण त्यांचा ११७९ ते १२॰५ पर्यंतच्या शिलालेखांत उल्लेख आढळतो.

भोज राजाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले, तेव्हा चालुक्य (कल्याणी) साम्राज्य मोडकळीस आले होते आणि देवगिरीच्या यादवांची सत्ता दृढ होत होती. यादव राजा ⇨सिंघण (कार. १२००-१२४६) यास भोज राजाचे स्वातंत्र्य मान्य होणे शक्य नव्हते. त्याने भोज राजावर चढाई केली. खिद्रापूरजवळ कृष्णवेणी आणि कुवेणी या नद्यांच्या संगमाजवळ भोज आणि सिंघण यांच्यात धनधोर युद्ध झाले. या युद्धात बन्नेस हा भोजाचा सेनापती मोठ्या शौर्याने लढत असता धारातीर्थी पडल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. सिंघणने पुढे प्रणालक किल्ल्याला (पन्हाळगड) वेढा धालून तो काबीज केला व भोज राजास तेथेच बंदिवासात ठेवले आणि कोल्हापूरच्या शिलाहारांचे राज्य खालसा केले. भोजाचे पुढे काय झाले, याविषयी माहिती उपलब्ध नाही.

भोज राजास गंडरादित्य नावाचा एक मुलगा होता, असे कशेळी ताम्रपटावरून ज्ञात होते परंतु त्याची अधिक माहिती मिळू शकत नाही. भोजानंतर शिलाहार राजांचे लेख आढळत नाहीत. त्यांवरून शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेचा भोज हाच शेवटचा पराक्रमी राजा असावा, हे निश्चित.

भोजाच्या कारकीर्दीतील अनेक शिलालेख सापडले असून त्यांवरून त्याचे कर्तृत्व, दातृत्व, शौर्य, नीतिनैपुण्य आदींसंबंधी माहिती मिळते. त्याने विद्या व कला यांना उदार आश्रय दिला होता. हिंदू आणि जैन मंदिरांनाही देणग्या दिल्याचा निर्देश त्याच्या शिलालेखांत आढळतो. आपल्या पूर्वजांप्रमाणे हा वैदिक व पौराणिक धर्माचा अनुयायी होता. ताम्रपटांत तो आपणास कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मीचा वरप्रसाद प्राप्त झाल्याचे सांगतो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या त्रिकाल नैवैद्याच्या व्यवस्थेसाठी कोप्परवाड या गावाची जमीन इ. स. ११९० मध्ये इनाम दिल्याचा उल्लेख आहे. त्याने विद्वान ब्राह्मणांच्या भोजनाकरिता भूमिदाने केली होती. त्याचा जैन धर्मासही आश्रय असावा. त्याच्या दुर्दैवी पराजयामुळे खिद्रापूरचे कोप्पेश्वरनामक अत्यंत सुंदर शिवमंदिर अपूर्ण राहिले आहे.

पहा : सिलाहार घराणे.

संदर्भ : १. अळतेकर, अ. स. शिलाहारांचा इतिहास, मुंबई, १९३५.

२. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४.

शेख, रुक्साना