भुलेश्वर : महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. येथील मंदिर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून पूर्वेस सु. ४३ किमी. वर असलेल्या यवत गावाच्या नैर्ऋत्येस सु. पाच किमी. अंतरावर असून ते सस. पासून २१३ मी. उंच अशा एका टेकडीवर बांधलेले आहे. या टेकडीकडे यवतकडून बैलगाडीच्या रस्त्याने, तसेच दक्षिणेकडील माळशिरस या गावाकडूनही पायवाटेने जाता येते. भुलेश्वर या महादेवाच्या नावामुळे या टेकडीस भुलेश्वर टेकाड म्हणतात. पंचक्रोशीतील ग्रामीण लोकांत यवतेश्वर डोंगर असाही याचा उल्लेख केला जातो.

मराठी अंमलामध्ये मराठे व मुसलमान यांनी स्वरक्षणार्थ या टेकडीचा उपयोग किल्ल्यासारखा केल्याचे काही उल्लेख मिळतात. शिवपूर्व काळात या ठिकाणाला गढीचे स्वरूप येऊन तिला दौलतमंगळ हे नाव मिळाले होते. इ. स. १६४२-४३ मध्ये तेथे विजापूरच्या आदिलशाहीतील एक मुत्सद्दी सुभेदार या नात्याने रहात होता. पेशवाईच्या आरंभकाळात पहिला बाजीराव व छत्रपती शाहू आणि काही मराठे सरदार यांचे गुरू ब्रह्मोंद्रस्वामी धावडशीकर यांच्याकडे या देवस्थानाची वहिवाट होती. मंदिरासमोरचा नगारखाना आणि बाजूचा बुरूज त्यांनीच उभारला. तसेच भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक लाख, समाधीस बसण्याच्या जागेसाठी पाचशे आणि माळशिरस व यवत येथील विहिरीसाठी चौऱ्याहत्तर हजार रुपये स्वामीनी खर्च केले. टेकाडावर मूळ भुलेश्वर मंदिराव्यतिरिक्त फार थोड्या वास्तू आहेत.

भुलेश्वराचे मूळ मंदिर एका भव्य प्रकारात चौथऱ्यावर तारकाकृती विधानात बांधले असून प्रकाराला दक्षिण व पूर्वेकडून दोन द्वारे आहेत. मूळ मंदिर पूर्वाभिमुख असून ते नागर वास्तूशैलीतील भूमिज या उपवास्तूशैलीत बांधले आहे. मंदिर वास्तूत नेहमी आढळणारे गर्भगृह, अंतराल, सभामंडप आणि नंदिमंडप (सभामंडपापासून थोडा पुढे) असे चार भाग आहेत. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतर बांधलेले असावे. मंदिराच्या समोरच्या बाजूस दक्षिणेकडे नगारखाना आहे. प्रकाराच्या आतील बाजूंस ओवरीयुक्त सोपे (अंकणे) असून त्यांच्या पानपट्टीवर (आर्किट्रेव्ह) शिल्पे आहेत आणि अधूनमधून देवकुलिकाही आढळतात. त्यांतूनही मूर्ती बसविल्या आहेत. मंदिरातील काही मूर्ती फोडलेल्या आढळतात. गर्भगृह चौरस असून अंतरालातून तीन पायऱ्या उतरून आत खाली गेले म्हणजे गर्भगृह लागते. त्यात शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या भिंतीच्या आतील पृष्ठभागावर नक्षीकाम नाही. अंतराल म्हणजे सभामंडप व गर्भगृह यांत एक अरुंद जोडमार्ग असून द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. त्यात द्वारपाल, कीर्तिमुख, मकर आदी मूर्ती आढळतात. उंबरठ्यावर दोन्ही बाजूंस कीर्तिमुखे आहेत. सभामंडपात कक्षासने (अर्ध भिंती) असून त्यांवर बाहेरच्या बाजूने (मागील बाजूस) शिल्पे आहेत. सभामंडपाचे स्तंभ फारसे अलंकृत नाहीत मात्र त्यांची स्तंभशीर्षे नागशीर्षक किंवा कीचक पद्धतीची आहेत. मंदिराच्या मंडोवरावर तिन्ही बाजूंनी मूर्तिकाम असूनही दक्षिण, उत्तर व पश्चिमेकडील प्रमुख मध्यकोनाड्यांत मूर्ती नाहीत. स्वतंत्र नंदिमंडपातील नंदिची मूळ मूर्ती सुस्थितीत आहे.

मंदिराच्या पीठावर गज, अश्व, नर असा कोणताही सांकेतिक थर नाही परंतु हंस, लतावेल, मकर, कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात. मूर्तिसंभारात मातृका मूर्तीचे प्रमाण अधिक असून नारसिंहीव्यतिरिक्त ब्राम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे. त्याखालोखाल नृत्यांगना, मृदुंगवादक, दर्पणधारी इ. सुरसुंदरीच्या मूर्ती असून कक्षासनाच्या मागील बाजूस रामायण-महाभारतांतील घटनांचे कथात्मक शिल्पांकन आहे. याशिवाय प्राण्यांच्या शिल्पांकनात हत्ती, सिंह, माकडे, घोडे यांबरोबरच उंटाच्या प्रतिमा आहेत.

एकूण शिल्पसंभारातील काही प्रतिमा विलक्षण चित्तवेधक असून लक्षणीय आहेत. त्यांना छायाप्रकाशामुळे उठाव आला आहे. बहुतेक मातृका मूर्ती पर्यंकासनात भद्रपीठावर खोदलेल्या आहेत आणि त्यांची आयुधे व काहींची वाहने स्पष्ट दर्शविलेली आहेत. कथानकातील द्रौपदी स्वयंवर, अर्जुनाचा मत्स्यभेद आदी प्रसंग तसेच पश्चिमेकडील भिंतीवर असलेले तीन स्वतंत्र धडांचे परंतु कमर एक असलेले दोन पायांचे एक चमत्कृतिपूर्ण पुरुष-शिल्प सुरेख आहे. सुरसुंदरींमधील उत्तरेकडील भिंतीवरील दर्पणधारीचे उत्थित शिल्प मनोवेधक असून ते भग्न झाले असले, तरी अवशिष्ट भागावरून त्याचा सुरेख ढंग दृग्गोचर होतो. डाव्या हातात गोल आरसा घेतलेली ही सुरसुंदरी त्रिभंगात उभी आहे. ती आरशात सौंदर्य पाहून उजव्या हाताने आपले केस व्यवस्थित करीत आहे. तिचे उत्तान पुष्ट स्तन, विशाल नितंब आणि रेखीव हनुवटी, नाक व डोळे तिच्या यौवनात भर घालतात. एकूण मूर्तीला लय असून रेखांकन आकर्षक आहे.

भुलेश्वराच्या मंदिरात मातृकापट्टांत भैरव आणि गणेश यांच्या मूर्ती आढळत नाहीत, मात्र गणेशीची किंवा वैनायकीची मूर्ती दिसते. ही मूर्ती यादवकालीन शिल्पात इतरत्र क्वचित आढळते. त्याचप्रमाणे उंटाचे शिल्पांकन महाराष्ट्रात अकोला (अहमदनगर जिल्हा) येथील तत्कालीन सिध्देश्वराच्या मंदिरातच फक्त दिसते. त्यामुळे वास्तूशिल्पशैलीच्या आधारे या मंदिराचा काळ तज्ञांनी इ. स. तेराव्या शतकाचा प्रारंभ असा ठरविला आहे.

संदर्भ : 1. Deglurkar, G. B. Temple Architecture and Sculpture of Maharashtra, Nagpur, 1974.

            2. Naik, A. V. The Bhuleshvar Temple Near Yavat Bulletin of the Deccan College Research Institute, Vol. IV No.2, December, 1942, Poona.

           ३. पारसनीस, द. ब. श्रीमहापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार, मुंबई, १९००.

           ४. पुरंदरे, कृ. वा. शिवचरित्रसाहित्य, खंड १, पुणे, १९२६.

                देशपांडे, सु. र